Skip to main content
x

शास्त्री, के.ए.

नीलकंठ शास्त्री

      नीलकंठ शास्त्री यांचा जन्म तामिळनाडूतील कल्लिदायकुरिची येथे एका तेलुगू नियोगी ब्राह्मण कुटुंबात झाला. नीलकंठ शास्त्री यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. नीलकंठ यांचे सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी व अंबसमुद्रम् येथे झाले. थोरल्या बंधूंच्या प्रोत्साहनामुळे शिष्यवृत्ती मिळवून नीलकंठ शास्त्री हे बी.ए. (१९११) व एम.ए. (१९१३) या परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले.

     त्यानंतर १९१८-१९२० या काळात तिरुनेलवेली येथील हिंदू महाविद्यालयात व्याख्याते त्यानंतर बनारस व अन्नमलई विद्यापीठांत इतिहासाचे प्राध्यापक, १९२९-१९४७ या काळात मद्रास विद्यापीठात इतिहास आणि पुरातत्त्वविद्या या विषयांचे विभागप्रमुख, तसेच १९५२-१९५६मध्ये म्हैसूर विद्यापीठात भारतीय संस्कृती या विषयाचे विभागप्रमुख म्हणून नीलकंठ शास्त्री यांनी काम केले. शिकागो विद्यापीठातही ते १९५९ पर्यंत अभ्यागत प्राध्यापक होते.

     नीलकंठ शास्त्री हे एक उत्तम वक्ते आणि लेखकही होते. त्यांनी इतिहासावर - विशेषत: दक्षिण भारताच्या इतिहासावर मौलिक संशोधनपर ग्रंथलेखन केले व त्यातील वादग्रस्त प्रकरणांवर प्रकाश टाकला. त्यांच्या ग्रंथांपैकी ‘द चोलज’ (खंड ३, १९३५-१९३७), ‘स्टडीज इन चोल हिस्टरी अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (१९४१), ‘द तमिळ किंगडम्स ऑफ साउथ इंडिया’ (१९४८), ‘मेडीईव्हल इंडिया’ (खंड २, १९५०), ‘हिस्टरी ऑफ इंडिया’ (खंड १ ते ३, १९५२-१९५३), ‘एज ऑफ नंदज अँड मौर्यज’ (१९५२), ‘अ हिस्टरी ऑफ इंडिया’ (१९६६) हे उल्लेखनीय होत. याशिवाय प्राचीन भारताचा इतिहास व संस्कृती यावरील त्यांचे सुमारे १६० संशोधनलेखही प्रकाशित झाले.

     पाटणा येथे १९४६मध्ये भरलेल्या भारतीय इतिहास परिषदेच्या आणि १९५१मध्ये लखनौ येथील प्राच्यविद्या परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेशी त्यांचे निकटचे संबंध होते. १९६८ साली या संस्थेच्या सुवर्णमहोत्सव प्रसंगी त्यांना संस्थेचे सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. त्यांनी अनेक अखिल भारतीय समित्यांवर काम केले. जपान, मलाया, नेपाळ इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. १९५८मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

संपादित

संदर्भ
१. मराठी विश्‍वचरित्रकोश; संपादक - कामत, श्रीराम पांडुरंग; विश्‍वचरित्र संशोधन केंद्र, गोवा.
शास्त्री, के.ए.