Skip to main content
x

शेळके, भगवंत धोंडजी

      गवंत धोंडजी शेळके यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोळा येथे झाला. त्यांच्या वडिलांचा उद्योग शेती हाच होता. त्यांचे ८वीपर्यंत शिक्षण मोळा गावीच झाले. त्यांनी मॅट्रिकची परीक्षा मेहकर येथून दिली व ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी मॅट्रिकनंतर अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवला आणि १९६५मध्ये प्रथम श्रेणीत बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. त्यांनी कृषि-पर्यवेक्षक म्हणून औरंगाबाद येथे नोकरी पत्करली. तेथून त्यांची बदली अकोला येथील कृषी महाविद्यालयात झाली. त्यांनी १९७२मध्ये उद्यानविद्या विषयात एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. त्यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रशिक्षण देणे इ. बाबींमध्ये जास्त आवड होती. नोकरीच्या कालावधीमध्ये त्यांनी बी.एस्सी.(कृषी) व एम.एस्सी. (कृषी)च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. त्यांनी हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या बगिच्यामध्ये जाऊन प्रशिक्षण दिलेले आहे. शेळके यांनी शेतकऱ्यांसाठी ४ पुस्तके लिहिली आहेत व उद्यानविद्यावरील त्यांचे २९० लेख वेगवेगळ्या मासिकांतून प्रकाशित झाले आहेत. मुंबई दूरदर्शनवर त्यांचे ७ कार्यक्रम झालेले आहेत. नागपूर, अकोला तसेच जळगाव आकाशवाणी येथून ३६ कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. डॉ.पं.दे.कृ.वि.च्या कृषी पत्रिकेमधूनही त्यांनी बरेच लेख लिहिलेले आहेत. त्यांना सीताफळ बागायतदार संघातर्फे ५ वेळेस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच बारामती जिल्हा केळी परिसंवादामध्येही त्यांचा सत्कार केला.

- डॉ. प्रकाश पुंडलिक देशमुख

शेळके, भगवंत धोंडजी