Skip to main content
x

सम्मनवार, अरविंद श्रीधर

       केंद्रीय बटाटा संशोधन केंद्राच्या पाटणा येथील प्रादेशिक क्षेत्रात १९५९ ते १९६१पर्यंत संशोधन साहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या अरविंद श्रीधर सम्मनवार यांचा जन्म नागपूर येथील सनदी अधिकारी कुटुंबात झाला. त्यांनी कृषिशास्त्र शाखेची पदवी नागपूर विद्यापीठातून संपादित केली आणि डॉ. भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.एस्सी. (विकृतिशास्त्र) ही पदवी प्राप्त केली. पटणा येथील बटाटा विषाणुरोगावरील संशोधन कार्य करत असतानाच त्यांची अमेरिकेतील मिशिगन स्टेट विद्यापीठ येथे संशोधन साहाय्यक म्हणून निवड झाली. त्यांनी १९६१ ते १९६४ या काळात पीएच.डी. पदवी संपादन करत असतानाच संशोधन फेलो म्हणून कार्य केले. नंतर निरनिराळ्या पदांवर कार्य करून १९७९ ते १९९७पर्यंत पुणे येथे केंद्राचे प्रमुख संशोधक म्हणून सहभाग होता.

       सम्मनवार यांनी १९७९ ते १९९७ या काळात झालेल्या संशोधन कार्यात केळीचा विषाणुरोग - पर्णगुच्छ, क्लॉरोसीस हे कंदात ओळखण्यासाठी एक तंत्र त्यांच्या सहकाऱ्यासह विकसित केले. या तंत्रात २, ३ - ५ टेट्रोझोलियम, क्लोराइड रसायनांचा वापर करून या दोन्ही विषाणुरोगांचा कंद/मुंडवे यात प्रादुर्भाव किती प्रमाणात होतो, हे प्रयोगाद्वारे सिद्ध केले. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘प्रयोगशाळेतून प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात’ हे आय.सी.ए.आर.चे एक ब्रीदवाक्य सिद्ध करून दाखवले.

       केळी पिकावरील पर्णगुच्छ रोगाचा प्रसार पेंटोलोणीया नायग्रोनर्वोसा या किडीमुळे होतो. या किडीचा जीवनकाळ व रोगाचा प्रसार यासंबंधी सम्मनवार यांनी सहकाऱ्यांबरोबर संशोधन केले. या मावा किडीचा केळी पिकावर काही काळापुरताच प्रादुर्भाव होत असल्याचे, तसेच या किडीचे अळूवर्गीय जंगली जातीवर प्रादुर्भाव असल्याचे संशोधनाने सिद्ध केले. सम्मनवार यांनी चवळी पिकावरील विषाणुरोगाबाबत संशोधन करून त्यावर नियंत्रण कसे ठेवता येते हे सिद्ध केले. ते इंडियन फायटो पॅथॉलॉजी सोसायटीचे आजीव सदस्य, संपादकीय सदस्य, १९८२ साली न्यूयॉर्क सायंटेफिक सोसायटीचे क्रियाशील सदस्य म्हणून कार्यरत होते. तसेच  मिशीगन स्टेट युनिव्हर्सिटी सिग्मा एक्स आय स्पोर्ट सचिव म्हणून कार्यरत होते. डॉ. सम्मनवार यांनी म.फु.कृ.वि., डॉ. पं.दे.कृ.वि., आय.ए.आर.आय. व महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी, पुणे इ. संस्थांच्या वनस्पतिविकृतिशास्त्र अभ्यासक्रमाचे सदस्य म्हणून बहुमोल कार्य केले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषद सिंपोझियामध्ये  अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून काम केेले आहे.

       सम्मनवार यांना केळी कंद व मुनवे यामधील विषाणुरोगाच्या संशोधनासाठी ओम आश्रम ट्रस्ट जॉइन्ट पुरस्कार मिळाला होता. ते जानेवारी १९९७मध्ये पुणे येथील क्षेत्रीय केंद्रातील प्रमुख व प्राचार्य शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले. त्यांचे १००हून अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ जणांना एम.एस्सी. व पीएच.डी. पदव्या प्राप्त झाल्या आहेत.

        ते महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी (एम.ए.सी.एस., पुणे) मध्ये कार्यकारीणीचे सदस्य राहिले आहेत.

- संपादित

 

सम्मनवार, अरविंद श्रीधर