Skip to main content
x

सुरू, नरहर गोविंद

      संस्कृतचे गुणज्ञ आणि रसिक शिक्षक अशी उदंड लोकप्रियता लाभलेल्या प्रा. नरहर गोविंद उर्फ नानासाहेब सुरू यांचा जन्म सासवड येथे झाला. शालान्त परीक्षेत संस्कृतात सर्वप्रथम येऊन त्यांनी सन्मानाची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती पटकावली आणि संस्कृतात स्नातकोत्तर पदवी मिळवून फर्गसन महाविद्यालयात आपल्या अध्यापनकार्याचा श्रीगणेशा केला. शिक्षणप्रसारासाठी नवनवीन संस्था स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. वाडिया महाविद्यालयात (पुणे) या संस्थेचे ते संस्थापक प्राचार्य (१९३२-५८) होते. त्यानंतर रुपारेल महाविद्यालय, मुंबई (१९६०-६५) आणि त्यानंतर दहा वर्षे मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी या संस्थांना स्थैर्य व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

व्यवस्थापकीय जबाबदार्‍या सांभाळतानाच आपला साहित्याचा व्यासंगही सुरूंनी वाढवला. व्यायामाने उत्तम राखलेली शरीरसंपदा, रसिकता आणि व्यासंग याचे अपूर्व रसायन त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. संस्कृत, प्राकृत आणि इंग्लिश या भाषांवर असामान्य प्रभुत्व असलेल्या सुरूंनी ‘शाकुन्तल’, ‘मालतीमाधव’ या संस्कृत, तर ‘गउडवहो’ आणि ‘कर्पूरमञ्जरी’ या प्राकृत पुस्तकांच्या संपादनाने तरल रसास्वादाचा आदर्श घालून दिला. ‘माझी आकाशभाषिते’ हे त्यांचे पुस्तक कालिदास व भवभूती यांच्यावरील प्रेमाची साक्ष पटवणारे आहे. त्यांनी केलेले ‘अमरकाव्यम्’ हे उमरखय्यामच्या रुबायांचे समश्लोकी संस्कृत भाषांतर त्यांच्या अभिजात रसिकतेची ग्वाही देणारे आहे. दुर्दैवाने ते प्रकाशित झालेले पाहणे त्यांच्या भाग्यात नव्हते.

प्राचार्य सुरू एक सच्चा माणूस आणि गुणग्रही व्यक्तिमत्त्व होते. प्रशासकीय सेवेत एखाद्याशी मतभेद झाले, तरीही त्यांनी न्यायबुद्धी सोडली नाही. प्राचार्यपदाची धुरा वाहताना धैर्याची परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग आले तरीसुद्धा न डगमगता शांतपणे त्यांनी ते तडीस लावले. शिष्यांच्या बाबतीत वत्सल, गुणग्रही आणि उदार राहून त्यांनी शिष्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. गरजू विद्यार्थ्यांना आणि संस्थांना उदारहस्ते मदत करणारे सुरू जणू दीनदुबळ्यांचा कल्पवृक्षच होते. अशा या कुशल प्राचार्यांवराची आणि रसिक संस्कृतज्ज्ञांची सरकारदरबारी मात्र विशेष दखल घेतली गेली नाही, याची खंत वाटते.

डॉ. परिणीता देशपांडे

सुरू, नरहर गोविंद