Skip to main content
x

टाले, सुभाष माधव

         सुभाष माधव टाले यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नरदोडा या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण दर्यापूर येथे झाले. एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी अकोला येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी एम.टेक. व पीएच.डी. या पदव्याही संपादन केल्या. त्यांनी १९८०मध्ये अकोला येथील कृषी विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक या पदावर सेवेला सुरुवात केली. पुढे त्यांनी निरनिराळ्या पदांवर कार्य करून विविध प्रकल्प राबवले. ठिबक सिंचन उभारणी, उपसा जलसिंचन व्यवस्थापन, पाणलोट सुधारणा, कोरडवाहू शेतीत पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी जल व मृदा संधारण आणि जलसाक्षरता या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे.

         टाले यांनी पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनासंबंधीच्या १४ शिफारसी शासनाला केल्या. त्यात कृषी फळबागा पद्धती, वनकुरण विकास पद्धती, बहुउद्देशीय झाडांची लागवड व त्यासाठी योग्य अशा रानबांधणीचा समावेश होता. महाराष्ट्र शासन व इस्राएल यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्यापीठात राबवण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी ‘कापूस प्रात्यक्षिक प्रकल्पात’ सिंचनसंचाच्या उभारणीची धुरा त्यांनी सांभाळली. त्यांनी कापूस पिकातील ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान सुमारे १ लाख शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगितलेे. तसेच त्यांनी अनेक देशांना भेटी देऊन १२ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला. जपानमधील ओसाखा राज्यात २००३मध्ये झालेल्या तिसऱ्या जागतिक पाणी परिषदेसाठी जागतिक पाणी संदेशवाहकाची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा गौरव झाला. त्यांना २००६-०७मध्ये पाणी व्यवस्थापनावरील लेखनासाठी ‘बळीराजा’तर्फे डॉ. डी.जी. कुलकर्णी पुरस्कार मिळाला. याव्यतिरिक्त जल व मृदा व्यवस्थापनातील शोधनिबंधांसाठी नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर इंजिनीयरिंग, सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर यांच्यातर्फेही पुरस्कार मिळालेे. आंतरराष्ट्रीय बायोग्राफिक संस्था-केम्ब्रिज, इंग्लंडतर्फे त्यांना ‘लीडिंग सायंटिस्ट ऑफ २००९ इन सॉइल अँड वॉटर कन्झर्व्हेशन  इंजिनीयरिंग’ हा पुरस्कार प्राप्त झाला. 

         टाले यांनी अकोला, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्यांत सुमारे ४७०० चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरलेल्या पूर्ण खारपाणपट्ट्यातील कोरडवाहू शेतीवर लक्ष केंद्रित केले. पाऊस व्यवस्थापनाची कल्पना पूर्णत्वास नेऊन संरक्षित ओलिताचा फायदा प्रत्यक्ष व कोरडवाहू शेती व्यवस्थापनातील नव्या दिशा शेतकऱ्यांना दिल्या. त्यांनी शिक्षण, संशोधन व विस्तारकार्यात भाग घेतला. त्यांचे १६५ शास्त्रीय व संशोधन लेख, ९ माहिती पुस्तिका, तसेच शेतकऱ्यांसाठी जल, मृदा संधारण व पाणलोट विकास व पाण्याबाबतच्या समस्यांवर लिहिलेले २००च्या वर लेख विविध वृत्तपत्रे व मासिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.

- प्रा. पद्माकर दत्तात्रय वांगीकर

टाले, सुभाष माधव