Skip to main content
x

तालीम, मीना व.

     डॉ. मीना व. तालीम हे पाली साहित्य, प्राचीन भारतीय संस्कृती, बौद्ध कला व स्थापत्य या विषयांच्या अभ्यासकांपैकी एक उल्लेखनीय नाव. डॉ. मीना तालीम (पूर्वाश्रमीच्या मीनाक्षी सदानंद साळवी) यांचा जन्म मुंबईमधील शिवाजी पार्क येथे झाला. घरात शिक्षणाला पोषक वातावरण असल्याने त्यांच्या सहा बहिणी व एक भाऊ या सर्वांनीच आपापल्या क्षेत्रात उच्च शिक्षण संपादन केले. त्यांची मोठी बहीण गुलाबभाई शेटे ह्या डॉक्टर, तर दुसरी बहीण इंदिराबाई कालेवार ह्या शारदा सदनच्या मुख्याध्यापिका होत्या. मीना यांचे शालेय शिक्षण ओरिएंट शाळा, शिवाजी पार्क, दादर येथे झाले. सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबईतून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणार्‍या मीना यांनी १९५२ मध्ये पाली व मराठी विषय घेऊन बी.ए. पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९५४ मध्ये याच विषयांमध्ये मुंबई विद्यापीठाची एम.ए. पदवी प्राप्त करून पाली भाषेचे प्रसिद्ध विद्वान प्रा. ना.के. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे संशोधन सुरू केले. १९६०मध्ये ‘या विषयातील संशोधनाकरिता मुंबई विद्यापीठाच्या पाली विषयाची पहिली पीएच.डी. पदवी संपादन करण्याचा मान त्यांना मिळाला. हा संशोधन ग्रंथ पुढे मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र व इतिहास विषयांच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला गेला.

     डॉ. मीना यांच्या सुमारे पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ अध्यापन व संशोधन कारकिर्दीची सुरुवात १९६२ मध्ये झाली. त्या वर्षी त्या मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात व्याख्याता म्हणून रुजू झाल्या. प्रा. ना. के. भागवत यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांनी त्याच वर्षी पाली भाषा विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. पुढे १९७५ सालापासून झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचीन भारतीय संस्कृती विभागाच्या प्रमुखपदाची धुरादेखील त्यांनी सांभाळली. १९९० मध्ये सेंट झेवियर्स महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती व पाली या दोन्ही विभागांच्या विभागप्रमुख म्हणून त्या निवृत्त झाल्या. त्यादरम्यान पतीचे आजारपण व नंतर झालेल्या त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरून १९९५पासून प्रा. मीना तालीम मुंबई विद्याविहार येथील के. जे. सोमैय्या सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज व पाली विभाग, मुंबई विद्यापीठ येथे अनुक्रमे मानद प्राध्यापक व अतिथी प्राध्यापक म्हणून पुन्हा एकदा संशोधन व अध्यापन करू लागल्या. त्यांचे हे कार्य आजतागायत सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट झेवियर्स महाविद्यालय, हेरास रिसर्च इन्स्टिट्यूशन व के.जे. सोमैय्या सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज, मुंबई येथून १५ संशोधकांनी आपले पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केले आहे. आजही त्या हेरास इन्स्टिट्यूट वगळता अन्य दोन संस्थांमधून पीएच.डी.च्या संशोधकांना मार्गदर्शन करत आहेत.

     प्रा. तालीम यांनी इंग्रजी, हिंदी व मराठी या भाषांमधून पाली साहित्य, बौद्ध कला, स्थापत्य, प्राचीन भारतीय संस्कृती व इतिहास तसेच प्राचीन भारतीय स्त्री व वैद्यक या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांची ‘Buddhavamso’(University of Bombay,1969),’Woman as Depicted in Early Buddhist Literature’ (University of  Bombay,1970),’Bagh Painting-Identification and Interpretation’(Somaiya Publication,Mumbai,2002),’Science of Medicine and Surgery in Buddhist India’(Buddhist World Press,New Delhi,2009),’Edicts of King Asoka- A New Vision’ (Aryan Books International,New Delhi,2010),’Life of Woman in Buddhist Literature((Buddhist World Press,New Delhi,2010),

     ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी त्यांचे पालीचे शिक्षक प्रा. ना.के. भागवत यांच्यावरील ‘Memoir’ ही स्मरणिका संपादित केली. (ओरिएंटल प्रिंटर्स, मुंबई, १९६३)

     प्रा. तालीम यांचे इंग्रजी, हिंदी तसेच मराठी भाषांतील विविध विषयांवरील सुमारे ५० लेख व शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने पाली भाषा-अध्ययनाच्या नवीन दिशा, पाली साहित्य व त्याचे बौद्ध चित्रकलेत उमटलेले प्रतिबिंब, अजिंठा व बाघ येथील बौद्ध चित्रकला, बौद्ध लेणी, त्यातील स्थापत्य व मूर्तिकला, बौद्ध कला व स्थापत्यातील स्थित्यंतरे, सम्राट अशोक व त्याचे शिलालेख, बौद्ध धर्माचे आश्रयदाते, बौद्धकालीन स्त्रीजीवन, बौद्ध शिक्षणपद्धती, बौद्ध युगातील वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा व शल्य उपकरणे, प्राचीन उद्याने इत्यादी विविध विषयांचा मागोवा घेतल्याचे दिसते. या व्यतिरिक्त त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांतून पन्नासहून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत.

    प्रा. तालीम यांचे Indian Studies(Ed.by J.Bloch,J.Charpentier and R. L. Turner),Ladakh: Crossroad of High Asia (J. Rizvi,Oxford University Press), The Social Dimension of Early Buddhisam (Uma Chakravarti,  Oxford University Press) इत्यादी चौदा पुस्तकांवरील परीक्षात्मक लेख प्रसिद्ध आहेत. यासोबतच त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या पाली व प्राचीन भारतीय संस्कृती या विषयांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले. या लेखनकार्याच्या जोडीला त्यांनी थेरीगाथा व अशोकाच्या शिलालेखांसंबंधी संशोधन प्रकल्प तडीस नेले.

    प्रा. तालीम यांचे ‘बंधनाच्या पलीकडे’ (धर्मचक्र, फेब्रुवारी १९५२, मुंबई), ‘भद्रा कुण्डलकेशा’ (धर्मचक्र, ऑक्टोबर १९५२, मुंबई) ‘तो गेला! तो कायमचा गेला!!’ (धर्मचक्र, सप्टेंबर १९५३, मुंबई), ‘बौद्धकालीन स्त्री’ (धर्मचक्र, ऑक्टोबर १९५४, मुंबई), ‘अनित्य अनित्य’ (धर्मचक्र, १९५८, मुंबई) व ‘आमचे गुरुवर्य ना.के. भागवत’ (स्मरणांजली, १९६३, मुंबई) इत्यादी ललित लेख प्रसिद्ध आहेत.

    प्रा. मीना तालीम यांना त्यांच्या बहुमोल संशोधन कार्याकरिता २००९ मध्ये पाली पाठ संस्थेचा पालिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०१०मध्ये त्यांना बौद्ध विकास मंडळाचा पालिविभूषण हा पुरस्कार प्राप्त झाला. प्रा. मीना तालीम यांनी आपल्या सखोल व वैविध्यपूर्ण संशोधनाने, तसेच अभ्यासपूर्ण व विद्यार्थिकेंद्री अध्यापनाने सुमारे पाच दशके प्राचीन भारतीय अध्ययनाची व विशेषत्वाने पाली व बौद्ध अध्ययनाची ज्योत तेवती ठेवली आहे. आजही तिच्या प्रकाशाने अनेकांच्या भावी अध्ययनाच्या वाटा उजळून निघत आहेत.

           — डॉ. महेश देवकर

तालीम, मीना व.