Skip to main content
x

टेंबे, गोविंद सदाशिव

गोविंद सदाशिव टेंबे यांना विसाव्या शतकातील महाराष्ट्राचे सांस्कृतिक आधारस्तंभ म्हणून गौरविले गेले. एक हार्मोनिअमवादक, संगीत दिग्दर्शक, संगीत रंगभूमीवरचे गायकनट, नाटककार, मराठी बोलपटाचे पहिले नायक, गीतकार, संगीतकार, संगीतिकांचे कर्ते, मराठीतील आस्वादक संगीत समीक्षेचे अध्वर्यू असे पैलू असणारे गोविंद टेंबे यांचे व्यक्तिमत्त्व रसिले व बहुआयामी होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विलक्षण जादू तेव्हाच्या जनमानसावर होती. भारतीय संगीताच्या नकाशावर हार्मोनिअमचे स्थान उंचावण्यात ज्या व्यक्तींचे महत्त्वपूर्ण योगदान होते, त्यांतले एक अग्रगण्य नाव म्हणजे कोल्हापूरचे गोविंद टेंबे हे होय!

गोविंद सदाशिव टेंबे यांचा जन्म कोल्हापूरजवळच्या सांगवडे या गावी सदाशिव व अंबा या दांपत्याच्या पोटी झाला. कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील शाळेत मराठी दुसरी इयत्तेत शिकताना, आपल्या बालसुलभ उंच आवाजात दिंडी गाऊन ते कौतुकास पात्र झाले. राजाज्ञेवाड्यात राहत असताना नवरात्रीच्या उत्सवातील  हरदासी कीर्तनांत विष्णूबुवा यांची हार्मोनिअमची साथ त्यांनी प्रथम ऐकली व या वाद्याची मोहिनी त्यांच्या मनावर कायमचीच पडली. अंतःप्रेरणेने निरीक्षणातूनच ते हार्मोनिअम वाजवू लागले. पुढे एका अमेरिकन पाद्य्राचा ऑर्गन त्यांना योगायोगाने हाताळायला मिळाला. शेजारच्या धोंडोपंत बर्वे यांच्याकडून त्यांनी आरंभीचे जुजबी धडे घेतले. वाईकर संगीत मंडळीतील नाटकांतील पदांच्या तालमींदरम्यान त्यांना पांडोबा यवतेश्वरकर यांचेही मार्गदर्शन मिळाले. १८९८-९९ दरम्यान गुंडोपंत पिशवीकरांच्या मेळ्यात, केदारलिंग प्रासादिक मेळ्यात त्यांचा सहभाग होता. करवीर निवासिनी नाटक मंडळी, माणिक प्रभू प्रासादिक संगीत नाटक मंडळीत वीरतनय’, ‘शापसंभ्रम’, ‘रामराज्यवियोग’, ‘सौभद्रअशा संगीत नाटकांसाठी ऑर्गनची साथ करण्याचा अनुभवही त्यांनी घेतला. या साऱ्या अनुभवांतून त्यांच्या हार्मोनिअमवादनात हळूहळू सराईतपणा आला.

टेंब्यांच्या घरात संगीताची आवड वा परंपरा नव्हती. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी वकिलीची सनद मिळवली; मात्र त्यांचे मन संगीत-नाट्य या कलांमध्येच रमले. मुंबईत मॅट्रिक करताना तेथील मैफली, नाटकांचा आनंद त्यांनी पुरेपूर घेतला. गिरगावातील ट्रिनिटी क्लबमध्ये त्यांचे जाणे-येणे सुरू झाले. मुंबईतील धनिक विठ्ठलदास द्वारकादास मेहता यांच्या स्नेहामुळे गोविंद टेंबे यांचा मुंबईतील उच्चभ्रू वर्गाशी परिचय झाला, त्यातूनच त्यांना भास्करबुवा बखले व अल्लादिया खाँसाहेबांचाही सहवास मिळाला. भास्करबुवा बखल्यांना मनोमन गुरू मानून टेंबे त्यांना हार्मोनिअमची संगतही करू लागले.

म्हैसूर संस्थानचे राजपुत्र हे त्यांचे मित्र असल्याने  त्यांच्यासह टेंबे यांनी १९०८ साली जपानची व १९३९ मध्ये युरोपची सफर केली. देवल सर्कसबरोबर त्यांनी व्यवस्थापक म्हणून मद्रास इलाख्याचा दौरा केला. गोविंदरावांनी १९११ ते १९२२ हा काळ प्रामुख्याने मराठी संगीत रंगभूमीवर गायक-अभिनेते व संगीतकार म्हणून व्यतीत केला. त्यांनी १९२२ ते १९२९ या काळात म्हैसूरच्या युवराजांकडे नोकरी करत असताना नाट्यलेखन व संगीत दिग्दर्शनही केले. टेंब्यांनी १९३० ते १९३४ हा काळ कोल्हापूरला प्रभात फिल्म कंपनीत गायक-अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक या नात्याने घालवला. त्यांनी शालिनी सिनेटोन, नटराज फिल्म्स इ. चित्रपट कंपन्यांच्या चित्रपटांसाठी १९३४ ते १९३९ दरम्यान कार्य केले.

कोल्हापुरातील पोहरेबुवा, शाळिग्रमबुवा, गणपतीबुवा मिरजकर या गवयांच्या गाण्याचा, देवल क्लबमधील मैफली, तसेच तत्कालीन नाटके, मेळे, लावणी व कीर्तनांतील पदांचा संस्कार टेंब्यांवर बालपणीच झाला. किर्लोस्कर नाटक मंडळीतील भाऊराव कोल्हटकरांच्या गायनाचाही त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. शाहू क्रिकेट क्लबने रत्नपालया नाटकातील पदांच्या चाली बसवायला मुंबईतील ख्यातनाम हार्मोनिअमवादक लक्ष्मीकांत ऊर्फ भाचूभाई भांडारे यांना पाचारण केले. तेव्हा गोविंदरावांना भांडाऱ्यांचा थोडा सहवास मिळाला. तसेच, मुंबईच्या वास्तव्यात त्यांनी हैद्राबादच्या लक्ष्मणराव यांचेही हार्मोनिअमवादन ऐकले. ग्वाल्हेरचे, हार्मोनिअम वाजवून ठुमरी गाणारे भैया गणपतराव यांच्याही मैफली त्यांनी लाला दुलीचंदांकडे ऐकल्या. या साऱ्यांचा हार्मोनिअमवादनाचाही ठसा त्यांच्या मनावर उमटला.

पं.भास्करबुवा बखले यांचे ते एकलव्य शिष्य होते. बुवांचा सहवास व हार्मोनिअमची साथ करत टेंब्यांनी संगीतातील मर्मस्थळे टिपली. अल्लादिया खाँ व भास्करबुवा बखले यांच्या गायकीचा प्रभाव त्यांच्यावर होता व त्याचे प्रतिबिंब त्यांच्या हार्मोनिअमवादनावर पडले होते. तसेच मौजुद्दिन, गोहरजान, मलकाजान अशा ठुमरी गायकांच्या गाण्याचा ढंगही त्यांनी वादनात व रंगभूमीवर आणला. त्यांनी सतारिये बरकतुल्लांचा गंडा बांधला होता. प्रत्यक्ष संगीतशिक्षण फारसे घेतले नसले तरी त्यांनी या साऱ्या दिग्गजांच्या कलेचे निरीक्षण करून मेहनत व स्वतःचे चिंतन यांद्वारे संगीत व्यासंग केला.

विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांच्या काळात हार्मोनिअमची २-३ तासांची स्वतंत्र मैफल ही कल्पनाच नावीन्यपूर्ण होती व गोविंद टेंबे यांनी हार्मोनिअमच्या एकलवादनाची प्रस्तुती करून या वाद्याला लोकप्रियतेचा एक वेगळा आयाम दिला. हार्मोनिअम व गोविंद टेंबेहे समीकरणच निर्माण झाले. समन्यूनीकृत (इक्विटेंपर्ड) स्वरजुळणीच्या हार्मोनिअमवर रागदारी वाजवणे मुश्कील असले तरी गोविंदराव आपल्या अंगुलिकौशल्याने रागमूर्ती चांगली उभी करत. अखेरच्या काळात ते श्रुतितज्ज्ञ गं.भी. आचरेकर यांनी बनवलेली श्रुति-हार्मोनिअम वाजवत असत. गायकीनुसार रागमांडणी, सतारीचे तोडे, सारंगीचे तानपलटे व हार्मोनिअमच्या खास खटके-मुरक्यांच्या जागा या सार्यांचा समावेश करून त्यांनी आपली शैली घडवली. टेंब्यांच्या वादनात भीमपलास, यमन, सिंधुरा, बिहाग, . रागांतील विलंबित व द्रुत चीज, ठुमरी-दादरा, लोकप्रिय नाट्यगीते यांचा समावेश असे. जयपूर घराण्याच्या अनवट वा जोडरागांचाही नमुना ते आवडीने सादर करत. त्यांचा भर मुख्यतः चिजा व नाट्यपदे वाजवून दाद घेण्यात होता, त्यामुळे गायनानुसारी असे हे वादन होते. त्यांच्या हार्मोनिअमवादनाच्या ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही., ट्विन, ओडियनतर्फे निघाल्या व लोकप्रियही ठरल्या.

लालित्य वा नजाकत हा टेंब्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव त्यांच्या वादनात पूर्णांशाने उतरला होता. मुलायमपणा व जोरकसपणा हे दोन्ही गुण त्यांच्या वादनात होते. मींडेचा आभास निर्माण करणे, नखरेल हरकती व गुंतागुंतीच्या तानांनी पद सजवणे ही त्यांची हातोटी होती. भात्याचाही ते प्रभावी वापर करत असतवादन करताना टेंबे काही सूचक हातवारे करत व त्याद्वारे अभिप्रेत असणाऱ्या गायकीचा इशारा करीत. ही त्यांची लकब फार मोहक होती व नंतरच्या अनेक हार्मोनिअमवादकांनी याच लकबीचे अनुकरण केले. त्यांची वादनशैली राजारामबापू पुरोहित, गणपतराव पुरोहित, अनंत जमदग्नी, विठ्ठलराव सरदेशमुख, ना..मारुलकर, बाळ माटे, . शिष्य व गायक सुरेशबाबू माने, गुंडोपंत वालावलकर यांनी अंगीकारली होती. त्यांच्या वादनशैलीचा प्रभाव नंतरच्या दोन पिढ्यांवर गहिरा राहिला.

टेंबे यांचा १९११ पासून किर्लोस्कर नाटक मंडळीशी संबंध आला. पुढे १९१३ साली गंधर्व नाटक मंडळीची स्थापना झाली, तिचे ते संस्थापक-भागीदार होते. किर्लोस्कर व गंधर्व नाटक मंडळीसाठी त्यांनी तेरा नाटकांत प्रमुख व बहुतेक वेळा नायकाच्या भूमिका केल्या. मानापमान, विद्याहरण (कच या पात्राच्या चाली) या नाटकांसाठी त्यांनी गोहरजान, मलकाजान, प्यारासाहेब, जानकीबाई यांच्या पूरबबाजाच्या ठुमरी-दादऱ्यांच्या चालींची लयलूट केली. या नाटकांतील चालींमुळे महाराष्ट्रातील जनतेस हा ढंग सुपरिचित झाला. त्या काळात प्रचलित रचनेवरून गीतरचना केली जाई, अर्थात या चाली नव्याने बांधलेल्या नसत, केवळ नाटकातील प्रसंगानुरूप त्या-त्या चालीची योजना संगीत दिग्दर्शक करीत असे. मानापमान, विद्याहरण या नाटकांत त्यांनी मुख्यतः प्रचलित चाली वापरल्या. शिवराज कंपनीच्या नाटकांसाठी मात्र त्यांनी स्वतंत्रपणे चाली बांधायला सुरुवात केली.

टेंबे यांनी १९१७ साली शिवराज संगीत मंडळीची स्थापना करून नवनवीन मराठी व हिंदी नाटकांचे प्रयोग केले. त्यांनी वरवंचना’, ‘तुलसीदास’, ‘वत्सलाहरण’, ‘वेषांतर’, ‘देवी कामाक्षी’, ‘मत्स्यवेधआदी नाटकांचे लेखन व संगीत दिग्दर्शनही केले. चित्रवंचना’, ‘कृष्णकांचन’, ‘सिद्धसंसार’, ‘चंद्रग्रहण’, ‘देशदीपक’, ‘गोरक्षण’, ‘धर्मसिंहासन’, ‘पंचांगी जुगार’, ‘खलवधू कोणया नाटकांसाठी त्यांनी चाली दिल्या. तारिणी नववसनधारिणी, मितभाषिणी’, ‘रामरंगी रंगले मन’, ‘नच पार नादनिधीला’, ‘मधुसूदना हे माधवा’, अशी त्यांची काही पदे अविस्मरणीय झाली.

अयोध्येचा राजाया प्रभात फिल्म कंपनीच्या पहिल्या बोलपटासाठी टेंबे यांनी १९३२ साली हरिश्चंद्राची मुख्य भूमिका साकारली, म्हणून मराठी बोलपटांचा पहिला नायकव संगीत दिग्दर्शक होण्याचा मान त्यांना मिळाला. प्रभात कंपनीच्या अयोध्येचा राजा’, ‘अग्निकंकण’, ‘माया मच्छिंद्र’, ‘सिंहगड’, ‘सैरंध्रीया चित्रपटांसाठी त्यांनी संगीतकार, पद्यकार, पटकथाकार अशा अनेक भूमिकांतून कार्य केले. सती महानंदा’, ‘मंजरी’, ‘सीताया चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन व भूमिकाही केल्या. शालिनी सिनेटोनसाठी त्यांनी उषा’ (संगीत व भूमिका, १९३५), ‘झीनत महल’ (संगीत, १९३६), ‘सावकारी पाश’ (गीत-संगीत, १९३६), ‘प्रतिभा’ (गीत-संगीत, १९३७), ‘राजमुकुट’ (भूमिका, पटकथालेखन, दिग्दर्शन व संगीत, १९३५), तसेच अन्य चित्रसंस्थांत विषवमन’ (संगीत, १९३६), ‘वासंती’ (भूमिका, १९३८), ‘नंदकुमार’ (भूमिका, १९३८), ‘सवंगडी’ (गीत व संगीत, १९३८), ‘साथी’ (संगीत, १९३८), ‘निर्दोष’ (संगीत, १९४१), ‘कृष्णसुदामा’ (भूमिका, १९४७) असे कार्य केले. संगीतकार, पद्यकार, गायक-अभिनेते अशा अनेक भूमिकांमधून टेंब्यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर पहिल्या दोन दशकांत आपला ठसा उमटवला.

युरोपच्या सफरीनंतर पाश्चात्त्य संगीतातील ऑपेराया प्रकाराच्या प्रभावातून त्यांनी महाश्वेता’, ‘जयदेव’, ‘प्रतिमाअशा सुंदर संगीतिका (स्वरनाटिका हा त्यांचा शब्द) निर्माण केल्या. मराठी भाषेत रागांची लक्षणगीते रचून ती लक्षणगीतेपुस्तकात प्रकाशितही केली. त्यांनी प्रचलित, तसेच सावनी नट, बिहागडा, मालश्री इ. जयपूर घराण्याच्या खास रागांत बंदिशीही केल्या. त्यांनी कौंसीललत या रागाचीही निर्मिती केली.

माझा संगीत व्यासंग’ (१९३९), ‘रंगाचार्य’ (१९४०), ‘जीवन विहार’ (१९५०), ‘अल्लादिया खाँसाहेबांचे चरित्र’ (१९५४), ‘कल्पना संगीत’ (१९५५), ‘जीवन व्यासंग’ (१९५६), ‘लक्षणगीते’ (१९७०) हे गोविंद टेंबे यांचे सात ग्रंथ म्हणजे संगीत व रंगभूमीविषयक मराठी साहित्यास मोलाचे योगदान आहे. त्यांचे संगीतविषयक लेखन मुख्यतः अनुभवकथन व चरित्रवर्णनपर असले तरी कल्पना संगीतया ग्रंथात टेंब्यांनी स्वतंत्र स्वरलिपी, रागवर्गीकरण पद्धतीसह वेगळा सांगीतिक सिद्धान्त मांडला. याखेरीज त्यांनी आठ संगीत नाटकांसह गंभीर घटना’ (गद्य नाटक), ‘कावळातालीम मास्तर’ (विनोदी लेख) आणि नर्तकीविलासहा काव्यसंग्रह, संगीत, रंगभूमी, चित्रपटविषयक ५० स्फुटलेख, १७ व्यक्तिचित्रे, तसेच अनेक पुस्तक अभिप्राय, प्रस्तावना असे विपुल, दर्जेदार लेखन केले.

एकंदर १९२० ते १९५० अशा तीन दशकांतील वाङ्मयीन घडामोडींवर त्यांच्या लेखणीचा, त्यांच्या भाषाशैली व विवेचनाचा दाट प्रभाव पडला. वामनराव देशपांडे, अरविंद मंगरूळकर, बाबूराव जोशी, कृ.. दीक्षित यांच्याही लेखनावर त्यांची छाप दिसते.

भास्करबुवांनी स्थापन केलेल्या भारत गायन समाजाच्या व पुणे भारत गायन समाजाच्या कार्यातही त्यांचा वाटा होता. त्यांनी १९५० नंतर आकाशवाणीच्या श्रवणकसोटी समितीचे सल्लागार सदस्य म्हणून कार्य केले. आकाशवाणी, पुणे केंद्रासाठी त्यांनी जुनी संगीत नाटके नभोनाट्याच्या स्वरूपात बसवून घेतली, संगीतिका सादर केल्या.

टेंब्यांच्या रूपवान, रसिल्या व रुबाबदार व्यक्तित्वाचा, ढंगदार संगीताचा व सुकुमार लेखनशैलीचा प्रभाव अनेकांवर पडला. संगीत दिग्दर्शनाच्या निमित्ताने बालगंधर्व, हिराबाई, मोहनराव पालेकर, वामनराव सडोलीकर, सरस्वती राणे, जयमाला शिलेदार, दुर्गा खोटे, मास्टर विनायक, लीला पेंढारकर, वसंत देसाई इत्यादींना, तसेच संगीतिकांच्या निमित्ताने सुरेश हळदणकर, राम मराठे, माणिक वर्मा, मालती पांडे, पद्माकर बर्वे, सुमन माटे अशा अनेक कलाकारांना त्यांचे मार्गदर्शन मिळाले. शिवाय जगन्नाथबुवा पुरोहित, शांता आपटे, पद्मावती शाळिग्रम, वामनराव देशपांडे, मधुसूदन कानेटकर, नीलकंठ अभ्यंकर, अरविंद मंगरूळकर, कृ.. दीक्षित, म्हैसूर युवराज कृष्णराज वाडियार इत्यादींनी त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. त्यांचे पुत्र माधव टेंबे यांनीही त्यांच्या संगीत दिग्दर्शन व हार्मोनिअमचा वारसा चालवला.

सत्ताविसाव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष (पुणे), मराठी रंगभूमी शतसांवत्सरिक उत्सवाचे अध्यक्ष (नागपूर) अशी मानाची पदेही त्यांनी भूषविली. आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली १९५१ साली गोविंद टेंबे यांचा सत्तरीनिमित्त सत्कार करण्यात आला होता. त्यांचा मृत्यू दिल्ली येथे झाला.

त्यांची जन्मशताब्दी १९८१ साली साजरी करण्यात आली व त्यांचे नातू दीपक टेंबे यांनी गोविंदराव टेंबे स्मृती प्रतिष्ठानाची स्थापना केली.

चैतन्य कुंटे

टेंबे, गोविंद सदाशिव