Skip to main content
x

वाघ, कारभारी रंभाजी

     नाशिक तालुक्यातील चांदोरी गावात कारभारी रंभाजी वाघ यांचे शिक्षण पुरे होऊन चांदोरीच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून ते काम करीत होते. वाघ गुरुजी म्हणूनच सर्वजण त्यांना ओळखत. कर्मवीर रावसाहेब थोरातांच्या सांगण्यावरून गुरुजींनी मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि नाशिक येथील श्री. उदोजी मराठा विद्यार्थी वसतिगृहांच्या अधीक्षकपदावर १९२६ च्या जून महिन्यात ते रुजू झाले. वास्तविक मुख्याध्यापक म्हणून त्यांना दरमहा पंचाहत्तर रुपये पगार मिळत होता. पण वसतिगृहाचे अधीक्षक म्हणून केवळ पन्नास रुपयांवर आजन्म सेवा करण्याचा संकल्प त्यांनी केला व तो शेवटपर्यंत पाळला. बहुजनसमाजातल्या शिक्षण प्रसाराला आपला हातभार लागावा व स्वत:ला समाजसेवेला वाहून घेता यावे ह्या उदात्त हेतूनेच गुरुजींनी हे व्रत स्वीकारले. गुरुजी वसतिगृहात गेले आणि वसतिगृहमय होऊन गेले. वसतिगृहात धुळे, जळगाव जिल्ह्यातूनही मुले येत.

     वसतिगृहातील ‘विद्यार्थ्यांची आई’ होऊन गुरुजींनी विद्यार्थ्यांवर प्रेम केले, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांनी ‘तुकाराम वाचनालय’ वसतिगृहात सुरू केले. लेखनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ‘श्री उदोजी’ नावाचे हस्तलिखित त्रैमासिक काढले. अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांना गुरुजी विशेष मार्गदर्शन करीत. देशी खेळांत त्यांना विशेष रस होता. ते स्वत: एक उत्तम आट्यापाट्या खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते. अनेक देशी खेळ ते मुलांच्या बरोबरीने खेळत. त्यांची शिस्तही अतिशय कडक होती. रात्रीच्या व पहाटेच्या प्रार्थनेला सर्व मुलांनी हजर राहिलेच पाहिजे असा नियम होता.

     नुसते पुस्तकी ज्ञान मिळविणे म्हणजे शिक्षण नव्हे ही त्यांची शिकवण. सामाजिक एकतेची व बांधिलकीची जाणीव गुरुजींनी मुलांच्या मनात बिंबवली. धर्म-भेद, जातिभेद त्यांनी मानला नाही. श्रीमंत-गरीब असा भेद केला नाही. मनाला पटलेला चांगला विचार कृतीत आणणे हा त्यांचा स्वभाव होता. महात्मा गांधींनी एका जाहीर सभेत सांगितले, “आपले दरडोई उत्पन्न केवळ दीड आणा (आजचे दहा पैसे) आहे. त्यात आपण एक वेळचे जेवण घेऊ शकतो.” हे गुरुजींना पटले आणि त्यानंतर पुढील सर्व वर्षे ते एका वेळचेच जेवण घेत होते.

- प्रा. सुहासिनी पटेल

वाघ, कारभारी रंभाजी