Skip to main content
x

वैद्य , प्रतिमा अजित

      चित्र, शिल्प, भित्तिचित्रण, सिरॅमिक-पॉटरी (कुंभारकला) आदी माध्यमांतून व्यावसायिक आणि अभिव्यक्ती म्हणून कामे करणार्‍या बहुहुन्नरी स्त्री-कलावंत प्रतिमा अजित वैद्य यांचा जन्म मुंबईत झाला. प्रख्यात चित्रकार दीनानाथ दलाल हे त्यांचे वडील. मातु:श्री सुमती दलाल यांनीही सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून पेन्टिंगची पदविका प्राप्त केली होती. असा दुहेरी वारसा त्यांना लाभलेला आहे. 

प्रतिमा वैद्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या बालमोहन विद्यालयात झाले. त्यांना लहानपणापासून चित्रे काढण्याची तसेच विज्ञान आणि गणिताची आवड होती. वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांना आर्किटेक्चरला जायचे होेते; पण आपल्याप्रमाणे या कलेची आवड असणाऱ्या मुलीने सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये पेन्टिंगला जावे असे वडिलांना वाटत होते.

त्यांनी १९६८ मध्ये एस.एस.सी. झाल्यावर जे.जे.मध्ये अ‍ॅडमिशन घेतली. त्या जे.जेमध्ये रमल्या. दीनानाथ दलालांना आधुनिक चित्रकलेबद्दल ओढ होती. त्यामुळे ते प्रकाशन व्यवसायासाठी जी व्यावसायिक कामे करत होते, तसे न करण्यास प्रतीमा यांना सांगत. त्या जे.जे.ला तिसऱ्या वर्षाला असतांनाच वडिलांचा अचानक मृत्यू झाला. प्रतिमा वैद्य यांनी १९७३ मध्ये पदविका (पेंटिंग) अभ्यासक्रम पूर्ण केला व त्यांना प्रथम श्रेणी व फेलोशिप मिळाली. शैक्षणिक काळातच त्यांनी शिल्पविभागातल्या ‘क्ले मॉडेलिंग’च्या छंदवर्गात जाऊन शिक्षण घेतले. पदविकेनंतर राजस्थान येथील वनस्थळी विद्यापीठातून तसेच जे.जे.मधील म्यूरल डिझाइनच्या वर्गातून प्रतिमा वैद्यांनी भित्तिचित्र तंत्राचे शिक्षण घेतले.

त्यांना १९७५ च्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात पेंटिंगचे कांस्य पदक मिळाले होते, तसेच बॉम्बे आर्ट सोसायटीचे १९७६ मधील पारितोषिकही त्यांना लाभले होते. याशिवाय ताज आर्ट गॅलरी, मुंबई; बालगंधर्व आर्ट गॅलरी, पुणे; त्रिवेणी आर्ट गॅलरी, दिल्ली (१९७९); ललित कला अकादमी, चेन्नई इत्यादी गॅलऱ्यांच्या समूह प्रदर्शनांतूनही त्यांचा सहभाग होता.

अजित वैद्य यांच्याशी १९७९ मध्ये त्यांचा विवाह झाला. अजित वैद्य यांनी सेन्ट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूटमधून ‘व्हाइट वेअर’ या विशेष तंत्रात तसेच बंगळुरूच्या सेन्ट्रल हॅण्डिक्राफ्ट सेंटरमध्येही प्रशिक्षण घेतले होते. जपानमध्ये कियोटो येथे १९७८ मध्ये वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल सेमिनारला हजर राहण्याचा योग त्यांना आला व त्यांना जपानी पॉटर्सबरोबर काम करण्याची संधी मिळाली. लोअर परळला त्यांचा एक स्टुडीओ होता.

अजित वैद्य आणि प्रतिमा या दोघांनी मिळून अनेक प्रकल्पांकरिता सिरॅमिक, टेराकोट्टा इत्यादी माध्यमांत भित्तिचित्रांची (म्यूरल्स) अनेक कामे केली. चौथ्या नॅशनल अ‍ॅग्रिकल्चर फेअर, नागपूरसाठी त्यांनी ‘भारतीय कृषी संवर्धन’ (Indian Agricultural scene) या विषयावर टेराकोट्टा या माध्यमात मानवी आकृतींचे संयोजन असलेले ७२ चौरस मीटरचे म्यूरल डिझाइन केले. याशिवाय टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे सिरॅमिक माध्यमातील शिल्प (१९८५), सुरत, मुंबई, येथे विविध वास्तूंकरिता, तसेच मस्कत म्युनिसिपालिटी (१९९१), इराक-बगदाद (१९८५) येथेही त्यांनी म्यूरल्स केलेली आहेत.

जपानमधील मिनो येथे १९९८ मध्ये भरलेल्या सिरॅमिक फेस्टिव्हलसाठी त्यांच्या सिरॅमिकमधील शिल्पाची निवड झाली होती. सर्व जगातून आलेल्या ३३७ कलाकृतींतून फक्त ३७ कलाकृतींची निवड यात केली होती. प्रतिमा वैद्य यांनी १९८८-८९ च्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील चौक या गावी अद्ययावत साधनांनी युक्त असा ‘ईशाळगड’ हा वैशिष्ट्यपूर्ण भव्य स्टूडिओ बांधला.

या दोघांची संयुक्त तसेच प्रतिमा वैद्यांची एकल प्रदर्शने झालेली आहेत. त्यांनी १९९५ मध्ये ‘दि ग्रेट सर्कस’ या प्रदर्शनात ‘विदूषक’ ही मध्यवर्ती कल्पना घेऊन, सिरॅमिक माध्यमात शिल्प, पोस्टर्स, म्यूरल, मुखवटे इत्यादी कलावस्तू मांडल्या होत्या, तर १९९८ मध्ये ‘ब्यूटिफुल पीपल’ या मालिकेतून प्राण्यांचे संगोपन (‘अ‍ॅनिमल कन्झर्व्हेशन’) हा विषय घेऊन काम केले होते.

पेंटिंगपेक्षा सिरॅमिक-पॉटरी या माध्यमात त्या काम करीत असल्या तरी आपल्या प्रदर्शनांतून त्यांनी जलरंगातील (वॉटरप्रूफ कलर इंक्स) चित्रे प्रदर्शित केली आहेत. त्यांच्या चित्रांत उत्स्फूर्ततेवर अधिक भर असतो. निसर्गातील आकार, भौमितिक आकार व वास्तु-आकार यांची एक उत्स्फूर्त निर्मिती त्यांच्या चित्रकृतीतून प्रत्ययास येते. विशेष म्हणजे, सिरॅमिक माध्यमातही त्या स्वतःची अभिव्यक्ती करतात तेव्हा पेंटिंगच्या अनुषंगाने लाभलेल्या गुणांचा त्या वापर करतात. मनात उत्स्फूर्तपणे स्फुरलेल्या विविध आकारांना प्राणी व मानवाचे वस्तुरूप देऊन प्रतिमा वैद्य सिरमिकच्या माध्यमात शिल्पे घडवतात. यात त्यांनी केलेला रंग व पोताचा वापर त्यांची परिणामकारकता वाढवितो.

याशिवाय त्यांनी केलेले वास्तु-अलंकरण, घरात सुशोभीकरणाकरिता वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंची, त्यांनी केलेली निर्मिती यांना कलात्मक जाणिवेचा स्पर्श असतो. अजित आणि प्रतिमा वैद्य यांचे वास्तव्य मुंबईत असून ‘ईशाळगड’ येथील स्टुडीओत ते कार्यरत असतात.

- माधव इमारते 

वैद्य , प्रतिमा अजित