Skip to main content
x

वरेरकर, भार्गवराम विठ्ठल

मामा वरेरकर

     भार्गवराम विठ्ठल वरेरकर यांचा जन्म व शिक्षण मालवणला झाले. त्यांनी वीस वर्षे पोस्ट खात्यात नोकरी केली. मूकपटांच्या जमान्यापासून वरेरकर चित्रपटांशी संबंधित होते. चित्रपट हे ज्ञानप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे, म्हणून त्यांनी पार्श्वनाथ आळतेकर, मनोहर दीक्षित, नायमपल्ली, पी.जयराज, नंदू खोटे यांसारख्या सुशिक्षित तरुणांना चित्रपटात जाण्याचा सल्ला दिला. पी. जयराज यांना तर पुढे मानाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ही मिळाला.

     मामांनी काही वर्षे ‘पूर्णिका’ नावाचे सिने-नियतकालिकही संपादित केले होते. इंपीरियल फिल्म कंपनीसाठी त्यांनी १९२८ साली ‘जगद्गुरू श्रीमत् शंकराचार्य’ हा चित्रपट लिहून दिला. त्यांनी पुढे त्याच कंपनीसाठी ‘जुगारी धर्म’ आणि ‘गोरीवाला’ असे चित्रपट लिहिले. ‘पुण्यावर हल्ला’ हा मूकपट निर्माण करून दिग्दर्शित केला, तसेच महात्मा गांधींच्या जीवनातल्या प्रसंगांवर आधारित ‘महात्माज मिरॅकल’ हा अनुबोधपटही निर्माण केला.

     मामा वरेरकर यांनी ‘विलासी ईश्‍वर’ या मराठी भाषेतील संपूर्ण लांबीच्या पहिल्या सामाजिक बोलपटाचे कथा-संवाद आणि गीतलेखन केले. मा. विनायक यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘अनौरस संतती’ या विषयावर या चित्रपटाची कथा आधारित होती. दादासाहेब तोरणे यांच्या ‘ठकसेन राजपुत्र’ या चित्रपटाचे लेखन त्यांनी करून दिले. ‘आवारा शहजादा’ या नावाने हिंदीतही हा चित्रपट काढला होता.‘नटराज फिल्म्स’ ही दुर्गा खोटे यांची स्वत:ची कंपनी. त्यांनी ‘सवंगडी’ (१९३८) या चित्रपटाच्या लेखनासाठी मामांची मदत घेतली. याच चित्रपटाच्या कथेवरून मामा वरेरकर यांनी पुढे ‘मलबार हिलच्या टेकडीवरून’ ही कादंबरी लिहिली.

     बाबूराव पेंढारकरांनी आपल्या नाटक कंपनीचे चित्रपटसंस्थेत रूपांतर केले आणि ‘विजयाची लग्ने’ (१९३६) हा बोलपट काढला. चित्रपटाची कथा, संवाद, गीतरचना आणि दिग्दर्शन मामा वरेरकरांचे होते. याच चित्रपटातून हंसा वाडकर या अभिनेत्री सर्वप्रथम पडद्यावर आल्या. सिर्कोच्या गीतासाठी त्यांनी संवाद आणि पद्यरचना करून दिली. हा चित्रपट खूपच गाजला होता.

     ‘सत्तेचे गुलाम’ हे मामांचे बहुचर्चित नाटक आहे. याच नाटकावरून केशव तळपदे यांनी ‘कारस्थान’ हा बोलपट काढला. चित्रपट यथातथातच जमला होता.

     संसद सभासद म्हणून भारताच्या राज्यसभेवर मामांची नियुक्ती झाली होती. त्यांना ‘पद्मभूषण’ किताब व ‘संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती’ही मिळाली होती. धुळे येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही मामांनी भूषवले होते. ‘माझा तारकी संसार’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

- द.भा. सामंत

वरेरकर, भार्गवराम विठ्ठल