वरखेडे, रमेश नारायण
रमेश नारायण वरखेडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील बेज या गावी झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक असल्याने सतत बदल्या होत असत. त्यामुळे वरखेडे यांचे प्राथमिक शिक्षण उमराणे, मोराणे, मुंजवाड, चौंधाणे या गावांच्या जिल्हा परिषदांच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण बेज गावच्या महात्मा फुले विद्यालयामध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मालेगाव येथील म.स. गायकवाड महाविद्यालयात घेतले. मराठी विषयात त्यांनी एम. ए. केले त्या वेळी पुणे विद्यापीठात ते पहिले आले व पाच पारितोषिकांचे मानकरी ठरले. ‘मराठी काव्यसमीक्षा विचार’ या विषयावरील प्रबंध सादर करून वरखेडे त्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली.
शिक्षण घेत असतानाच १९७२ ते १९७४ या दोन वर्षांत चाळीसगावच्या आ. वं. विद्यालय येथे लिपिक म्हणून व मालेगावच्या झुं. प. विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी व्यवसायास प्रारंभ केला. नंतर काही वर्षे ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते काम करीत होते. १९८८ मध्ये धुळे येथे का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून वरखेडे यांनी संस्थेच्या कार्याची आखणी व उभारणी केली. खानदेशच्या क्षेत्रमर्यादेतील विविध बोलींचे समाजभाषावैज्ञानिक सर्वेक्षण अभ्यासाचे प्रकल्प सुरू केले. स्थानिक लोकवाङ्मयाचे सर्वेक्षण संपादनाचे काम हाती घेतले. त्यासाठी एम. फिल., पीएच. डी. च्या विद्यार्थ्यांना तयार केले. प्राचीन हस्तलिखितांच्या अभ्यासाचे पायाभूत पुस्तक लिहवून घेतले. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील मराठीच्या महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षक-संशोधकांमध्ये वैचारिक अभिसरण व्हावे म्हणून ‘भारतीय मराठी अभ्यास परिषद’ स्थापन केली. तौलनिक साहित्याभ्यासासारखे अभ्यासक्रम सुरू केले. ‘श्रीवाणी’ नियतकालिक सुरू केले.
१९९० मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सामाजिक भाषाविज्ञानाचा अभ्यासक्रम तयार केला. त्यासाठी परिभाषा तयार केली. ‘समाजभाषाविज्ञान’ ‘प्रमुख संकल्पना’ हे पाठ्यपुस्तक लिहिले, शिक्षक प्रशिक्षणाची योजना कार्यान्वित केली.
नंतरच्या काळात हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनी स्वीकारला. प्रसारमाध्यमांतील भाषेचा वापर जनसंज्ञापन व शासन व्यवहारातील मराठीचा वापर लक्षात घेऊन १९८० मध्ये पुणे विद्यापीठात ‘व्यावहारिक मराठी’ चा अभ्यासक्रम आखण्यात त्यांनी पुढाकार घेतला त्यानुसार पहिले विद्यापीठीय पुस्तक लिहिण्याचा प्रयोग सहलेखकांच्या मदतीने प्रत्यक्षात आणला. असे अभ्यासक्रम यावेत म्हणून विद्यापीठीय अधिकारीमंडळात जाणीव निर्माण करण्यासाठी ‘मराठी अन्याय निर्मूलन समिती’ स्थापन केली व त्याचे सचिव म्हणून वरखेडे यांनी काम केले.
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची आखणी, पाठ्यपुस्तकांचे लेखन-संपादन या प्रक्रियेत विद्यापीठाच्या स्थापनेपासून डॉ. राम ताकवले व डॉ. भालचंद्र फडके यांनी वरखेडे यांना सामील करून घेतले. १९९३ पासून अनुदेशतंत्र विज्ञानाचे प्राध्यापक व ‘मानव्यविद्या आणि सामाजिक विद्या शास्त्रे’ शाखेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. स्वयं अध्ययनाच्या पद्धती शिकविण्यासाठी अनुदेशन साहित्याची निर्मिती त्यांनी केली आहे. सामान्यज्ञान व सामाजिक शास्त्रांच्या अधिष्ठान अभ्यासक्रमाची रचना केली. जीवन अभिरुचीसंपन्न करता यावे यासाठी ललितकलांचा अभिजात अभ्यासक्रम तयार केला. नागरिकत्व संस्कारित करणार्या अभ्यासक्रमांची आखणी केली. वृत्तपत्रिका व जनसंज्ञापन, ग्रंथालय व माहितीशास्त्र या क्षेत्रांत महाराष्ट्रांत सर्वप्रथम मराठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली. हे सर्व उपक्रम राबवीत असताना सृजनशीलता व सामाजिक बांधिलकी ठेवून नावीन्य निर्माण केले.
नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान रुजविण्यासाठी नाशिकमध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनिअरींग’ ही संस्था २००२ मध्ये वरखेडे यांनी स्थापन केली. या संस्थेत ‘संशोधन कक्ष’ निर्माण केला यामुळे नवसंशोधकांच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे.
‘क्रिटिकल एन्क्वायरी’ हे आंतर्विद्याशाखीय अभ्यासाचे संशोधनपर नियतकालिक काढून एका नव्या वैचारिक व्यासपीठाची निर्मिती त्यांनी केली आहे.
प्रा. डॉ. वरखेडे यांचे पहिले वैशिष्ट्यपूर्ण संपादन म्हणजे ‘अनुष्टुभ्’ हे वाङ्मयीन द्वैमासिक होय. त्यांचे संशोधनपर व वाङ्मयीन विषयांवरील अनेक लेख सत्यकथा, आलोचना या नियतकालिकांत प्रकाशित झाले आहेत.
साहित्य अकादमी दिल्ली-मराठी अभ्यासमंडळ, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई-नियामक मंडळ यांचे सदस्य म्हणून व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळ व संशोधन मंडळावर ते काम करीत आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे व्यवस्थापन मंडळ, विद्वत परिषद यांचेही ते सदस्य आहेत. नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची आखणी, पाठ्यपुस्तकांची निर्मिती, अध्ययन-अध्यापन पद्धती, अध्ययन साहित्य निर्मिती, प्रकल्प संयोजन असे विविधांगी कार्य प्रा. डॉ.रमेश वरखेडे आजही करीत आहेत.