Skip to main content
x

आकोटकर, नरसिंगजी महाराज

   अकोटचे संत नरसिंगजी महाराज शेगावचे विख्यात संत गजानन महाराज यांचे संतसांगाती म्हणून प्रसिद्ध होते. ते गजानन महाराजांपेक्षा वयाने खूप मोठे होते व गजानन महाराज नेहमीच त्यांना वडिलांचा मान देत असत. नरसिंगजी महाराज यांचा जन्म अकोट जवळील जळगाव नहाटे या गावी झाला. त्यांची नेमकी जन्मतिथी उपलब्ध नाही. त्यांच्या वडिलांचे नाव पुंजाजी व आईचे नाव राजूबाई होते. त्यांना रमाबाई नावाची एक सावत्र आईसुद्धा होती. नरसिंगजींना परशुराम व मांजाई ही दोन सख्खी आणि जानुजी, रघुनाथ अशी दोन सावत्र भावंडे होती. दगडाचे देव बनवून नरसिंगजी एकटेच खेळत असत. त्या काळी शिक्षणाच्या गावोगावी सोयी नव्हत्या व मातापित्यांना शिक्षणाचे फार महत्त्व वाटत नसे, त्यामुळे नरसिंगजींचे लौकिक शिक्षण झाले नव्हते. लग्नानंतर त्यांना तीन अपत्ये झाली. आता ते संसारात रमतील असे वाटत असतानाच नरसिंगजी ईश्वर ओढीने व्याकूळ झाले आणि त्यांनी संसार सुख असार मानून ते घर सोडून निघून गेले.

काही काळानंतर नरसिंगजींची थोर अवलिया संत कोतशहा अली यांच्याशी भेट झालीत्यांनी नरसिंगजींचा शिष्य म्हणून स्वीकार केला. नरसिंगजी गुरूजवळ राहून त्यांची सेवा करू लागले आणि एकवीस दिवस उपवास करीत त्यांनी कठोर साधना आरंभली. गुरूचा थेट सहवास, मार्गदर्शन आणि गुरुकृपा यांमुळे त्यांची साधना सिद्धीस गेली व गुरूंकडून त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. नरसिंगजींनी घरी परत यावे या इच्छेने घरच्या लोकांनी तुझी आई देवाघरी गेलीअसा खोटाच निरोप पाठविला. त्या निरोपाचाही नरसिंगजींवर परिणाम झाला नाही. मात्र गुरू कोतशहा यांनी त्यांना घरी जाण्याची आज्ञा केली. कोणी ब्रह्मपदाला पोहोचला तरी त्याहून आईचे स्थान श्रेष्ठ आहे, असा गुरूंनी त्यांना उपदेश केला. त्यानंतर नरसिंगजी घरी परतले; पण आईच्या निधनाची वार्ता खोटी आहे हे घरी जाताच त्यांच्या लक्षात आले व आईची समजूत घालून ते पुनश्च गुरुसेवेसाठी परतले.

पुढे त्यांना वाचासिद्धी प्राप्त झाली व ते बोलतील तसे घडू लागले. त्यांच्या या साक्षात्कारी शक्तीची कीर्ती सर्वदूर पसरली व दूरदूरचे भाविक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. वृद्धापकाळामुळे १८ जानेवारी १८८८, माघ शुद्ध पौर्णिमा रोजी नरसिंगजींनी सर्वांना सांगून समाधी घेतली. त्यांच्या या समाधी सोहळ्यास खुद्द शेगावचे गजानन महाराज जातीने उपस्थित होते. अकोट येेथे नरसिंगजींची समाधी आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलाचे ते निस्सीम भक्त होते. ते सगुण भक्तीच्या परमोच्च अवस्थेस पोहोचलेले होते. पंढरपूर मंदिरातील विठ्ठलमूर्तीला एक आततायी वेडा भक्त दगड मारतो व त्यामुळे मूर्तीच्या पायाला तडा जातो, ही घटना स्वप्नदृष्टान्ताने नरसिंगजींना कळली व ते मलमपट्टी करण्यास धावत पंढरपूरला गेले, अशी त्यांची विठ्ठल देवतेशी तादात्म्यता होती. विठ्ठलाच्या थोर भक्तांमध्ये अकोटच्या या अवलिया संताचा, नरसिंगजींचा भाविक भक्त अग्रक्रमाने समावेश करतात.

विद्याधर ताठे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].