Skip to main content
x

अनासपुरे, मकरंद मधुकर

         करंद मधुकर अनासपुरे या हरहुन्नरी कलाकाराने वेगळी शैली, प्रसंगावधान, अंगभूत अभिनयगुण आणि विनोदाची समज या वैशिष्ट्यांच्या जोडीला खास मराठवाडी भाषेची आणि उच्चारांची जोड या भांडवलावर रुपेरी पडद्यावरचा यशस्वी प्रवास केला आहे. रुपेरी पडद्यावरच्या यशासाठी फक्त देखणा चेहरा लागतो, हा समज खोटा ठरवत, चारचौघांसारखे सर्वसाधारण दिसणारे मकरंद आज मराठी चित्रपटातले आघाडीचे आणि लोकप्रिय कलाकार ठरले. मकरंद यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रुपेरी पडद्यावर यश मिळाल्यावर बहुतेक जण रंगभूमीकडे पाठ फिरवतात, याला त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने अपवाद निर्माण केला आहे. मराठी चित्रपटांमध्ये उदंड यश मिळवूनही मकरंद रंगभूमीवरही आणि छोट्या पडद्यावरही कार्यरत आहेत.

मकरंद मधुकर अनासपुरे यांचा जन्म औरंगाबाद येथे झाला. मकरंद यांचे वडील मधुकर आणि आई माधुरी हे दोघेही साधारण घरातले होते. घरात कलेचा वारसा फारसा नव्हता, पण मकरंद यांच्याकडे उपजतच कला होती. मकरंद यांचे सुरुवातीचे शिक्षण बीडला आणि नंतर औरंगाबादला झाले. ते विज्ञानाचे पदवीधर असून नाटकाच्या, अभिनयाच्या वेडामुळे त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राचीही पदवी मिळवली. महाविद्यालयीन जीवनापासूनच ते स्पर्धात्मक पातळ्यांवर चमकू लागले होते.

 मकरंद यांना रंगभूमीवर पहिली संधी मिळाली तीच सुयोगनिर्मित झालं एकदाचंया अशोक सराफ आणि सुधीर जोशी यांच्या नाटकातून!(१९९४). मराठी चित्रपटातले लोकप्रिय नायक म्हणून गाजणाऱ्या मकरंद यांचा पहिला चित्रपट मात्र हिंदी होता! यशवंतहा त्यांचा पहिला चित्रपट! त्यानंतर पहिला मराठी चित्रपट त्यांना मिळाला तो सरकारनामा’. या चित्रपटातूनच मकरंद यांच्या मराठवाडी बोलीचा ठसका रसिकांच्या परिचयाचा झाला आणि मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही! मकरंद यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य असे की, त्यांना स्वत:ची बलस्थाने वेळेवर आणि अचूक गवसली आहेत. त्यामुळे ती वैशिष्ट्ये सातत्याने वापरून अधिक धारदार, तीक्ष्ण बनवताना ते दिसत आहेत. अभिनयाच्या व संवाद उच्चारण्याच्या खास लकबीमुळे मकरंद लोकप्रिय अभिनेता झाले आहेत.

मकरंद यांनी गेल्या सुमारे पंधरा वर्षांत प्राधान्याने विनोदी चित्रपट केलेले दिसतात. पिपाणी’, ‘नवसाचं पोर,’ ‘असंच पाहिजे’, ‘नवं नवं’, ‘नाथा पुरे आता’, ‘सावरखेड एक गाव’, ‘काय द्याचं बोला’, ‘जबरदस्त’, ‘शुभमंगल सावधान’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘सासू नंबरी जावई दस नंबरी’, ‘दे धक्का’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘ऑक्सिजन’, ‘हापूसअसे अनेक यशस्वी चित्रपट मकरंद यांच्या नावावर आहेत. त्यांनी अभिनित केलेल्या चित्रपटांची संख्या ८० हून अधिक आहे. अर्थात विनोदी भूमिकांचे आधिक्य असले तरी प्रत्येक व्यक्तिरेखेत मकरंद यांचा खास स्पर्शदिसून येतो. मकरंद यांचे काम पाहताना विनोदी भूमिका ही अत्यंत गंभीरपणे घ्यायची गोष्ट आहेया विधानाची प्रचिती येते. अभिनयाच्या जोडीने मकरंद निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही उतरले आहेत. त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरागोष्ट छोटी डोंगराएवढी’ (२००९) या चित्रपटांची निर्मिती केली आणि डँबिस’ (२०११) हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला, तसेच या चित्रपटाच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. या चित्रपटाला बोस्टन आंतरराष्ट्रीय महोत्सवात स्पेशल इंडी स्पिरीट रेक्क्कनेशनपुरस्कार मिळाला.

मकरंद यांची पाच लाख चार लाख’, ‘हुरहुर’, ‘बकरी’, ‘सगळे एकापेक्षा एक’, ‘जाऊ बाई जोरातआणि केशवा माधवाही नाटके खूप गाजली. छोट्या पडद्यावर शकुन अपशकुन’, ‘बेधुंद मनाच्या लहरी’, ‘तो एक राजहंस’, ‘तिसरा डोळा’, ‘शेजार’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘गंगूबाई नॉन मॅट्रिक’, ‘जिभेला काही हाड’, ‘तू तू मै मैया मालिकांमधून, तसेच टिकल ते पॉलिटिकल’, ‘हास्यसम्राट’, ‘हफ्ताबंद, ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या रिअ‍ॅलिटी शोमधून त्यांनी कामे केली.

मकरंद यांनी यशवंत’, ‘निदान’, ‘वास्तव’, ‘वजूद’, ‘जिस देश मे गंगा रहता है’, ‘प्राण जाय पर शान न जायअसे हिंदी चित्रपट केले आहेत. तसेच हिरेवाली मुटीयाया भोजपुरी चित्रपटात काम केलेले आहे. मकरंद यांना काय द्याचं बोलासाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, ‘बघ हात दाखवूनसाठी संस्कृती कलादर्पण व महाराष्ट्र शासनाचा बेस्ट कॉमेडीअन, ‘डँबीससाठी अत्रे पुरस्कार, पु.ल. देशपांडे तरुणाई पुरस्कार, तसेच पहिला युवा बालगंधर्व पुरस्कार, २०१०-२०१२ या सलग तीन वर्षात महाराष्ट्राचा फेवरेट हा पुरस्कार, मराठवाडा भूषण, बीडच्या रोटरी क्लबचा चंपावतीरत्‍न पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा कलागौरव पुरस्कार, सह्याद्री प्रतिष्ठानचा श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कार असे, अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

मकरंद यांनी तीन वर्षांत मला एक चान्स हवा’, ‘तिचा बाप त्याचा बाप’, ‘दोन घडीचा डाव’, ‘डावपेच’, ‘अगडबमआणि मन्या सज्जनाहे लागोपाठ यशस्वी चित्रपट दिले आहेत.

‘नाम फाऊंडेशन या संस्थेची स्थापना नाना पाटेकर यांच्यासोबत मकरंद अनासपुरे यांनी केली. ह्या संस्थेची स्थापना सप्टेंबर, २०१५ मध्ये झाली. ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करते. सध्या या कार्यात मकरंद अनासपुरे यांनी स्वतःला झोकून दिले आहे.

- जयश्री बोकील

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].