Skip to main content
x

बेलवलकर, श्रीपाद कृष्ण

       डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी येथे झाला. ते २० महिन्यांचे असताना त्यांच्या मातोश्रींचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी व आत्याने त्यांचा सांभाळ केला. त्यांचे वडील खूप शिस्तप्रिय होते. त्यांचे शालेय शिक्षण वडिलांच्या देखरेखीखाली हेर्ले येथे झाले. शाळेत असताना त्यांना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय शिष्यवृत्ती मिळाली. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांचा विवाह एका सात वर्षांच्या मुलीशी झाला आणि या सहधर्मचारिणीने त्यांना पुढे साठ वर्षे साथ दिली.

     १८९७ मध्ये ते कोल्हापूरच्या राजाराम विद्यालयातून मॅट्रिक उत्तीर्ण झाले आणि नंतर राजाराम महाविद्यालयातून इंटरमीजिएट परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर ते पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामध्ये पुढील शिक्षणासाठी आले. १९०२ मध्ये ते इंग्रजी आणि संस्कृत घेऊन मुंबई विद्यापीठाचे बी.ए. झाले. नंतर डेक्कन महाविद्यालयाचे ‘दक्षिणा फेलो’ म्हणून त्यांची निवड झाली. बेलवलकर १९०४ मध्ये इंग्रजी व संस्कृत घेऊन एम.ए. झाले व नंतर इतिहास आणि राज्यशास्त्र विषय घेऊन १९०५ मध्ये एम.ए. झाले. १९०६ मध्ये त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन विद्यालयामध्ये वर्षभरासाठी शिक्षकाची नोकरी केली आणि नंतर ते डेक्कन महाविद्यालयाच्या हस्तलिखित संग्रहाचे क्युरेटर म्हणून नेमले गेले. तेथे त्यांनी प्रथम व्याकरणाच्या हस्तलिखितांची विवरणात्मक सूची, ‘डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग’ तयार केला. त्याच वेळेस त्यांनी ग्रीक आणि युरोपीय तत्त्वज्ञान हे विषय घेऊन पुन्हा एम.ए. केले. त्याच सुमारास त्यांनी ‘सिस्टिम्स ऑफ संस्कृत ग्रमर’ हा निबंध लिहिला. याच शीर्षकाचे त्यांचे पुस्तक असून ते अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक मानले जाते.

     याच काळात डॉ. श्रीपाद बेलवलकर यांनी हार्वर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर जे.एच. वूड्स यांना त्यांच्या संशोधनकार्यात सहकार्य केले आणि याचाच परिणाम म्हणून त्यांना पुढील शिक्षणासाठी हार्वर्डला बोलावले गेले. १८ मे १९१२ रोजी बेलवलकर अमेरिकेला रवाना झाले. हार्वर्डला त्यांनी प्रोफेसर सी.आर. लानमन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उत्तररामचरित’ या विषयावर प्रबंध लिहिला आणि १९१४ मध्ये त्यांना पीएच.डी. मिळाली. त्यांचा प्रबंध नंतर हार्वर्ड ओरिएंटल सिरीज क्र. २१ मध्ये प्रकाशित झाला. ते १६ सप्टेंबर १९१४ रोजी मुंबईला परतले. १९१५ मध्ये त्यांच्या प्रबंधाचे मराठी भाषांतर प्रकाशित झाले. अमेरिकेहून परतल्यानंतर डॉ. बेलवलकरांची डेक्कन महाविद्यालयामध्ये संस्कृत प्राध्यापक या पदावर नियुक्ती झाली. ते या पदावर पुढील अठरा वर्षे होते. याच काळात त्यांनी अनेक ग्रंथ आणि शोधनिबंध लिहिले.

     सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, प्रो. व्ही.जी. विजापूरकर, डॉ. सी.आर. लानमन हे त्यांचे गुरू आणि आदर्श होते. बेलवलकरांवर लोकमान्य टिळकांच्या कर्मयोग तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. बेलवलकरांनी जेव्हा टिळकांना सांगितले, की सर भांडारकरांच्या नावाने त्यांचे शिष्य एक संस्था स्थापन करीत आहेत, तेव्हा त्यांनी बेलवलकरांना ह्या कार्यासाठी पाठिंबा दिला आणि संस्थेच्या उभारणीसाठी एक हजार रुपये दिले.

     १९२५ मध्ये डॉ. व्ही.एस. सुखटणकरांनी प्रमुख संपादक ह्या नात्याने महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे काम भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात सुरू केले. त्यातील भीष्मपर्वाचे काम डॉ. बेलवलकरांनी केले. जानेवारी १९४३ मध्ये डॉ. सुखटणकरांना अचानक मृत्यू आला आणि सर्वांनुमते प्रमुख संपादकाची जबाबदारी डॉ. बेलवलकरांवर सोपवली गेली. त्यांनी अठरा वर्षे (१९४३ -१९६१) ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांनी भीष्म, शांति, आश्रमवासिक, मौसल, महाप्रस्थानिक आणि स्वर्गारोहण या पर्वांचे संपादन केले.

     १९२७ - १९३३ या काळात डॉ. बेलवलकर भांडारकर संस्थेचे सचिव होते. त्यांच्या काळात डेक्कन महाविद्यालयामधील हस्तलिखितांचा शासकीय संग्रह भांडारकर संस्थेस सांभाळण्यासाठी दिला गेला. १९३४ मध्ये तेव्हाच्या मुंबई सरकारने डेक्कन महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. डॉ. बेलवलकरांनी डॉ. जयकर आणि डॉ. काणे ह्यांच्या मदतीने त्याला विरोध केला; पुढे सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला. बेलवलकरांना संघटनात्मक कामात रस होता, त्याहून अधिक रस त्यांना विद्याव्यासंगात होता. त्यांनी अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या पहिल्या अधिवेशनापासून त्यात भाग घेतला आणि अनेक निबंध सादर केले. ते या परिषदेच्या बनारस येथे १९४३ साली झालेल्या अधिवेशनात मुख्य अध्यक्ष (जनरल प्रेसिडेंट) झाले. त्यांनी अनेक विद्वानांच्या गौरवासाठी काढलेल्या ग्रंथांत लेख लिहिले. डॉ. बेलवलकरांना शिकवण्याची आवड होती. त्यांनी बी.ए.च्या आणि एम.ए.च्या विद्यार्थ्यांचेही अध्यापन केले. त्यांनी शांकर आणि रामानुज मतांनुसार वेदान्त तत्त्वज्ञान, प्राचीन भारतीय संस्कृती, सांख्य आणि योग अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने दिली. भांडारकर संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात त्यांनी भगवद्गीतेवर २५ व्याख्याने दिली. १९४१ मध्ये भगवद्गीतेच्या ज्ञानकर्मसमुच्चय टीकेचे संपादन केले. ही टीका आनंदवर्धनाची असून त्याचे एकुलते एक हस्तलिखित शारदा लिपीमध्ये आहे. नंतर त्यांनी ह्या टीकेचे इंग्रजी भाषांतरही केले.

     त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांचे ‘रामज लेटर हिस्टरी ऑर उत्तररामचरित’ हेही उल्लेखनीय पुस्तक आहे. त्यांनी दंडीच्या काव्यादर्शाचे संपादन आणि इंग्रजी अनुवाद केला. तसेच, शांकरभाष्यासहित ब्रह्मसूत्राचे संकलन व सटीप इंग्रजी भाषांतर केले. प्रा. रा.द. रानडे यांच्यासोबत ‘हिस्टरी ऑफ इंडियन फिलॉसॉफी’च्या दुसर्‍या भागाचे म्हणजे ‘क्रिएटिव्ह पीरियड’चे लेखन केले. कलकत्ता विद्यापीठाने आयोजित केलेली ‘बासू मल्लिक लेक्चर्स ऑन वेदान्त फिलॉसॉफी’ ही डॉ. बेलवलकरांची व्याख्याने प्रकाशित केली गेली आणि विद्वानांनी त्यांच्या विद्वत्तेचे कौतुक केले. त्यांनी अनेक लेखही लिहिले. उदा. ‘लिटररी स्ट्रॅटा इन ऋग्वेद’, ‘कॅनन्स ऑफ टेक्स्च्युअल अ‍ॅण्ड हायर क्रिटिसिझम अ‍ॅज अप्लाइड टू द शाकुंतल ऑफ कालिदास’, ‘अंडरकरंट्स इन जैनिझम’, ‘रिलेशन बिटवीन भासज चारुदत्त अ‍ॅण्ड शूद्रकज मृच्छकटिक’, ‘ओरिजिन ऑफ इंडियन ड्रामा’, ‘जैमिनिज शारीरक सूत्र’, ‘श्वेताश्वेतर उपनिषद् अ‍ॅण्ड भगवद्गीता’, ‘द भगवद्गीता ‘रिडल’ अनरिडल्ड, अ‍ॅटिट्यूड ऑफ हिंदूइझम टुअडर्स द प्लेझर्स ऑफ द वर्ल्ड’, ‘श्री शंकराचार्यांचा कालनिर्णय’, ‘श्री शंकराचार्य आणि रहस्यकार’, ‘अभिज्ञानशाकुंतल नाटकाची पाठपरंपरा’ इत्यादी. या अनेक लेखांचा विद्वानांनी त्यांच्या अभ्यासात अनेकदा उल्लेख केलेला आढळतो. डॉ. श्रीपाद बेलवलकर यांचे वेद, व्याकरण, आर्ष महाकाव्ये, अभिजात संस्कृत साहित्य, काव्यशास्त्र, भारतीय तत्त्वज्ञान इत्यादी विषयांतील योगदान हे उल्लेखनीय आहे.डॉ. बेलवलकरांचा मृत्यू पुण्यात झाला.

     - डॉ. मैत्रेयी देशपांडे

बेलवलकर, श्रीपाद कृष्ण