Skip to main content
x

भाभा, होमी जहांगीर

भारतीय अणुसंशोधन कार्यक्रमाचे जनक असलेले भौतिकशास्त्रज्ञ. एका सधन, सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात जन्माला आलेले होमी जहांगीर भाभा अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. याची झलक शालेय शिक्षणापासूनच दिसून आली होती. त्यांचे वडील जहांगीर होरमसजी भाभा बॅरिस्टर होते आणि टाटा उद्योग समूहाचे ते कायदा सल्लागार होते. आई मेहेरबाई ही सर दिनशा पेटिट यांची नात होती आणि आत्या मेहेरबाई ही सर दोराब टाटा यांची पत्नी होती. अशा तऱ्हेने टाटा आणि पेटिट या दोन आघाडीच्या पारशी कुटुंबांशी त्यांचे जवळचे नाते होते. या दोन्ही कुटुंबांनी भारताच्या औद्योगिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचा हातभार लावला होता. तोच वारसा भाभा यांनी समर्थपणे पुढील आयुष्यात चालवला. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील आधुनिक भारताचे शिल्पकार हे बिरुद त्यांना सर्वार्थाने लागु होते.

त्यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीची सुरुवात ते केम्ब्रिजला असतानाच झाली. मुंबई येथे शालेय व प्राथमिक स्वरूपाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी केम्ब्रिजला गेले. त्यांनी तेथे यंत्र अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन टाटा समूहातील उद्योगधंद्यांमध्ये हातभार लावावा, असा त्यांच्या वडिलांचा विचार होता. पण ज्या काळात ते केम्ब्रिजला होते, तो भौतिकशास्त्राचा सुवर्णकाळ होता. आधुनिक भौतिकशास्त्राची पायाभरणी त्या वेळी केली जात होती. इंग्लंड, तसेच युरोपात दिग्गज वैज्ञानिक विश्वरचनेसंबंधी नवनवे सिद्धान्त मांडत होते. अणूच्या अंतरंगात डोकावून पाहण्यास सुरुवात झाली होती. या सर्वाने प्रभावित होऊन भाभांनी आपला कलही भौतिकशास्त्राकडेच असल्याचे आपल्या वडिलांना आवर्जून सांगितले.

यंत्र अभियांत्रिकीमधील ट्रायपॉस म्हणजेच पदवी पहिल्या वर्गात मिळवून वडिलांची इच्छा पूर्ण केल्यावर त्यांनी भौतिकशास्त्राच्या उच्च शिक्षणास प्रारंभ केला. वूल्फगँग पाऊली आणि एन्रिको फर्मी या भविष्यातील नोबेल पुरस्कारविजेत्यांच्यासमवेत संशोधन करण्याची संधी त्यांना मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा करून घेऊन त्यांनी काही शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांनी भाभांचे नाव सर्वतोमुखी केले. त्यांना काही नावाजलेल्या शिष्यवृत्त्यांचा लाभ झाला. विश्वकिरणांचा वर्षाव कसा होतो यासंबंधीचा जर्मन शास्त्रज्ञ हाइटलर यांच्या सहकार्याने सादर केलेला त्यांचा सिद्धान्त गाजला. भाभा-हाइटलर कास्केड थिअरीया नावानेच तो आजही ओळखला जातो. या मौलिक संशोधनाने भाभांना जगन्मान्यता मिळाली. भौतिकशास्त्रातल्या संशोधनाची अशी नवनवी शिखरे गाठत असतानाच, भाभा छोट्याशा सुटीसाठी घरी आले होते. पण युरोपात अकस्मात उसळलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या आगडोंबाने त्यांची परतीची वाट बंद केली. ही घटना भाभांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सयेथे आपले संशोधन पुढे सुरू ठेवताना, त्यांना येथेही उच्च दर्जाचे संशोधन करणे शक्य आहे याची जाणीव झाली. काही तरुण प्रतिभाशाली वैज्ञानिकांची साथही त्यांना लाभली. सी.व्ही. रमण यांचा सहवास लाभला. वयाच्या केवळ बत्तिसाव्या वर्षी एफ.आर.एस., फेलो ऑफ रॉयल सोसायटीचा बहुमानही त्यांना मिळाला आणि आपल्या मातृभूमीतच अशा संशोधन केद्रांची मुहूर्तमेढ रोवण्याचे स्वप्न ते पाहू लागले.

त्यांच्या राष्ट्रप्रेमाची आणि द्रष्टेपणाची प्रचिती त्यांनी १९४४ साली टाटा न्यासाला लिहिलेल्या पत्रातून दिसून येते. अणू हा अविभाज्य नसून त्याचेही विघटन होऊ शकते आणि तसे ते झाल्यावर अणुकेंद्रकात बंदिस्त रुपात असलेली मोठ्या प्रमाणातली ऊर्जा मुक्त होते हे हान आणि मिटनर या जर्मन शास्त्रज्ञांनी दाखवून दिल्याला त्या वेळी केवळ सहा-सात वर्षेच झाली होती. तेच सूत्र पुढे चालवीत या अणुविभाजनाची साखळी प्रक्रिया घडवून आणली जाऊ शकते, असे भाकीत फर्मी यांनी त्यानंतरच्या दोन वर्षांत केले होते. ते केवळ सैद्धान्तिक रूपात न ठेवता, त्या शक्यतेवर आधारित पहिली प्रायोगिक अणुभट्टी फर्मी यांनीच इतर ख्यातनाम वैज्ञानिकांच्या मदतीने शिकागो विद्यापीठातल्या स्क्वाश कोर्टाच्या जागेत बांधल्यालाही उणीपुरी दोनच वर्षे झाली होती. त्याची बातमीही तशी गुप्तच ठेवण्यात आली होती. अशा परिस्थितीत अणुऊर्जेचे महत्त्व जाणून त्यासंबंधीच्या एक सर्वांगीण कार्यक्रमाचा आराखडा बनवण्याचा विचार भाभांनी त्या पत्रातून मांडला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘भौतिकशास्त्रामधील आघाडीवरच्या क्षेत्रात उच्चदर्जाचे संशोधन करणारी संस्था मुंबईत स्थापन करावी अशी कल्पना माझ्या मनात बरेच दिवस घोळत आहे. या योजनेसंबंधीचा आराखडा विश्वस्तांपुढे मांडण्यासाठी सोबत पाठवीत आहे. ही योजना मी अगदी पूर्ण विचारान्ती बनवलेली आहे. येत्या दशकात अणुशक्ती हा एक फार महत्त्वाचा घटक ठरणार आहे. या शक्तीचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी होणे जरुरीचे आहे. अशा वेळी या क्षेत्रामधील तज्ज्ञ मंडळी आपल्याकडेच तयार होणे निकडीचे आहे.

हे पत्र लिहिताना भाभांचे वय होते अवघे पस्तीस वर्षांचे. तरीही ही केवळ सळसळत्या तारुण्यातली कल्पनेची भरारी नव्हती. तो देशाच्या भविष्यातल्या जडणघडणीचा पाया होता. अणुउर्जानिर्मितीसाठी ज्याचा इंधन म्हणून वापर केला जातो, त्या युरेनियमची भारतात चणचण आहे याचीही जाणीव त्यांना होती. उलटपक्षी, देशात थोरियमचा प्रचंड साठा आहे हेही त्यांनी ओळखले  होते. थोरियम हे विघटनशील नसल्याने, त्याचा अणुऊर्जानिर्मितीसाठी इंधन म्हणून थेट वापर करता येत नाही. हे उमजून त्यांनी या थोरियमचे इंधनात रूपांतर करून त्याच्या मदतीने फार मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करण्याचा तीन टप्प्यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमही त्याच वेळी आखला होता. इतकी दूरदृष्टी क्वचितच एखाद्या नेत्यांमध्ये आढळून येते.

त्यांच्या या पत्राला प्रतिसाद मिळाला तो त्यांच्याच प्रवृत्तीच्या दुसऱ्या एका तरुणाकडून, जेआरडी टाटांकडून. त्यांनी भाभांच्या प्रस्तावाला टाटा न्यासाच्या विश्वस्तांकडून संमती मिळवली आणि त्यानंतर वर्षभरातच, १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर दोन वर्षांमध्येच भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आपल्या मनीचा कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्याची संधी भाभांना मिळाली. जवाहरलाल नेहरूंनी भाभांच्या कार्यक्रमाचे राष्ट्रहिताच्या संबंधीचे महत्त्व ओळखून अणुशक्ती आयोगाची स्थापना केली आणि त्याची सूत्रे भाभांच्या हातात सोपवली.

त्यानंतर भाभांनी त्या आयोगाच्या अखत्यारीखाली अनेक संस्थांची स्थापना केली. अणुशक्ती संशोधन केंद्र म्हणजेच आताचे भाभा अणू संशोधन केंद्र, इंडियन रेअर अर्थ्स, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या त्यांतल्या काही प्रमुख संस्था. यांतल्या काही तर आता स्वायत्त बनून औद्योगिक स्तरावर काम करत आहेत.

या प्रवासातले पहिले पाऊल म्हणून भाभांनी १९५६ साली अप्सराही संपूर्ण भारतीय बनावटीची आणि भारतीय तंत्रज्ञांनी बांधलेली अणुभट्टी कार्यान्वित केली. आणि तिच्या यशाने मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर अणुवीजनिर्मितीच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला चालना दिली. तारापूरचे पहिले केंद्र अमेरिकेकडून तयार रूपात मिळालेले असले तरी त्यानंतरच्या अणुवीज केंद्रांची निर्मिती करताना, तेथील अणुभट्ट्या संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानावर आधारित असतील, याचीही खातरजमा करून घेतली. आज कार्यरत असलेल्या अणुवीज केंद्रांपैकी नव्वद टक्के केंद्रे भारतीय तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तसेच त्यांचे घटकही फार मोठ्या प्रमाणात स्वदेशी बनवलेले आहेत.

अणुभट्ट्यांची बांधणी, आण्विक इंधनाची निर्मिती, आण्विक कचऱ्याची विल्हेवाट, जळित इंधनापासून तयार झालेले प्लुटोनियम शुद्ध स्वरूपात अलग करणारे कारखाने, समस्थानिकांचे उत्पादन, त्यांचा वापर शेती, उद्योगधंदे आणि आरोग्यसेवा यांच्यासाठी करणारी केंद्रे, जड पाण्याचे उत्पादन करणारे कारखाने, त्यांनी त्यानंतर एका पाठोपाठ एक वेगाने स्थापन केले. ते चालवण्यासाठी त्यांनी परदेशी तज्ज्ञांना साकडे घातले नाही, तर त्यासाठीचे मनुष्यबळही स्वदेशी असेल, याचीही काळजी घेतली. जगभरातून त्यांनी प्रतिभाशाली तरुणांना शोधून काढून त्यांच्या हाती या कार्यक्रमांची धुरा सोपवली. त्यासाठीचे आवश्यक ते प्रशिक्षण घेण्यासाठी या तरुणांना देशविदेशांच्या उत्तमोत्तम संस्थांमध्ये पाठवले. तिथून या उमलत्या विज्ञानशाखेतील उच्च शिक्षण आत्मसात करून आलेल्या तरुणांना त्यांनी आधुनिक राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला वाहून घेण्याची प्रेरणाही दिली. यांपैकी बहुसंख्य शिष्यांनी आपल्या गुरूच्या आकांक्षा सफल तर केल्याच; पण त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे आपली सारी कारकीर्द त्यांनी देशातच व्यतीत केली. विदेशातल्या प्रलोभनांना बळी न पडता, त्यांनी नेटाने भाभांच्या स्वप्नांना साकार करण्याचे प्रयत्न केले.

भौतिकशास्त्रातला त्यांचा मूळचा आवडीचा प्रांत होता विश्वकिरणांचा. साहजिकच, अवकाश संशोधनही त्यांच्या मनाला साद घालत होते. त्याचीही त्यांनी पायाभरणी केली. भारतीय अवकाश संशोधन केंद्राची स्थापनाही केली. त्यात त्यांना डॉ. विक्रम साराभाई यांचीही मोलाची साथ मिळाली. तेव्हा अंतराळ संशोधन कार्यक्रमाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवून भाभांनी परत अणू संशोधनाकडे लक्ष वळविले. या दोन्ही क्षेत्रांतील संशोधनाला इलेक्ट्रॉनिक यंत्रणांची साथ मिळणे अत्यावश्यक आहे हे समजून त्यांनी त्याही क्षेत्रातील संशोधनासाठी इलेक्ट्रॉनिक आयोगाची स्थापना केली. त्याचाही विस्तार आज अनेक शाखांमध्ये झाला आहे. रेण्वीय जीवशास्त्र, नाभिकीय वैद्यक, अशा आधुनिक विज्ञानाच्या अनेक शाखांमधील मूलभूत संशोधनाला त्यांनीच चालना दिली. त्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांची स्थापनाही केली.

या संस्थास्थापनांसंबंधीच्या त्यांच्या कल्पनाही चाकोरीबाहेरच्या होत्या. त्यांनी आधुनिक विज्ञानातील कोणतीही शाखा वर्ज्य न मानता, त्या विषयात अत्युच्च दर्जाचे संशोधन करण्याची क्षमता असणाऱ्या वैज्ञानिकांचा प्रथम शोध घेतला आणि त्यांना केंद्रस्थानी ठेवून संस्थांची निर्मिती केली. प्रथम इमारत बांधा आणि मग त्यांच्यामध्ये वास करू शकणाऱ्या वैज्ञानिकांना आवाहन करा, ही नेहमीची प्रथा त्यांनी मोडीत काढली.  

अणुशक्ती संशोधनासंबंधीच्या त्यांच्या सर्वांगीण योगदानाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली. १९५५ साली व्हिएन्ना येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अणुशक्ती परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यांनी ती सार्थही ठरवली.

वैज्ञानिक, तसेच अनेक  संशोधनसंस्थांची स्थापना करणारे धुरीण म्हणून आज जगाला त्यांची माहिती असली, तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. अणुशक्तीच्या अर्थशास्त्राचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता. अणुशक्तीद्वारे निर्माण केलेली वीज किफायतशीर आहे हे त्यांनी दाखवून दिले होते. त्यांना अभिजात पाश्चात्त्य संगीताची विलक्षण आवड होती. ते उत्तम चित्रकार होते. त्यांनी स्वत: काढलेली आधुनिक शैलीतली अनेक चित्रे टाटा मूलभूत संशोधन संस्थेत इतर ख्यातनाम भारतीय चित्रकारांच्या कलाकृतींसमवेत विराजमान झालेली आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या बहुतांश संशोधन संस्थांमध्ये त्यांनी सुंदर आणि कलात्मक उद्यानेही उभी केली आहेत. त्यांची रचना त्यांनी जातीने आखली होती आणि त्या उद्यानांतील झाडांची निवडही त्यांनीच केली होती. या संस्थांच्या इमारतींसाठीची जागा निवडतानाही त्यांनी त्या परिसराच्या निसर्गसौंदर्यालाही महत्त्व दिलेले आढळून येते. तसेच इमारतींचे बांधकाम करताना, त्या सौंदर्याला बाधा येणार नाही याचीही काळजी घेतलेली दिसून येईल.

अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या होमी भाभांचे स्वित्झर्लंडमधील माँ ब्लां या पर्वतशिखरावर आदळून झालेल्या विमान अपघातात अकाली निधन झाले.

डॉ. बाळ फोंडके

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].