Skip to main content
x

भिडे, विजयकुमार विनायक

      विजयकुमार भिडे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील विनायक भिडे हे विलायतेतून (इंग्लंडमधून) आय.सी.एस. होणाऱ्या मोजक्या भारतीयांपैकी होते. मात्र विजय भिडे यांच्या जन्मानंतर तीनच महिन्यांनी विनायकरावांचे निधन झाल्याने आई माणिकबाई अमरावती येथे आपल्या वडिलांकडे - सर मोरोपंत जोशी यांच्याकडे - राहण्यास गेल्या. विजय भिडे यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी मराठी माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण डेहराडूनच्या डून स्कूल मध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण काही दिवस प्रयागच्या अलाहाबाद विद्यापीठात आणि पुढे मुंबईच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे झाले.

     त्याच काळात महायुद्ध पेटल्याने विजय भिडे भारतीय सैन्य प्रबोधिनी (इंडियन मिलिटरी अ‍ॅकेडमी) मध्ये दाखल झाले. तेथून १९४२ मध्ये त्यांची निवड सेनादलांच्या अभियांत्रिकी विभागात ‘बॉम्बे सॅपर्स’ मध्ये झाली. चिलखती दलासोबत (आर्मर्ड कोअर) असणार्‍या सदतिसाव्या फिल्ड स्क्वॉड्रनमध्ये त्यांची नियुक्ती झाली. १९४४ मध्ये त्यांची स्क्वॉड्रन ब्रह्मदेशात अराकान प्रांतात आजाद हिंद सेनेसोबत आलेल्या जपानी फौजांशी लढण्यासाठी पाठविण्यात आली. १९४५ मध्ये त्यांना मोटार सायकलवर अपघात झाल्याने आजारपणाच्या रजेवर मीरत येथे पाठविण्यात आले. तेथूनच त्यांना वायव्य सरहद्द प्रांतात टोळीवाल्यांच्या बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले. १९४६ मध्ये जागतिक महायुद्धानंतरही लढाया सुरूच असलेल्या इंडोनेशियात त्यांच्या तुकडीला पाठविले गेले. तेव्हा विजय भिडे कॅप्टनपदी कार्यरत होते.

      तेथून परत आल्यावर त्यांनी पुण्यातील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयातून (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग) ए.एम.आय.इ. पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांची लगेच आसाम प्रांतात चार प्रमुख रस्ते बनविण्याच्या कार्यावर नेमणुक झाली. या चारही प्रमुख महामार्गांचे त्यांनी सर्वेक्षणापासून बांधणीपर्यंतचे काम तीन वर्षांत पूर्ण केले.

     १९५२ मध्ये विजय भिडे यांचा विवाह कुसुम करोडे यांच्यासोबत झाला. त्याच सुमारास त्यांची जम्मू जवळ नगरोठा येथे सव्विसाव्या डिव्हीजनमध्ये लेफ्ट. कर्नल पदावर नियुक्ती झाली. तेथून लवकरच अंबाल्याला चौथ्या डिव्हिजनच्या ‘कमांडर - इंजिनिअर्स’ या पदावर भिडेंची नियुक्ती करण्यात आली. तेथील तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जन. महादेव सिंग, जन. सेन आणि जन.कौल या तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत कार्य केले. तेथून त्यांची बदली १९५७ मध्ये सिमला येथे भूसेनेच्या पश्चिम विभागाच्या मुख्यालयात करण्यात आली.

     १९५९ ते १९६२ या काळात विजय भिडे वरीष्ठ अधिकारी पाठ्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती ‘कर्नल’ पदावर पुण्याच्या सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयात युद्ध अभियांत्रिकी विभागाचे (कॉम्बॅट इंजिनिअरिंग) विभाग प्रमुख म्हणून झाली. तेथून लगेच १९६४ मध्ये त्यांना ब्रिगेडियर पदी बढती मिळाली आणि त्यांची बदली भूसेनेच्या मध्य विभागात सैनिकी अभियांत्रिकी विभागाच्या नागपूरस्थित  भांडार विभागात झाली.

     १९६५ च्या वर्षात पाकिस्तानसोबत युद्धाचे वातावरण तयार होताच विजय भिडे यांना अकराव्या कोअरचे प्रमुख अभियंता म्हणून जालंदर येथे घाईघाईने नियुक्त केले गेले. लेफ्ट. जन. जोगिंदर सिंग धिल्लाँ हे तेव्हा अकराव्या कोअरचे कमांडर होते. याच युद्धात डेरा बाबा नानक येथे झालेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण लढाईत भारतीय सेनेला माघार घ्यावी लागताच विजय भिडे यांना एका ब्रिगेडचे नेतृत्त्व देऊन तेथे पाठविण्यात आले. भिडे यांच्या अधिपत्याखालील सेनेने शत्रूसैन्याला त्या भागातून हुसकावून लावले.

     याच युद्धात खेमकरण भागातही दि.८ सप्टेंबर १९६५ रोजी पाकिस्तानने जोरदार हल्ला केला होता. इथल्या एका खेड्याच्या नावावरून ‘बॅटल ऑफ असल उतार’ या नावानेही ही लढाई ओळखली जाते. पहिल्या हल्ल्याच्यावेळी तेथे भारतीय तोफखाना नव्हता. केवळ सुरुंगांच्या मदतीने विजय भिडे यांच्या नेतृत्त्वाखालील ब्रिगेडने खेमकरण भारताच्या हातून जाता जाता वाचविले. त्यानंतर या भागावर पाकिस्तानच्या पहिल्या आर्मर्ड डिव्हिजनने पूर्ण ताकदीने हल्ला केला. पुढे पाकिस्तानचे अध्यक्ष झालेले मुशर्रफ हे त्यावेळी लेफ्टनंट पदावर याच पहिल्या आर्मर्ड डिव्हिजनमध्ये कार्यरत होते. दुसर्‍या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी रणगाडा लढाई मानली जाते. त्यावेळी झालेल्या जबरदस्त लढाईत खेमकरण राखतानाच पाकिस्तानचे एकशेपाच पॅटन रणगाडे भारताने ताब्यात घेतले. अभेद्य समजले जाणारे तीनशे पॅटन रणगाडे या लढाईत भारतीय रणगाड्यांच्या हल्ल्यात नष्ट झाले. एकशेपाच पॅटन रणगाडे ज्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले, त्या ठिकाणाला ‘पॅटन नगर’ असेच नाव दिले गेले आहे. या लढाईत विजय भिडे यांच्या नेतृत्त्वाखालील अभियांत्रिकी दलाने उत्तम काम केले. भारतीय चिलखती दलाला आणि रणगाडा डिव्हिजनला खेमकरणच्या विभागातील बिआस नदीच्या परिसरातील मऊ मातीच्या भागात या अभियांत्रिकी मदतीचा चांगला उपयोग झाला. पाकिस्तानी रणगाड्यांना त्यांच्या अभियांत्रिकी विभागांकडून इतकी चांगली पाठराखण मिळाली नाही.

     या लढाईनंतर या भागाचे सैन्य प्रमुख अकराव्या कॉर्पस्चे  कमांडर लेफ्टनंट जनरल जोगिंदरसिंग धिल्लाँ यांची बढती झाली आणि त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल बी.एम.कौल यांची नियुक्ती झाली. त्यांनी संपूर्ण सीमेवर कुंपण व तटबंदी बांधण्याचे (‘फोर्टिफिकेशन’) आदेश विजय भिडे यांना दिले. त्यांनी संपूर्ण भारत-पाक सीमारेषेचे सर्वेक्षण करून योग्य ते आराखडे तयार केले. संपूर्ण सीमेवरच्या कुंपणाचे हे काम भिडे यांनी उच्च दर्जा राखून पार पाडले. स्थानीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने त्यांनी हे काम पार पाडले. भिडे यांनी आरेखन केलेले ही तटबंदी व कुंपण, काँक्रिटचे स्तंभ आजही मजबुतीने उभे आहेत.

     त्यानंतर त्यांची राष्ट्रीय रक्षा महाविद्यालयात नियुक्ती झाली होती. परंतु सूत्रे हाती घेण्यापूर्वीच एका परिषदेत भाग घेण्यासाठी जात असता त्यांच्या जीपचा गंभीर अपघत झाला. त्यात त्यांच्या मणक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना ती नियुक्ती स्वीकारता आली नाही.

     एप्रिल १९६८मध्ये विजय भिडे यांची नियुक्ती ब्रिगेडियर पदावर अभियांत्रिकी कर्मचारीवर्गाचे प्रमुख म्हणून झाली. या पदावर तीन वर्षे ते ‘बॉम्बे’, ‘मद्रास’, ‘बंगाल’ या सर्व ‘सॅपर्स’ (लढाऊ सैनिकी अभियांत्रिकी पलटणी) व अन्य ठिकाणचे गैरलढाऊ अभियांत्रिकी गट (नॉन काँबॅट इंजिनिअरिंग ग्रुप) यांचे प्रमुख होते.

     १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या (बांगलादेश युद्ध) काही दिवस आधी त्यांची नियुक्ती भूसेनेच्या पूर्व विभागाचे मुख्य अभियंता म्हणून झाली. त्यावेळी भूसेनेच्या पूर्व विभागाचे प्रमुख लेफ्ट. जन. अरोरा आणि ‘चिफ ऑफ स्टाफ’ लेफ्ट. जन. जे.एफ.आर. जेकब हे होते. या युद्धाच्या वेळी पूर्व सीमेवर नद्या ओलांडण्याचे सैनिकी अभियांत्रिकी साहित्य वेळेत पोहोचले नव्हते. तेे सर्व साहित्य रायपूर येथील सैन्य अभियांत्रिकी भांडारात होते. या साहित्याशिवाय नद्यांच्या मुखांनी भरलेल्या पूर्व पाकिस्तानवर खोलवर चढाई करणे शक्य नव्हते.

    पाकिस्तानी सैन्याने सर्व पूल उद्ध्वस्त केले होते. अखेर भूसेनेच्या पूर्व विभागाने पूर्व पाकिस्तानवर (आताचा बांगलादेश) संपूर्ण आक्रमण करून बांगलादेश मुक्त करण्याचे ठरविले. त्यासाठी लेफ्टनंट जनरल अरोरा यांनी विजय भिडे यांना सर्व अभियांत्रिकी सहकार्य करण्यास सांगितले. मुख्य अभियंता भिडे यांनी आपले सर्व संपर्क आणि कौशल्य पणाला लावून रायपूर येथील भांडारातून सर्व आवश्यक अभियांत्रिकी साहित्य सीमा भागात नियोजित ठिकाणी वेळेवर पोहोचेल याची व्यवस्था केली. पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी या साहित्याच्या वाहतुकीची चोख व्यवस्था केली. तीन आठवड्यात सर्व साहित्य नियोजित स्थळी पोहोचल्यावर लगेच पूर्व पाकिस्तानवर चढाई सुरू झाली. लवकरच पूर्व पाकिस्तानचा पाडाव होऊन बांगला देश मुक्त करण्यात आला. चौराण्ण्यव हजार पाकिस्तानी युद्धकैदी भारताच्या ताब्यात आले.

    या युद्धातील युद्धकैद्यांना भारतात आणण्याचे काम मोठे होते. या परिसरातील सर्व खाजगी नावा व जहाजे ताब्यात घेऊन भिडे यांनी या युद्धकैद्यांना नारायणगंज येथून कलकत्त्यात आणले. पाकिस्तानने उद्ध्वस्त केलेले सर्व पूल पुन्हा बांधण्याचे अत्यंत महत्त्वाचे कामही विजय भिडे यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांच्या अखत्यारीतील सैनिकी अभियांत्रिकी दलांनी पाकिस्तानी फौजांनी उद्ध्वस्त केलेले रस्ते, विमानतळ, बंदरे इत्यादींची अत्यंत वेगाने पुनर्बांधणी केली.

    त्यासोबतच विजय भिडे यांच्यावर मेजर जनरल सरकार यांच्यासोबत नवनिर्मित बांगलादेशच्या प्रशासनाची घडी घालण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. युद्धापूर्वी पाकिस्तानी अत्याचारांमुळे लपून बसलेल्या सर्व नागरी प्रशासनातील अधिकार्‍यांना शोधून त्यांना प्रशासनातील योग्य त्या जागांवर प्रस्तापीत करण्याचे प्रचंड कार्य विजय भिडे आणि मे. जन. सरकार यांनी पार पाडले.

    विजय भिडे यांच्या नेतृत्त्वाखालील अभियांत्रिकी विभागांनी प्रचंड वेगाने केलेल्या उच्च दर्जाच्या कार्यामुळे १९७१ चे भारत-पाक युद्ध (बांगला देश मुक्ती युद्ध) हे ‘अभियंत्यांचे युद्ध’ (‘इंजिनिअर्स वॉर’) म्हणून ओळखले जाते.

    या युद्धानंतर काही काळाने विजय भिडे यांची भूसेनेच्या दक्षिण विभागाचे मुख्य अभियंता म्हणून झाली. हा कार्यभार सांभाळल्यावर लगेच त्यांची मेजर जनरलपदी पदोन्नती झाली आणि त्यांची नियुक्ती सीमा रस्ते संघटनेच्या (‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’) महासंचालकपदी झाली. १९७६ मध्ये ते सेनेतून निवृत्त झाले. त्यांच्या उत्तम दर्जाच्या सेवेसाठी आणि विविध युद्धांमधील उत्तम कामगिरीसाठी त्यांचा ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ देऊन सन्मान करण्यात आला.नंतर तीन वर्षे विजय भिडे अबुधाबीमधील नागरी रस्ते बांधणीसाठी तेथील शासनाचे सल्लागार होते. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले .

- राजेश प्रभु साळगांवकर

भिडे, विजयकुमार विनायक