Skip to main content
x

भट, गोविंद केशव

     गोविंद केशव भट यांचा जन्म नाशिक येथे झाला व त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षणही तेथेच झाले. नंतर मुंबईत संस्कृत हा विषय घेऊन, कधीही प्रथम श्रेणी न सोडता त्यांनी स्नातकोत्तर एम.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले व १९४४ साली ‘विदूषक’ या विषयावर मराठी, इंग्रजी व गुजराती ह्या भाषांतून प्रबंध प्रकाशित करून त्यांनी प्रतिष्ठित असे व्ही.एन.मंडलिक सुवर्णपदक मिळवले. ‘भासकृत नाटके’ या विषयात त्यांना पीएच.डी. मिळाली.

     डॉ.भट यांनी सुमारे २५ पुस्तके व अनेक शोधप्रबंध इंग्रजी, मराठी व गुजराती ह्या भाषांत सादर करून साहित्यिक मान्यता मिळवली. कुशल चिकित्सक विद्वान व रसिक, व्यासंगी गोविंदराव हे हाडाचे शिक्षक असून अत्यंत मनमिळाऊ, निगर्वी व नम्र होते. अभिजात वाङ्मय, नाटके व नाट्यशास्त्र, तसेच काव्य हे त्यांचे आवडते विषय होते. ‘मास स्टडीज’ (१९६८) ‘अपॉइंटमेंट विथ कालिदास’, ‘ट्रॅजेडी इन संस्कृत ड्रामा’, ‘संस्कृत ड्रामा’, ‘ए पर्स्पेक्टिव्ह इन थिअरी अ‍ॅन्ड प्रॅक्टिस’, ‘भरत नाट्यमंजरी’, ‘नाट्यमंजरी सौरभ’, ‘थिएट्रिक अ‍ॅस्पेक्ट्स ऑफ संस्कृत ड्रामा’ हे त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ होत.

     नाट्यतत्त्वे व त्यांचे रंगभूमीवर अवतरण यांचा सखोल, चिकित्सक अभ्यास यांत रुची असल्यामुळे संस्कृत नाटके बसविण्यात ते वाकबगार होते. रंगभूमीसंबंधी चळवळीत तत्संबंधी संस्था त्यांना आग्रहाने निमंत्रणे देत असत. विद्वत्तापूर्ण समालोचन, कलात्मक मूल्यांकन  व मनोहारी अभिव्यक्ती यांचा दुर्लभ संगम त्यांच्यामध्ये दिसून येई. समाजाभिमुखता व नर्म विनोदप्रियता हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य होते. इंग्रजीवर असाधारण प्रभुत्व व कालिदासाच्या व्यक्तित्वासंबंधी मूलग्राही चिंतनाची प्रतीती त्यांच्या सुगम, रसाळ, ओगवत्या शैलीतून येते.

     ‘गृह दाह’ (नाटक, १९४४) व ‘विदूषक’ या त्यांच्या दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळालेली आहेत. ‘अमृत’ मासिकातून त्यांनी संस्कृत नाटककार व त्यांची नाटके यांचा मराठी वाचकांना सुबोध आणि सुगम परिचय करून दिला. ‘प्रणय’ (१९४३) ही कादंबरी, ‘अंधार-उजेड’ (१९६२) हा लघुकथासंग्रह, ‘कालिदास दर्शन’ (१९६८), ‘संस्कृत नाटके आणि नाटककार’ (१९८०) आणि ‘भवभूती’ (१९८६) ही त्यांची आणखी उल्लेखनीय साहित्यसंपदा.

- वि. ग. जोशी

भट, गोविंद केशव