भुजबळ, गोपाळ भीमराव
गोपाळ भीमराव भुजबळ यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी येथे झाला. त्यांनी फलोत्पादन क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून कृषी विषयक उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या प्रशासकीय कामाची सुरुवात १९६४मध्ये सर्वप्रथम धुळे येथील कृषी महाविद्यालयातून व्याख्याता म्हणून झाली. आपल्या ३४ वर्षांच्या प्रशासकीय सेवेच्या काळात त्यांनी सहयोगी प्राध्यापक, अधीक्षक, साहाय्यक उद्यानविद्या, सहयोगी संशोधन संचालक इत्यादी पदे भूषवली. त्यांच्या या कार्याचा गौरवही करण्यात आला. त्यांनी द्राक्ष हा विषय संशोधनासाठी निवडला व प्रत्यक्ष द्राक्ष बागायतदारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी द्राक्षबाग या विषयावर सात पुस्तके आणि २१ पुस्तिका लिहून प्रकाशित केल्या. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या ‘द्राक्षबाग’ या पुस्तकाला १९८४मध्ये शासनाचा उत्कृष्ट प्रकाशनाचा प्रथम पुरस्कारही मिळाला. त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आकाशवाणीवरून एकूण ६२ कार्यक्रम सादर केले. त्यांनी द्राक्ष या विषयावर शंभरहून अधिक लेख लिहिले आहेत. त्यांनी दूरदर्शनवरून द्राक्षासंबंधी एकूण २२ कार्यक्रम सादर केले आहेत.
भुजबळ यांना द्राक्ष-विस्तार क्षेत्रातील कामगिरीसाठी हैद्राबाद येथील इंटरनॅशनल हॉर्टीकल्चर अॅन्ड इनोलॉजी संस्थेचे सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच त्यांना फ्रेंड्स ऑफ रायटर्सचे पारितोषिक, लोकमान्य टिळक पुरस्कार, वसंतराव नाईक पुरस्कार इ. पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. सेवानिवृत्तीनंतर ते ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केले . भुजबळ हे सेंद्रिय शेती व अग्निहोत्र या विषयावर सुद्धा १९७२पासून संशोधन व मार्गदर्शनाचे अमूल्य कार्य केलेले दिसते. शेतीमध्ये कोरडवाहू शेतीमध्ये चिंच लागवड, चिकू आणि लिची लागवड व मिश्रपीक पद्धती यातही त्यांनी मार्गदर्शन केले आहे .