Skip to main content
x

चिपळूणकर, प्रताप रघुनाथ

             प्रताप रघुनाथ चिपळूणकर यांचा जन्म कोल्हापूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. कोल्हापूर येथे प्रारंभिक शिक्षण घेऊन त्यांनी १९७०मध्ये पुण्यातील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली. आपण प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या शेतीसाठी करावा, या हेतूने पदवी मिळाल्यानंतर करवीर तालुक्यामधील नागदेववाडी येथील आपल्या शेतीकडे लक्ष देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्या काळात शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नव्हता. ही तफावत कर्जाच्या डोंगरात कधी परावर्तित झाली हे समजलेच नाही, परंतु ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या संत उक्तीप्रमाणे सतत १६ वर्षे अपार कष्ट उपसत त्यांनी ते कर्ज फेडून टाकले, पण त्यांच्या डोळ्यासमोर कर्जफेड हा एकमेव हेतू नव्हता. या प्रयत्नांना शेती सुधारणांची जोड देणे त्यांना अत्यावश्यक वाटत होते. ‘कृषी व्यवसायातदेखील योग्य अशी भांडवली गुंतवणूक करणे अत्यावश्यक असते’, हे मर्म नेमकेपणाने ओळखून त्यांनी पडीक जमिनी लागवडीखाली आणणे, विहिरी खोदणे, त्या विहिरींवर जलसिंचनासाठी विजेचे मोटार पंप बसवणे, सर्व विहिरी परस्परांना पाइपलाइनच्या साहाय्याने जोडणे या पद्धतीने त्याला ठिबक सिंचन पद्धतीची जोड देणे असे उपक्रम राबवले. गोमय वायू संयंत्राचा वापर करून त्यांनी आपल्या शेतीत जणू नंदनवन फुलवले. नारळीची आणि चिकूची बाग ही त्याची साक्ष आहेत. रसायनविरहित गूळ तयार करणे, उच्च दर्जाची कडधान्ये, बासमती तांदूळ यांचे उत्पन्न घेणे त्यांनी सुरू ठेवले. दलालांच्या वर्चस्वामुळे शेतकरी आणि ग्राहक यांना लाभ होत नाही. ही बाब नेमकेपणाने ओळखून त्यांनी आपल्या उत्पादनांची विक्री स्वतःच करण्यास सुरुवात केली. नवनवीन संशोधन करणे व अभ्यास करणे, ते संशोधन इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ देणे यात ते नेहमीच अग्रेसर राहिले.

             नवनवीन साहित्याचा शोध घेणे, त्यांचा सखोल अभ्यास करणे आणि या ज्ञानमंथनातून मिळालेल्या अमृताचा प्रत्यक्ष शेेतीत वापर करणे, असा प्रकल्प  चिपळूणकर राबवतात. शेतकऱ्यांच्या अडचणींकडे स्वत: शेतकरी, कृषितज्ज्ञ यांचे दुर्लक्ष होते. त्यावर उपाय म्हणून व्यापारी दृष्टीने विकसित केलेली अनेक निरुपयोगी तंत्रे शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. त्यातील उणिवांकडेही दुर्लक्ष केले जाते. या सर्व बाबींचा विचार आणि अभ्यास करून शेतीमधील परिवर्तनावर त्यांनी एक छोटी पुस्तिका लिहिली. जमिनीच्या सुपीकतेमध्ये घट होऊ न देता कमी खर्चात शेती कशी करावी; याचे विवेचन ते आपल्या व्याख्यानातून निरनिराळ्या ठिकाणी करतात. आपले विचार व अनुभव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ‘किसान शक्ती’, ‘अ‍ॅग्रोवन’, ‘गतिमान’, ‘संतुलन’ इ. मासिकांतून सातत्यपूर्ण लिखाण केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सांगली येथे २००६मध्ये किसानशक्तीच्या कृषी प्रदर्शनात मासिक ‘किसान शक्ती’चे संपादक बाळ पोतदार यांनी चिपळूणकर यांचा ‘किसान शक्ती प्रेरणा’ पुरस्कार देऊन सत्कार केला. एप्रिल २००६मध्ये ‘बळीराजा मराठी विज्ञान परिषद कृषी संशोधनपर लेखन गौरव पुरस्कार २००५’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. शेेती पदवीधर कृषी उद्योग विकास सहकारी संस्था, कोल्हापूर या संस्थेचे २५ वर्षे संचालक म्हणून व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

             पुण्याच्या डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (डीएसटीए)च्या विद्यमाने १९९५मध्ये भरवण्यात आलेल्या ४४व्या वार्षिक परिषदेत चिपळूणकर यांनी ‘भू-सूक्ष्मजीवशास्त्रीय ऊस शेती’ या विषयावर अभ्यासपूर्ण निबंध सादर केला. तसेच याच संस्थेच्या २००७च्या परिसंवादामध्ये त्यांनी ‘उसातील तण व्यवस्थापन अनुभव’ या विषयावर अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केला.

             शेतीपुढील वाढत्या समस्यांचे निर्मूलन केवळ शासकीय मदतीतून करून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष अभ्यासाला सामोरे गेल्यास अनेक समस्या कायमस्वरूपी सुटू शकतील, असे चिपळूणकर यांचे प्रांजळ मत आहे. त्यांची ‘भू-सूक्ष्मजीवशास्त्रीय शेेती’ (एका शेतकऱ्याने केलेला अभ्यास व प्रत्यक्ष शेती) ही पुस्तिका शेतकरी बंधूंसाठी दीपस्तंभाचे कार्य करत आहे.

- मालोजीराजे  कारेकर

चिपळूणकर, प्रताप रघुनाथ