Skip to main content
x

चितळे, वामन वासुदेव

आप्पासाहेब चितळे

         वामन वासुदेव ऊर्फ आप्पासाहेब चितळे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात एका गरीब कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण दापोली येथे घेतले. मॅट्रिक झाल्यावर त्यांनी उच्च शिक्षणासाठी जोधपूरला जायचे ठरविले, कारण तेव्हा तेथे महाविद्यालयीन शिक्षण मोफत होते. तेथे अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यासाठी ते दिवसा शिकवण्या करीत आणि रात्री अभ्यास करीत. मग त्यांनी नागपूरला कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि ते काटोल येथे वकिली करू लागले. नंतर ते नागपूरला सर मोरोपंत जोशी यांच्या हाताखाली वकिली करू लागले. कालांतराने त्यांनी स्वतंत्रपणे वकिली सुरू केली आणि नागपूर उच्च न्यायालयातील एक आघाडीचे वकील म्हणून त्यांची ख्याती झाली.

         तथापि केवळ वकिली व्यवसाय करणे व त्याद्वारे संपत्ती मिळविणे हे त्यांचे ध्येय नव्हते. ते स्वत: वकिली करीत असल्याने वकिलांच्या अडचणींची त्यांना चांगली कल्पना होती. भारतातील सर्व ठिकाणच्या आणि प्रिव्ही काउन्सिलमधील सर्व खटल्यांच्या निकालांची माहिती देणारे विश्वासार्ह नियतकालिक तेव्हा उपलब्ध नव्हते, हे या सर्व अडचणींमागील प्रमुख कारण होते. असे महत्त्वाचे निकाल सांगणारे मासिक काढायचे आप्पासाहेबांनी ठरविले. त्याला त्यांनी ‘ऑल इंडिया रिपोर्टर’ असे नाव दिले. या जर्नलमुळे आप्पासाहेबांचे नाव भारतभरातील वकीलवर्गात आणि कायद्याच्या जाणकारांत परिचयाचे झाले. ‘ऑल इंडिया रिपोर्टर प्रा. लि.’ ही कंपनी आप्पासाहेबांनी १९२२मध्ये स्थापन केली आणि तिच्यामार्फत ‘ऑल इंडिया रिपोर्टर’ दरमहा नियमितपणे प्रसिद्ध होऊ लागला.

         आप्पासाहेबांनी सदर  संस्था स्वत:च्या आर्थिक  लाभासाठी काढली नाही, तर आपल्या व्यावसायिक क्षेत्राविषयी असलेल्या प्रेमापोटी आणि आपल्या व्यवसायबंधूंच्या सेवेसाठी हा उद्योग त्यांनी हाती घेतला. आपल्या वर्गणीदारांच्या सोयीसाठी त्यांनी पृष्ठावरची छपाई सलग न करता दोन स्तंभांत करण्याचा निर्णय घेतला. काही काळानंतर ‘ऑल इंडिया रिपोर्टर’ व्यतिरिक्त इतर काही जर्नल्स आणि विविध कायद्यांवरील सटीप व सभाष्य पुस्तके (कॉमेंटरीज्), न्यायालयांच्या निर्णयांचे सारांश (डायजेस्ट्) आणि कायद्यांच्या संहितांचा संग्रह (मॅन्युअल्स) अशी वकील आणि न्यायालयांसाठी अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त पुस्तकेही नियमितपणे प्रकाशित होऊ लागली. अशा रीतीने आप्पासाहेबांच्या अथक  परिश्रमांमुळे विश्‍वासार्हता, उपयुक्तता व उपलब्धता ही या प्रकाशनांची व्यवच्छेदक दर्जासूचक ओळख बनली.

          आप्पासाहेबांनी आपल्या उद्दिष्टांसाठी व आदर्शांसाठी ज्या निष्ठेने काम केले, ती त्यांची निष्ठा केवळ त्यांचे सहकारी व साथीदार यांनाच माहीत होती. ‘ऑल इंडिया रिपोर्टर’ हे त्यांच्या अखंड परिश्रमाचे मूर्तिमंत स्मारकच आहे. आप्पासाहेबांचे वाचन व व्यासंग उल्लेखनीय होते. आपल्या नित्यक्रमातील कामांवर आपल्या शेवटच्या आजाराचा त्यांनी अजिबात परिणाम होऊ दिला नाही. आपल्यापाशी असलेला थोडा अवधी आपल्या कार्यासाठीच वापरण्याचा त्यांचा निर्धार होता व तो शेवटपर्यंत कायम राहिला.

‘ऑल इंडिया रिपोर्टर’ या देशातील अग्रगण्य न्यायपत्रिकेच्या रूपाने त्यांची स्मृती कायम आहे.

     - अ. ना. ठाकूर

चितळे, वामन वासुदेव