Skip to main content
x

चित्रे, शशिकुमार मधुसूदन

     शशिकुमार मधुसूदन चित्रे यांचा जन्म, तसेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही मुंबईत झाले. १९५६ साली मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयातून गणित विषयातली पदवी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने ड्यूक ऑफ एडिंबरा फेलोशिपने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतरचे गणितातले उच्चशिक्षण त्यांनी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातून पूर्ण केले. १९६० साली म्हणजे गणिताच्या अध्ययनाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी मिळवलेल्या विशेष प्रावीण्यासाठी पीटरहाउस महाविद्यालयाकडून त्यांना गणिताचे पारितोषिक देण्यात आले. केंब्रिज विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी त्यांना १९६३ साली मिळाली. या पदवीसाठी त्यांनी सादर केलेला संशोधनात्मक प्रबंध हा सौरडागांच्या रचनेशी संबंधित आहे.

     त्यानंतर तीन वर्षे इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात उपयोजित गणित या विषयाचे त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर अमेरिकेतील कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेत एक वर्ष संशोधन करून ते १९६७ साली भारतात परतले आणि मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत रुजू झाले आणि २००१ साली तेथूनच ज्येष्ठ प्राध्यापक या पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर मुंबई विद्यापीठ आणि अणूशक्ती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पायाभूत विज्ञानाच्या अभ्यासासाठी स्थापन झालेल्या केंद्रात, २००७ साली त्यांची ‘डिस्टिंग्विश्ड फॅकल्टी’ म्हणून नेमणूक केली जाऊन त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली.

     चित्रे यांचे आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून सुमारे दीडशे संशोधनात्मक निबंध प्रसिद्ध झाले आहेत. सौरखगोलशास्त्रात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. सौरडागांसंबंधी केलेल्या संशोधनातून त्यांनी सौरडागाचे प्रारूप मांडले असून सौरडागाद्वारे उत्सर्जित झालेल्या ऊर्जेच्या वहनामागील कार्यभाव स्पष्ट केला आहे. सूर्यावर होणाऱ्या सार्वत्रिक स्वरूपाच्या स्पदंनांच्या उगमासंबंधीही त्यांनी संशोधन केले आहे. सूर्याच्या अंतर्भागातील पदार्थ हे सूर्याच्या अक्षाभोवती वर्तुळाकार गतीने फिरत असतात. या सौरपदार्थांचा प्रदक्षिणाकाळ हा त्यांच्या स्थानावर अवलंबून असतो. चित्र्यांनी केलेल्या संशोधनाद्वारे या पदार्थांच्या अक्षाभोवतीच्या प्रदक्षिणाकाळात स्थानानुसार होणाऱ्या बदलाची, सूर्यावर होणाऱ्या सार्वत्रिक स्वरूपाच्या स्पंदनांच्या वारंवारितेशी सांगड घातली गेली आहे.

     सूर्याच्या गाभ्यात घडत असलेल्या अणूगर्भीय संमिलनाच्या क्रियेत न्यूट्रिनो हे विद्युतभाररहित आणि अत्यल्प वस्तुमान असणारे कण निर्माण होतात. या कणांचे सूर्याकडून सतत उत्सर्जन होत असते. यातील पृथ्वीवर पोहोचणाऱ्या कणांची संख्या विशेष प्रकारच्या उपकरणांद्वारे मोजली जाते. निरीक्षणांद्वारे प्रत्यक्ष मोजलेली न्यूट्रिनो संख्या आणि गणिताद्वारे काढलेली संख्या यांत आढळलेल्या तफावतीचे स्पष्टीकरण चित्र्यांनी त्यांच्या संशोधनाद्वारे दिले आहे. मूलद्रव्यांच्या सूर्याच्या गाभ्यातील वैपुल्याच्या मर्यादेवरही त्यांनी सैद्धान्तिक विवेचन केले आहे. सूर्याच्या बाह्यभागातील वर्णावरणातील उष्णतेचा सूर्याभोवतालच्या चुंबकत्वाशी असलेल्या संबंधांवरील संशोधनाचाही चित्र्यांनी केलेल्या सौरसंशोधनात समावेश आहे. वयाच्या सत्तरीतही संशोधनात सक्रियरीत्या सहभागी राहून चित्र्यांनी २००८ साली पूर्ण झालेल्या सौरचक्राशी संबंधित संशोधनही केले आहे. या संशोधनाद्वारे त्यांनी सौरचक्राच्या कालखंडात होणाऱ्या सूर्यावरील पदार्थांच्या गतीतील बदलाचे विश्लेषण केले.

     सौरखगोलशास्त्राशिवाय शशिकुमार चित्र्यांनी अतिघन स्वरूपातल्या तार्‍यांसंबंधी संशोधन केले आहे. या संशोधनात त्यांनी न्यूट्रॉन ताऱ्यासारख्या अतिघन स्वरुपातल्या ताऱ्यांच्या स्वत:भोवतीच्या फिरण्याचा, त्यांच्या स्पंदनांच्या वारंवारितेवर होणारा परिणाम गणिती स्वरूपात मांडला आहे. चित्र्यांनी न्यूट्रॉन ताऱ्याच्या गाभ्याच्या घनीभवनाचे गणिती विश्लेषण केले आहे. ताऱ्यांच्या बाह्यभागात होणारे पदार्थांचे वहनही त्यांनी अभ्यासले आहे.

     याशिवाय गुरुत्वीय भिंग हासुद्धा चित्र्यांनी केलेल्या संशोधनाचा विषय आहे. प्रचंड वस्तुमान असणाऱ्या अवकाशस्थ वस्तू आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे आजूबाजूने जाणाऱ्या प्रकाशकिरणांच्या मार्गात बदल घडवून आणतात. या वस्तूंच्यापलिकडे असलेल्या दीर्घिका वा ताऱ्यांकडून येणाऱ्या प्रकाशकिरणांवर जेव्हा असा परिणाम घडून येतो, तेव्हा पलीकडील वस्तूच्या एकाहून अधिक प्रतिमा निर्माण होतात. हा परिणाम ‘गुरुत्वीय भिंग’ या नावे ओळखला जातो. यावर आधारित गणितानुसार, या प्रतिमांची एकूण संख्या ही विषम असायला हवी. परंतु प्रत्यक्ष निरीक्षणांत ही संख्या सम असल्याचे आढळले आहे. या बाबीचे स्पष्टीकरण चित्रे यांनी दिले आहे. या स्पष्टीकरणानुसार या प्रतिमांची संख्या ही प्रत्यक्षात विषमच असून त्यातील एक प्रतिमा ही अत्यंत अंधुक असल्यामुळे दिसू शकत नाही. गुरुत्वीय भिंगांचा वापर दीर्घिकांच्या परिसरातील चुंबकीय क्षेत्राचे मापन करण्यासाठी कसा करता येईल, हेसुद्धा त्यांनी दाखवून दिले आहे.

     जर्मनीतील ‘मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूट ऑफ एक्स्ट्राटेरेस्टिअल फिजिक्स’, तसेच अमेरिकेतील ‘नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’ यांसारख्या संस्थांनी त्यांना आमंत्रित करून आपल्या संशोधनात सहभागी करून घेतले होते. याचबरोबर इंग्लंडमधील केंब्रिज, ससेक्स, लंडन यांसारख्या आणि अमेरिकेतील प्रिंस्टन, कोलंबिया, व्हर्जिनिया यांसारख्या विद्यापीठांनी पाहुणे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक केली होती. १९७५-७६ या काळात ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे राष्ट्रीय पातळीवरचे अध्यापक होते. १९९९-२००० या काळात ते अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथेही अभ्यागत प्राध्यापक म्हणून नेमले गेले होते. २००१-०६ या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातली डॉ. राजा रामण्णा यांच्या नावे असलेली फेलोशिप भूषवली.

     १९८६-८७ या काळात टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या भौतिकशास्त्र विभागाचे सहअधिष्ठाता असणाऱ्या शशिकुमार चित्र्यांनी इतर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ आणि ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ या संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांवर त्यांनी कार्य केले आहे. उदयपूरच्या सौर वेधशाळेच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे ते सदस्य होते. ‘होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थे’च्या व्यवस्थापन समितीचेही ते सदस्य होते. ‘इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी’च्या समितीचे १९९७-१९९९ या काळात सदस्य, तर १९९८-२००३ या काळात ते इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे उपाध्यक्ष होते. १९८५-१९८८ या काळात ‘नेहरू तारांगणा’च्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि १९९२-९४ या काळात ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.  याबरोबरच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेवरील भारतीय समितीचे अध्यक्षपद त्यांनी अनेक वर्षे सांभाळले आहे.

डॉ. राजीव चिटणीस

चित्रे, शशिकुमार मधुसूदन