देसाई, मणीभाई भीमभाई
बाबासाहेब भाऊसाहेब देसाई हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील एका शेतकरी कुटुंबातील असून त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील शेडबाळ येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शेडबाळ येथे झाले व बंगलोर येथून १९५९मध्ये शालान्त परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ते पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून १९६३ मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी उत्तीर्ण झाले व त्याच वर्षी त्याच महाविद्यालयात कृषि-रसायनशास्त्र विषयाच्या अध्यापनासाठी त्यांची नेमणूक झाली. त्यांनी १९६९ मध्ये कृषि-रसायनशास्त्र विषयात एम.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. त्यानंतर कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे व्याख्याता म्हणून अध्यापन करत असताना बंगलोर येथील कृषी विद्यापीठात ते पीएच.डी.साठी प्रतिनियुक्तीवर गेले. तेथून पीएच.डी. प्राप्त करून १९७४मध्ये राहुरी येथील म.फु.कृ.वि.त साहाय्यक प्राध्यापक म्हणून कृषि-रसायनशास्त्र विभागात रुजू झाले. १९८७मध्ये नवीन जीव-रसायनशास्त्र विभाग सुरू होताच प्राध्यापक व विभागप्रमुख ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली व १९९९मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी ती उत्तम रीतीने पार पाडली. या कार्यकाळात त्यांनी ५०हून अधिक विद्यार्थ्यांना एम.एस्सी. साठी व ४ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले.
देसाई यांनी अध्यापन, संशोधन व कृषि-विस्तार या तिन्ही क्षेत्रांत जीव-रसायनशास्त्र विभागात उत्तम परंपरा निर्माण करून विभागाला स्थिर पाया व दिशा दिली. डॉ.एम.एस. नाईक यांच्या सल्ल्याने व मदतीने भा.कृ.अ.प., दिल्ली येथून अनेक संशोधन प्रकल्प त्यांनी मंजूर करून घेतले व राबवले. त्यांचे ५७ संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. सर्वसामान्यांच्या प्रबोधनासाठी १० लेख त्यांनी मराठीतून लिहिले. त्यांनी १४ शास्त्रीय परिषदांमध्ये संशोधनावर आधारित व्याख्याने दिली. बँकॉक येथील आशियाई तंत्रज्ञान संस्थेच्या निमंत्रणावरून २००५मध्ये त्यांनी सुगीनंतरच्या तंत्रज्ञानातील नवीन प्रवाह या विषयावर व्याख्यान दिले. डॉ.देसाईंचे योगदान म्हणजे त्यांनी लिहिलेली सुगीनंतरचे जीवतंत्रज्ञान (पोस्ट हार्वेस्ट बायोटेक्नॉलॉजी) या विषयावरची प्रसिद्ध अमेरिकन प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेली सहा पुस्तके, बीज पुस्तक (सीड्स हँडबुक) हे दोन आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक व इतर १३ पुस्तके होत. १९८६मध्ये त्यांच्या ‘वृद्धी संप्रेरके’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.