देशमुख, माधव गोपाळ
माधव देशमुखांचा जन्म विढूळ (तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण दौलतखान येथील ए.व्ही.स्कूल, पुसद येथे झाले. १९३४ मध्ये ते नागपूर विद्यापीठातून बी.ए., १९३५ मध्ये एल्एल.बी. व १९३६ मध्ये एम.ए. उत्तीर्ण झाले. नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. व एल.ए.डी. झाले. १९४५ ते १९५० या दरम्यान अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. तर पुढे १९५९मध्ये विभाग प्रमुख झाले. आर्ट्स-सायन्स कॉलेज, औरंगाबाद (१९५९ ते १९६४), नागपूर महाविद्यालय (१९६४ ते १९६९) येथे त्यांनी प्राचार्यपद भूषविले. १९६९ ते १९७१ या काळात मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुखपद त्यांनी भूषविले. भारतीय राज्यघटनेचे मराठी भाषांतर करणार्या समितीवर देशमुखांची नेमणूक करण्यात आली. पुढे साहित्य अकादमीचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली.
‘मराठीचे साहित्यशास्त्र’ (१९४०) हा त्यांचा प्रबंध गाजला. ‘प्राचीन संत कवींनी आपल्या काव्यातून संस्कृत साहित्यशास्त्राप्रमाणेच स्वतंत्र साहित्यशास्त्र लिहिले’, हे त्यांच्या प्रबंधामागचे महत्त्वाचे प्रमेय होते. देशमुखांनी अनेक समीक्षात्मक लेख लिहिले. त्यांतील ‘भावगंध’ (१९५५), ‘साहित्यतोलन’ (१९७४) संपादक डॉ. उषा देशमुख, ‘वाङ्मयीन व्यक्ती’ संपादक डॉ. उषा देशमुख, हे त्यांचे लेख विद्वज्जनात मान्यता पावले. त्यांनी ‘नामदेव’मध्ये (१९७०) साहित्य अकादमीसाठी लिहिलेला बृहद्लेखही प्रसिद्ध आहे.
एखाद्या विषयासाठी स्वतंत्र दृष्टीकोनातून खुमासदार शैलीत आणि वेगळ्या वैचारिक भूमिकेतून देशमुखांचे लेखन होत असल्यामुळे ते वैशिष्ट्यपूर्ण ठरत असे. ‘नागेशकृत सीतास्वयंवर’ (१९४१), ‘एकावली’ (श्री.ना.बनहट्टी यांच्या लेखांचा संग्रह १९४१), ‘नवे पान’ (कविवर्य, दत्त यांची समग्र कविता), ‘ज्ञानेश्वरीतील ४था अध्याय’ (१९६७) ही त्यांची महत्त्वपूर्ण संपादने होत.
देशमुखांचे वक्तृत्व फार आकर्षक होते. रसिकवृत्ती, मर्मग्राही बुद्धी यांमुळे त्यांचे लेखन वाचनीय होई. संस्कृत व मराठी साहित्याचा डोळस अभ्यास असल्याने त्याचा ठसा लेखनातून जाणवत असे. त्यांच्या बोलण्यात व लेखनात मिस्कील विनोदबुद्धी होती. आदर्श शिक्षकापाशी असणारी विषय प्रतिपादनाची सुयोग्य दृष्टी होती. कविता कोणाचीही असो केशवसुतांची, कवी दत्तांची, नामदेवाचे-मुक्ताबाईचे अभंग असोत, ते त्यांचे विश्लेषण समरस होऊन करीत. विद्वत्ता व रसिकता यांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व विलोभनीय वाटे.
- रागिणी पुंडलिक