Skip to main content
x

देशपांडे, उदय विश्‍वनाथ

      दय विश्‍वनाथ देशपांडे यांचा जन्म मणिनगर, अहमदाबाद येथे झाला. त्यांचे वडील विश्‍वनाथराव टेक्स्टाईल उद्योगात मोठ्या हुद्दयावर नोकरीला होते. ते मुंबईच्या कापडगिरणीत उच्च पदावर कार्यरत होते. उदयरावांच्या आईचे  नाव शैलजा होते.

     उदयरावांचे ५ वी पर्यंतचे शिक्षण दादरच्या ‘किंग जॉर्ज’ मध्ये तर एस. एस. सी. पर्यंतचे  माहीमच्या लोकमान्य विद्यामंदिरात झाले. काळाचौकीला राहत असल्याने ते ट्रॉमने माहीमला जा-ये करीत असत. रसायन व वनस्पतीशास्त्र विषय घेऊन ते रुईया महाविद्यालयातून १९७३ मध्ये बी. एस्सी. झाले. १९६९ ते १९७५ या काळात योग, मल्लखांब, जिम्नॅस्टिक, खोखो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कुस्ती इत्यादी स्पर्धांत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धक या नात्याने भाग घेऊन त्यांनी अनेक सन्मान मिळवले होते.

     कुस्तीला पोषक व व्यायामाच्या प्रकारात उत्कृष्ट गणल्या गेलेल्या मल्लखांबाशी उदय इतके एकजीव झालेले आहेत की, उदय देशपांडे व मल्लखांब हे एकमेकांचे पर्यायच बनले आहेत. त्यांनी देशभर आयोजित केलेल्या मल्लखांब शिबिरात आदिवासी, वनवासी, मूकबधिर, मानसिक विकास न झालेल्यांचा व अपंगांचा समावेश आहे.

     १९८२ पासून आजपर्यंत वेगवेगळ्या विद्यापीठांनी संचालित केलेल्या आंतरविद्यापीठीय मल्लखांब चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये उदयराव प्रशिक्षक व परीक्षक म्हणून काम करीत आले आहेत. देशातल्या बहुतेक सर्व राज्यात मल्लखांब विद्येचा प्रसार करून तिला लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. त्यांच्या हाताखाली शिकलेल्या डझनावरी मुलामुलींनी मल्लखांब व व्यायामात श्री छत्रपती पुरस्कार मिळवले आहेत. मल्लखांब, योग व व्यायामामध्ये राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणार्‍या मुलामुलींची संख्या शतकाच्या जवळ पोचली आहे. याचे श्रेय त्या मुलांच्याबरोबरच त्यांना उमदेपणाने, उत्साहाने व कलात्मक रीतीने सातत्याने व कसोशीने प्रशिक्षण देणार्‍या उदयरावांनाही आहे. १९७९ ते १९९० या अवधीत झालेल्या जवळपास सर्व राष्ट्रीय जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप्स मध्ये खेळ किंवा स्पर्धा पंच म्हणून उदयरावांनी निर्णायकाची भूमिका अत्यंत निरपेक्षपणे, निरलसपणे व चोख बजावली आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे १९७७ पासून नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी होणार्‍या एन.सी.सी. परेडमध्ये त्यांनी रोप व पोल मल्लखांब यांना स्थान मिळवून दिले व सुरवातीच्या काही वर्षात मल्लखांब दल प्रमुख म्हणून काम केले. त्यांनी १९९८ मध्ये मल्लखांबाला इंडियन ऑलिंपिक असोसिएशनची मान्यता मिळवून दिली. २००२ साली ब्राझीलमध्ये आयोजित दुसर्‍या विश्‍वकप मल्लखांब चॅम्पियनशिपचे मानद सचिव म्हणून उदय विश्‍वनाथ देशपांडे यांची नियुक्ती झाली होती. २००८ पर्यंत त्यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, डेन्मार्क, जर्मनी, जपान, कोरिया, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, झेकोस्लोवाकिया, स्पेन, मुंबई, मलेशिया इत्यादी देशातल्या नागरिकांना भारतात मल्लखांबाचे व्यक्तिगत प्रशिक्षण दिले. युटा स्नायडर हे जर्मन गृहस्थ २००२ मध्ये भारतात आले असताना मल्लखांबाकडे आकर्षित झाले. त्यातूनच उदयरावांनी ५० मुलांचे एक आठवड्याचे शिबिर म्युनिक मध्ये घेतले. तेथे मल्लखांबाची रुची वाढीस लागली आहे. आतापर्यंत त्यांच्या जर्मनीला ५ भेटी झाल्या आहेत. २००८ मध्ये त्यांनी श्री समर्थ व्यायाम मंदिराचा दहाजणांचा चमू म्युनिकला नेला होता. परदेशात मल्लखांब व योगासनांचे आकर्षण वाढत आहे. नवव्या आशियाई खेळात व्यायामाचे आंतरराष्ट्रीय पंच या नात्याने त्यांनी काम केले.

      उदयरावांचे व्यक्तिमत्व सहज डोळ्यात भरण्याजोगे आकर्षक, प्रभावी आहे. संस्कृती, इतिहास, राष्ट्रीयत्वाचा व भारताच्या उज्ज्वल परंपरांचा त्यांना सार्थ अभिमान आहे. ते निरहंकारी असून सेवाभाव, विद्यार्थ्यांविषयी कळकळ, शिस्त व वक्तशीरपणा बरोबरच हसतखेळत, कलात्मकरीतीने शिकवणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

     केंद्रीय सीमाशुल्क व उत्पादनकर अधीक्षकाच्या कार्यालयातील सेवेचा अवधी सोडून त्यांना मल्लखांब व व्यायामाचे प्रकार एवढेच उदात्त ध्येय सदैव प्रेरित करीत असते. दादर येथील कमला मेहता अंधशाळेतील मुलींना १९९२ पासून दोरी-मल्लखांब विद्येत कुशल बनवून ६ जुलै २००३ रोजी त्यांनी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती माननीय ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासमोर त्यांची प्रात्यक्षिके करून वाहवा मिळवली. अंध मुलांनाही त्यांनी स्तंभ मल्लखांब व दोरी-मल्लखांब विद्येचे प्रशिक्षण दिले. मल्लविद्येला अत्यंत आवश्यक अशा मल्लखांबविद्येला उदयरावांनी अतिव्यापक रूप, स्थैर्य, संरक्षण व लोकप्रियता मिळवून देऊन अपूर्व अशी कामगिरी केली व करीत आहेत. महाराष्ट्र शासनाने ‘श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला आहे.

     विशेष म्हणजे त्यांचे मित्र उदय केंद्रे यांनी मल्लखांब या अनोख्या विषयावर डॉक्टरेटसाठी इंग्रजी भाषेत प्रबंध तयार करून तो मे २००८ मध्ये मुंबई विद्यापीठाला सादर केला आहे. 

वि. ग. जोशी

देशपांडे, उदय विश्‍वनाथ