Skip to main content
x

देव, प्रभाकर रघुनाथ

     महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरांचा धांडोळा घेत १४ व्या शतकापर्यंतच्या शिल्प-स्थापत्य-अवशेषांचा ऐतिहासिक  वारसा अभ्यासणारे, महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरांचे जागरण करत महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटकाला प्रोत्साहित करणाऱ्या सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव इत्यादी राजवटींच्या काळातील बांधीव आणि गुहा स्थापत्यावर लेखन-संशोधन करणारे, इतस्तत: विखुरलेल्या हजारो उद्ध्वस्त अवशेषांमधील कलात्मक वारसा धुंडाळत, मूर्ति-शिल्पांचा आस्वाद घेत, महाराष्ट्राच्या प्राचीन कलात्मक  वैभवाचे जागरण करणारे नांदेडचे ख्यातनाम इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रभाकर देव हे या क्षेत्रातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.

     प्रभाकर रघुनाथ देव यांचा जन्म  औरंगाबाद येथे कमलाबाई आणि रघुनाथ हरिहर देव या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे शालेय शिक्षण नूतन विद्यालय, सेलू, जिल्हा परभणी येथे पूर्ण झाले. त्यांनी औरंगाबादच्या शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयातून पदवी (बी.ए.) आणि औरंगाबादच्याच तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून पद्व्युत्तर शिक्षण (एम. ए. इतिहास)  पूर्ण केले.

    पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रभाकर देव यांनी सन १९६१साली बीड येथील बलभीम महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून अध्यापन क्षेत्रात पदार्पण केले. प्रतिभा यांच्याशी प्रा.डॉ. प्रभाकर देव यांचा विवाह ४ जून १९६३ रोजी संपन्न झाला. सन १९७१मध्ये  प्रा. डॉ. प्रभाकर देव यांनी प्रा. डॉ. र. शं. गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेल्या  ‘टेम्पल्स ऑफ मराठवाडा : ए स्टडी इन आर्ट अँड आर्किटेक्चर’ या संशोधन विषयासाठी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाने त्यांना पीएच. डी. ही पदवी प्रदान केली. प्रा. डॉ. प्रभाकर देव यांची सन १९७१साली नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात पद्व्युत्तर इतिहास व संशोधन विभागप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. सन १९९७ साली छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले.

     मराठवाड्यातल्या गावोगावी विखुरलेल्या व इतस्तत: पडलेल्या मूर्तिशिल्पांचा, उद्ध्वस्त स्थापत्य अवशेषांचा त्यांनी अभ्यास, सर्वेक्षण केले. वेरूळ, अजिंठा, पितळखोरे, कार्ले, भाजे, एलिफन्टा या जगप्रसिद्ध गुहा स्थापत्यांतील शिल्पपरंपरांचा मागोवा घेत पुढील काळात बांधीव स्थापत्यातून ही परंपरा कशी जिवंत राहिली याचा शोध घेत, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव कालखंडांतील बांधीव स्थापत्य अवशेषांचा त्यांनी अभ्यास केला.

     मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्याचा धांडोळा आणि त्यांवरील शिलालेखांचा शोध घेत प्रा. डॉ. देव सरांनी त्यांवर संशोधनपर लेख आणि ग्रंथ लिहिले. मराठवाड्यातील अनेक प्राचीन मंदिरांचा अभ्यास केला, त्यांचे नकाशे तयार केले, मूर्तींची वैशिष्ट्ये विशद केली, त्यांच्या सौंदर्याची आणि कलात्मकतेची सौंदर्यस्थळे नेमकेपणाने दाखवली, त्यांच्या विविध शैली वर्णन केल्या आणि त्यांचा कालनिर्णयही स्पष्ट केला. त्यामुळे मराठवाड्याच्या वैभवशाली इतिहासकाळात जी स्थापत्यकला विकसित झाली, तिचे अत्यंत मनोरम दर्शन  ‘टेम्पल्स ऑफ मराठवाडा’ (१९९३) या त्यांच्या ग्रंथात आपल्याला घडते. 

    महाराष्ट्रात अनेक प्राचीन शहरे आहेत. दीड-दोन हजार वर्षांची परंपरा सहज सांगता येईल अशा अनेक शहरांपैकी एक असलेल्या नांदेड या प्राचीन नगरीच्या इतिहासाचा धांडोळा घेताना डॉ.देवांनी १९८६ साली, नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी  अमिताभ राजन यांच्या पुढाकारानेे महाराष्ट्र राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त साकार झालेला, ‘स्थानिक इतिहास व साहित्य : एक  शोधण् नांदेड’ हा प्रकल्प यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. नांदेड ही भूमी शिखांचे दहावे गुरू आणि खालसा पंथाचे संस्थापक श्रीगुरू गोविंदसिंहजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली आहे. सन २००८साली आक्टोबर महिन्यात गुरुग्रंथसाहेब या शिखांच्या पवित्र ग्रंथाला गुरुपदी स्थापित करण्याच्या कार्यक्रमाला तीनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सरकारतर्फे संपन्न झालेल्या गुर-ता-गद्दी तिनसौ सालाना बरसी आणि महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमादरम्यान डॉ.देवांनी घेतलेला नांदेडच्या प्राचीनत्वाचा  ‘हेरिटेज नांदेड  कल्चर, आर्ट अँड आर्किटेक्चर’  या अप्रतिम ग्रंथाच्या रूपाने, भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते, प्रकाशित करण्यात आला.

     डॉ.देवांनी नांदेड जिल्ह्यातील वाकाटक कालीन म्हणजे आजपासून सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच्या लेण्यांचा शोध १९७० च्या सुमारास  घेतला. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधन पत्रिकेत त्यांनी शिऊरच्या लेण्यांवरील पहिला संशोधनपर लेख लिहिला.

     महाराष्ट्रातील प्राचीन शहरांची ओळख करून देण्याच्या दृष्टीने अनेक नामवंत लेखकांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांपैकी, डॉ. देवांनी लिहिलेल्या ‘कंधार- एक ऐतिहासिक शहर’ हे अप्रतिम पुस्तक राष्ट्रकूटकालीन कंधारची ऐतिहासिक  सफर घडवणारे लिखाण ठरले आहे.

     कल्याणीच्या चालुक्यांच्या काळातील एक प्रसिद्ध शहर पोट्टलनगरी नांदेड जिल्ह्यात आहे. ही पोट्टलनगरी म्हणजे देेगलूर तालुक्यातील आजचे होट्टल हे गाव होय. या ठिकाणी चार शिलालेखांसह अनेक वास्तू अवशेष चालुक्य कलाशैलीच्या इतिहासाचे जागरण करत आहेत. डॉ. देवांच्या आणि इन्टॅच (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज) नांदेड शाखेने या मंदिर समूहाचा सतत पाठपुरावा केला. ‘‘या दगडातल्या देवापेक्षा त्या कलात्मक देवमूर्तींना जन्म देणारा माणूस शोधणे मला अधिक आवडते ’’ असे डॉ. देव आवर्जून सांगतात.

    निवृत्तीनंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या वतीने हैद्राबाद मुक्ती-संग्राम आंदेलनाच्या अभ्यासाची साधने धुंडाळण्याची संधी डॉ. देवांना मिळाली. साधन-संकलन-संशोधन प्रकल्पांतर्गत जुन्या हैद्राबाद राज्यातील सोळा जिल्ह्यांची त्यांना भटकंती करावी लागली. कर्नाटकाचे बिदर, गुलबर्गा व रायचूर हे तीन जिल्हे, तेलंगण्याचे हैद्राबाद, वरंगल, करीमनगर, निझामाबाद, अदिलाबाद, मेदक, मेहबुबनगर, नलगोंडा हे आठ जिल्हे आणि मराठवाड्याचे औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड व उस्मानाबाद हे जुने पाच जिल्हे अशी भटकंती करत असताना सर्वश्री माजी कुलगुरू जी. आर. म्हैसेकर, तत्कालीन कुलगुृरू डॉ. जे. एम. वाघमारे, डॉ. डी. एस. देशपांडे यांच्या समवेतचा हा धांडोळा चिरस्मरणीय ठरला.

     हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील हिंदी, उर्दू, तेलुगू आणि कन्नड भाषिक समकालीनांच्या इंग्रजी-हिंदी भाषांतील मुलाखतींच्या आधारे मौखिक इतिहासाचे विश्लेषक ठरणारे हे सविस्तर विवेचन आहे. हैद्राबाद मुक्तिसंग्रमातील स्वातंत्र्यसैनिक, तत्कालीन पत्रकार, सनदी अधिकारी-नोकर, सहभागी झालेल्या सामान्यांसह आणि सामान्य प्रत्यक्षदर्शींसह जवळपास दीडशे लोकांच्या मुलाखती असलेले हे ग्रंथ म्हणजे हैद्राबाद मुक्ती संग्रमाचा ‘आंखो देखा हाल’, प्रत्यक्ष वर्णन करणारे साधन-ग्रंथ होत. पद्मविभूषण मा. गोविंदभाई श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या तत्कालीन पंतप्रधान श्री. पी. व्ही. नरसिंहराव, माजी मुख्यमंत्री डॉ. चन्नारेड्डी, फरिद मिर्झा आदींच्या लक्षणीय मुलाखती असलेल्या या साधन-ग्रंथांचे दोन खंड (एक मराठी व दुसरा इंग्रजी-हिंदी भाषेतील) विद्यापीठाने प्रकाशित केले असून  त्यांचे संपादन प्रा. डॉ. देव यांनी केले आहे.

     डॉ. देवांनी या पुस्तकाच्या माध्यमातून इतिहासाकडे पाहण्याची दिलेली नवी दृष्टी हे या क्षेत्रासाठीचे त्यांचे फार मोठे योगदान आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

     डॉ. प्रभाकर देव यांच्यावरील गौरवग्रंथ ‘प्राचीन महाराष्ट्र : परंपरा आणि समृद्धी’ रश्मी प्रकाशन, नांदेड, (मे २०१३) यांच्यातर्फे प्रकाशित झाला आहे. डॉ. प्रभाकर देव यांचे ‘हेरिटेज नांदेड- कल्चर, आर्ट अ‍ॅन्ड आर्किटेक्चर, इन्टॅक’ (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज), नांदेड चॅप्टर, (२००८) ‘इतिहास-संशोधन, अध्यापन, लेखन परंपरा’, ब्रेन टॉनिक प्रकाशन, नाशिक, (२००७) ‘गोदा खोरे- इतिहास आणि संस्कृती’(संपादित), जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद, (प्राध्यापिका शोभा कोरान्ने. गौरव ग्रंथ), २००६ ‘हैदराबाद लिबरेशन स्ट्रगल’ (संपादित), रजिस्ट्रार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, (२००४) ‘टेम्पल्स ऑफ मराठवाडा’, पब्लिकेशन स्किम, जयपूर, (१९९३), ‘स्थानिक इतिहास आणि साहित्य : एक शोध, नांदेड’ (संपादित), महाराष्ट्र राज्य रौप्य महोत्सवी प्रकाशन, नांदेड जिल्हा संदर्भग्रंथ समिती, १ (मे १९८६), ‘कंधार, एक  ऐतिहासिक शहर’, संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, (१९८५) आदी महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

प्रा. नंदकुमार मेगदे

देव, प्रभाकर रघुनाथ