Skip to main content
x

देवडीकर, गोविंद बाळकृष्ण

         गोविंद बाळकृष्ण देवडीकर हे अभ्यासू कृषि-वैज्ञानिक म्हणून ओळखले जात. पुण्यातील महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी (महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, एमएसीएस)च्या संशोधन संस्थेचे (आताची आघारकर संशोधन संस्था) संचालकपद डॉ. देवडीकर यांनी १९६०-८०मध्ये भूषवले. जिज्ञासेपोटी साधनसामग्री कमी असतानाही किती अभ्यास करता येतो, हे डॉ. देवडीकर यांच्या उदाहरणावरून दिसून येते. गहू, सोयाबीन, द्राक्ष, मधुमक्षिकापालन, रेशीम संशोधन, सूर्यमाला, संस्कृत, तत्त्वज्ञान अशा विभिन्न क्षेत्रांमध्ये डॉ. देवडीकर यांनी योगदान दिले. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तहसील येथील देवडी या गावी झाला. मॅट्रिकपर्यंतचे त्यांचे शिक्षण पंढरपूर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तेथून त्यांनी बी.एस्सी. ही पदवी घेतली. त्यासाठी रसायनशास्त्र हा प्रमुख आणि वनस्पतिशास्त्र हा दुय्यम विषय घेतला होता. पाठोपाठ त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पीएच.डी. या पदवीसाठी डॉ.देवडीकर यांनी ‘सायटोजेनेटिक सर्व्हे ऑफ द जीनस कॉमेलिना इन इंडिया अ‍ॅन्ड सायटोजेनेटिक्स ऑफ सेक्स डिटरमिनेशन इन कॉक्सिनिया इंडिका’ हा प्रबंध सादर केला. याच दरम्यान त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. १९४१ साली मुंबई राज्यात कृषी विभागात डॉ.देवडीकर यांनी नोकरीस सुरुवात केली. या काळात सिट्रस डायबॅक, पपई, तांदूळ, कडधान्य, तृणधान्य, तेलबिया यांचा अभ्यास त्यांनी केला. १९५० साली सरकारी नोकरी सोडून महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी संस्थेत मानद वैज्ञानिक म्हणून कामास सुरुवात केली. त्या वेळी ही संस्था नुकतीच स्थापन झाली होती.

         डॉ.देवडीकर यांच्या संशोधन कार्याची दखल घेऊन १९५४ साली भा.कृ.अ.प. प्रायोजित ‘इंटर स्पेसिफिक अ‍ॅन्ड इंटर जेनेरिक हायब्रिडायझेशन इन टेट्राप्लॉउड व्हीट्स’, ‘जेनेटिक्स अ‍ॅन्ड ब्रीडिंग ऑफ एमर व्हीट्स’ हे संशोधन प्रकल्प संस्थेत राबवण्यात आले. यापाठोपाठ आय.सी.ए.आर.चे सोयाबीन आणि द्राक्ष संशोधन प्रकल्प त्यांनी उत्कृष्टपणे राबवले. याच कारणास्तव आय.सी.ए.आर.ने महाराष्ट्र विज्ञानवर्धिनीचा समावेश अखिल भारतीय समन्वित संशोधन कार्यक्रमात करून घेतला. येथे संशोधन करण्याच्या सुरुवातीस डॉ.देवडीकर महाबळेश्‍वर येथील मधुमक्षिका प्रयोगशाळेचे मानद संस्थापक-संचालक होते. मधमाशांचा उपयोग मधनिर्मितीबरोबरच अनेक पिकांच्या परागीभवनासाठी होतो, हे डॉ. देवडीकर यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांच्या या कार्याला यश आले आणि एका घरातून चालणाऱ्या सेंट्रल बी रीसर्च इन्स्टिट्यूटचे रूपांतर पुण्यातील कृषी महाविद्यालयासमोरील सेंट्रल बी रीसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये झाले. १९६० साली महाराष्ट्र विज्ञानवर्धिनीचे संस्थापक व संचालक प्रा.शंकर पुरुषोत्तम आघारकर यांच्या निधनाने डॉ.देवडीकर यांच्याकडे संचालकपदाची धुरा आली. संस्थेसाठी जागा मिळवण्यात आणि अनुदान मिळवण्यात डॉ.देवडीकर यांना यश मिळाले. मोठ्या प्रमाणात प्रयोग करण्यासाठी शेती करणे आवश्यक असल्याने बारामती तालुक्यातील होळ गावी शेतजमीन मिळवण्यातही डॉ.देवडीकर यशस्वी झाले.

         रेशीम उद्योगासाठी महाराष्ट्रातील हवामान आणि माती पोषक नाही, असे मानले जात असताना १९५४ साली डॉ. देवडीकर यांच्या सांगण्यावरून महाबळेश्‍वर येथे रेशीम किड्यांची पैदास करण्यास सुरुवात झाली. या प्रकल्पाला यश आले आणि १९५८ साली पाचगणी येथे सेरिकल्चरल रीसर्च कम एक्सटेंशन स्टेशनची उभारणी करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र स्टेट खादी अ‍ॅन्ड व्हिलेज इंडस्ट्रिज बोर्डकडून अनुदान मिळाले.

         महाराष्ट्र विज्ञानवर्धिनीच्या आघारकर संशोधन संस्थेतील अनेक विभागांच्या उभारणीसाठी डॉ.देवडीकर यांनी डॉ. पी.एम.वागळे (सूक्ष्मजीवविज्ञान), डॉ.जी.डब्ल्यू.चिपळोणकर (भूविज्ञान आणि पुराजीवविज्ञान), प्रा.पां.वा.सुखात्मे (जीवमीती आणि पोषण) यांना आमंत्रित केले. मधुमक्षिकापालन संस्था, रेशीम संशोधन केंद्र, महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी संस्था यांची स्थापना आणि विकास यांच्यात डॉ.देवडीकर यांचा मोठा वाटा होता.

- संपादित

देवडीकर, गोविंद बाळकृष्ण