Skip to main content
x

देवकर,अजिनाथ भानुदास

           तेलबिया संशोधनामध्ये महाराष्ट्रातील अग्रेसर व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अजिनाथ भानुदास देवकर होय. तसेच कोरडवाहू पिकांच्या नवीन वाणनिर्मितीतही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सुरगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण जन्मगावी, तसेच शेेजारील अजोती गावी झाले. त्यांनी १९५६मध्ये शालान्त परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील कृषी महाविद्यालयात झाले आणि त्यांनी १९६०मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. त्याच महाविद्यालयात त्यांची वनस्पतिशास्त्र विषयाचे प्रयोग निदेशक (डेमॉन्स्ट्रेटर) म्हणून नेमणूक झाली. या पदावर असताना त्यांनी ‘वनस्पती अनुवंशशास्त्र व रोप-पैदास’ या विषयामध्ये संशोधन करून एम.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम वर्गात १९६७मध्ये प्राप्त केली. त्यांची पदोन्नती होऊन (१९६५) साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी तूर पिकातील आनुवंशिकतेविषयी संशोधन करून १९७७मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली. लुधियाना येथे १९७२मध्ये कृषी विद्यापीठात अनुवंशशास्त्र याविषयी ५ आठवड्यांच्या खास प्रशिक्षणाची त्यांना संधी मिळाली.

           त्यांची १९७२मध्ये जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्रावर नेमणूक झाली. पुढे त्यांच्या संशोधन व विकास कार्यास गती व दिशा मिळाली. जळगाव केंद्रावर भुईमूग, करडई, सूर्यफूल, तीळ व एरंडी या महत्त्वाच्या पिकांवर त्यांचे संशोधन कार्य सुरू होते. करडई हे पीक तोपर्यंत अवर्षणप्रवण भागात मर्यादित होते, परंतु भुर्ईमुगाची ‘फुले प्रगती’ ही लवकर तयार होणारी जात, तसेच अल्प मुदतीचे मूग हे पीक निघाल्यानंतर दुसरे पीक म्हणून करडई या पिकाची शक्यता अजमावण्यात येऊन त्याकरता नवीन वाण ‘तारा’ तयार करण्यात डॉ. देवकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. हा वाण लवकर तयार होणारा, तेलाचे अधिक प्रमाण असणारा व ओलाव्याच्या ताणास प्रतिकार करणारा आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील खानदेश विभागात एक नवीन पीक मिळाले. एरंडी पीक केवळ बांधावर घेण्याची प्रथा होती. गुजरात व आंध्र प्रदेशात हे एक नगदी पीक आहे, याची जाणीव ठेवून उथळ जमिनीत घेता यावे; यासाठी त्या संबंधीच्या संशोधनात भाग घेऊन ‘गिरिजा’ या लवकर तयार होणाऱ्या वाणाची निर्मिती करण्यात डॉ. देवकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. तीळ पिकामध्ये ‘तापी’ हा वाण, कारले पिकाकरता सह्याद्री हा ‘सुधारित वाण’ यांच्या निर्मितीत डॉ. देवकर यांचा सहभाग होता. तसेच उन्हाळी भुईमुगाची आय.सी.जी.एस.-१ नवीन जात प्रसारित करण्याच्या कामात डॉ. देवकर यांची भूमिका महत्त्वाची होती. या सर्व कामात डॉ. देवकर यांना मदत करणार्‍यांचा त्यांनी मुद्दाम उल्लेख करून नवीन वाणनिर्मिती हे सांघिक कार्य असते, याचा वस्तुपाठ दिला.

           डॉ. देवकर १९७८ ते १९८२ काळात सोलापूर येथील कोरडवाहू शेती संशोधन केंद्रामध्ये कार्यरत होते. कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त वाणांची निर्मिती हा स्वतंत्र विषय त्यांच्या काळात व आधीच्या काळात डॉ. एस.बी. माणके यांनी हाताळला होता. कोरडवाहू शेतीतील हुलगा, मटकी ही पिके दुर्लक्षितच होती, पण ती अवर्षणप्रवण भागात महत्त्वाची होती. त्यावर संशोधन करून नवीन वाण तयार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून डॉ. देवकर यांच्या काळात हुलग्याचे ‘सीना’ व ‘माण’ आणि  मटकीचे ‘एम.बी.एस. २७’ हे वाण प्रसारित केले गेले. निवड पद्धतीने ‘एस ४’ हा वाण डॉ. माणके यांनी विकसित केला होता, ते संशोधन पुढे चालू ठेवून डॉ. देवकर यांनी ‘भीमा’ हा वाण अवर्षणप्रवण भागात प्रसारित केला.

           सोलापूर येथून डॉ. देवकर परत जळगाव येथे तेलबिया विशेषज्ञ म्हणून गेले. तेथे जास्त करून त्यांच्याकडे प्रशासकीय कार्य होते. भारतात तेलबियांची टंचाई भासत होती. त्यावर मात करण्यासाठी १९९१मध्ये तेलबिया तंत्र अभियान सुरू केले गेले. त्या अभियानामध्ये विकासकार्यात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन करण्याची पश्‍चिम महाराष्ट्रासाठी जबाबदारी तेलबिया विशेषज्ञ म्हणून डॉ. देवकर यांच्याकडे होती. त्यात त्यांनी यशस्वी मार्गदर्शन केले व तेलबिया उत्पादनात १९८५-८६पेक्षा १९९०-९१मध्ये दुपटीने वाढ झालेली महाराष्ट्रात दिसून आली. डॉ. देवकर भा.कृ.अ.प.च्या हैदराबाद येथील तेलबिया संशोधन संचालनालयाने नेमलेल्या समितीचे प्रमुख होते. त्या समितीने देशातील महत्त्वाच्या संशोधन केंद्रांची पाहणी करून स्थानिक परिस्थिती अभ्यासून अधिक परिणामकारक संशोधन कसे होईल; यासंबंधीचा अहवाल तयार केला.

           डॉ. देवकर  यांनी भारतातील प्रमुख कृषी विद्यापीठांच्या पदव्युत्तर पदवीचे परीक्षक म्हणून कार्य केले आहे. त्यांनी तेलबियांविषयी दोन पुस्तके आणि इतर सहकार्‍यांच्या मदतीने तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी १७०हून अधिक शास्त्रीय लेख प्रसिद्ध केले आहेत. ते इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रीडिंग, इंडियन सोसायटी ऑफ ऑइल सीड रीसर्च, अ‍ॅग्रिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया, जेनेटिक्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थांचे सदस्य आहेत.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

देवकर,अजिनाथ भानुदास