दिघे, रघुनाथ वामन
रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म कल्याण शहरात झाला. वडिलांची फिरतीची नोकरी असल्यामुळे कर्जत, खोपोली, जळगाव, चाळीसगाव, सोलापूर, अहमदनगर, रत्नागिरी अशा विविध शहरांत त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. १९२२मध्ये पुणे येथून त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. १९२५ साली ते पुण्याहून एलएल.बी. झाले. वकिलीची सनद घेऊन त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. पण या व्यवसायात ते फार काळ रमले नाहीत. वकिली सोडून शेती करण्यासाठी खोपोलीजवळच्या विहारी या आपल्या गावी ते गेले. १९४३नंतरचे त्यांचे सारे लेखन त्यांच्या शेती व्यवसायाशीच संबंधित असल्याचे जाणवते. आयुष्यभर एका हातात लेखणी व दुसर्या हातात नांगर घेऊनच हा लेखक जगला.
१९०७च्या जळगाव साहित्य संमेलनात ‘बालकवी’ म्हणून त्र्यं.बा.ठोंबरे यांचा गौरव झालेला पाहिला, तेव्हापासून दिघ्यांना कविता करण्याचा छंद जडला; पण तेव्हा केलेल्या कवितांना त्यांनी प्रसिद्धी दिली नाही. १९३९ साली प्रसिद्ध झालेली ‘पाणकळा’ ही त्यांची पहिली कादंबरी; मात्र त्यापूर्वी त्यांच्या काही कथा ‘किर्लोस्कर’ मासिकातून प्रसिद्ध झाल्या होत्या. ‘पाणकळा’ प्रसिद्ध झाली तो काळ फडके, खांडेकर, माडखोलकर यांच्या लोकप्रियतेचा काळ होता. त्यांच्या कादंबर्या प्रामुख्याने मध्यमवर्गीय समाजाशी संबंधित होत्या. अशा काळात मध्यमवर्गाची कोंडी फोडीत लेखन करण्याची जिद्द बाळगून दिघ्यांनी ‘पाणकळा’ लिहिली. सद्वर्तनी भुजबा व दुर्वर्तनी रंभाजी यांच्यातील संघर्षात शेवटी भुजबाचा नैतिक विजय होतो, ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना होती. पण तिला प्रकाशक मिळेना तेव्हा दिघ्यांनी स्वतःच्या पैशांनी ती प्रकाशित केली.
बालकवी, बहिणाबाई चौधरी, गोविंदाग्रज हे त्यांचे आवडते कवी होते. पुण्यात त्यांची बालकवी आणि गोविंदाग्रज यांच्याशी गट्टी जमली होती. त्यातूनच त्यांना लेखनाची आवड निर्माण झाली. ग.ल. ठोकळ हे त्यांचे जवळचे मित्र आणि प्रकाशकही होते. १९०९ साली त्यांनी टेनिसनच्या ‘बर्डीज’ या कवितेचा ‘सानपाखरे’ या नावाने केलेला अनुवाद उपलब्ध आहे. दिघे यांच्या एकूण ९ कादंबर्या प्रकाशित झाल्या. त्यांची दहावी कादंबरी अपूर्ण होती, ती त्यांच्या मुलींनी नंतर पूर्ण केली. याशिवाय कथा, नाटक या प्रकारांतही त्यांनी लेखन केले. १९४०मध्ये लिहिलेली ‘वसंतराव आणि चाळीस चोर’ ही त्यांची गुप्त पोलीस चातुर्यकथांवर आधारित कादंबरी होय. यापूर्वी मराठीतील गुप्त पोलीस चातुर्यकथा प्रामुख्याने भाषांतरित असत. दिघ्यांनी मात्र या कादंबरीची रचना स्वतंत्रपणे केली होती. पुणे येथे फौजदारी वकिली करीत असताना आलेल्या एका अनुभवातून कादंबरीचे लेखन झाले.
१९४३ सालची ‘सराई’ ही दिघ्यांची सर्वाधिक लोकप्रिय कादंबरी. ग्रामीण वास्तव आणि कल्पनारम्यता यांचे अपूर्व मिश्रण यात आहे. त्यांच्या विहारीतील वास्तव्यात ह्या व ह्यानंतरच्या कादंबर्यांचे लेखन झाले. जमीनदार बाप्पाजी- त्यांचे कुळांशी असलेले संबंध, त्यांच्या शहरात शिकणार्या मुलाचे- मनोहरचे गावातील लाडी या तरुणीवर असलेले प्रेम व त्याला बाप्पाजींचा विरोध- ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे. १९४६ सालची ‘निसर्गकन्या रानजाई’ ही कादंबरी पूर्णपणे कल्पित आहे. संस्कृत आणि काव्यांचे रचनाविशेष व वर्णसंकेत स्वीकारून ही कादंबरी त्यांनी लिहिली. अद्भुतरम्य घटनांचा वापर करून या कादंबरीची रहस्यमयता दिघ्यांनी वाढविली आहे. १९४७ साली लिहिलेल्या ‘गानलुब्धा मृगनयना’ या कादंबरीचे स्वरूप ‘हिस्टॉरिकल रोमान्स’सारखे आहे. इतिहासाचा नाममात्र आधार घेऊन रचलेली कल्पित कथा असे तिचे स्वरूप आहे. ग्वाल्हेर, महुवाचा निसर्गरम्य परिसर कादंबरीची खुलावट वाढवतो. तोमर राजा मानसिंह व त्याची प्रेयसी मृगनयना यांची प्रणयकथा म्हणजे ही कादंबरी होय. ‘आई आहे शेतात’ ही १९५६मधली कादंबरी ग्रामीण जीवनातील बदलते वास्तव दाखवते. गावातील एक शेत ‘साखरपट्टी’ हीच या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. माणसाचे व निसर्गाचे प्रेमाचे तसेच वैराचेही नाते, हळूहळू उद्ध्वस्त होत चाललेली ग्रामीण समाजरचना, यांच्या संदर्भात नानू सातपुते, भिमा, दादाजी, अंजना अशा अनेक व्यक्तींच्या आयुष्याचे प्रवाह दाखवीत जाणारी ही कादंबरी आहे. १९५० सालच्या ‘पड रे पाण्या’ या कादंबरीत संतू मगर ह्या संतसंगतीत रमणार्या शेतकर्याचे जीवन-दर्शन घडते. संतूवर सातत्याने कोसळणारी संकटे, गावातील खलपुरुषाकडून होणारी छळणूक, जीवनसंघर्षात प्रतिकूल शक्तींशी झगडत ताठ मानेने उभे राहण्याचा त्याचा प्रयत्न, यांबरोबरच निसर्गाशी होणार्या संघर्षाचे वास्तव चित्रण आणि निसर्ग व मानव यांच्यातील सनातन संघर्षाची ही कथा होय.
‘कार्तिकी’ ही दिघ्यांची १९६६मधली कादंबरी असून डॉ.आंबेडकरांनी दलितांच्या जीवनात जो चैतन्यप्रवाह खेळविला, धर्मांतराचा जो जीवनमंत्र दिला त्या पार्श्वभूमीवर दलितांच्या जाणिवा, त्यांची मनःस्थिती, त्यांच्यावर होणारे अन्याय व अत्याचार यांचे चित्रण या कादंबरीत आहे. १९७८मधील ‘सोनकी’ ही आदिवासी जीवनाची पार्श्वभूमी असलेली कादंबरी कातकर व ठाकर जमातींच्या जीवनाचे चित्रण करते. त्याचबरोबर यंत्रयुगामुळे होणारे प्रदूषण, शहरी संस्कृतीचा वन्यजीवनावर होणारा प्रतिकूल परिणाम यांचे प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीत दिघ्यांनी केले आहे.
या कादंबर्यांखेरीज दिघे यांचे ७ कथासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांपैकी ‘पूर्तता’ (१९४४), ‘रम्य रात्री’ (१९४४), ‘ताजमहाल’, ‘आसरा’, ‘पावसाचे पाखरू’ हे गाजलेले कथासंग्रह आहेत. याशिवाय १९४४ साली त्यांनी ‘माझा सबूद’ हे नाटक व १९४९ साली ‘गातात न् नाचतात धरतीची लेकरं’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला.
दिघे यांनी आपल्या साहित्यातून ग्रामीण जीवन व त्यातील प्रश्न हाताळताना चित्तथरारक प्रसंगांना ग्रामीण निसर्गाच्या प्रत्ययकारी चित्रणाची जोड दिली. पकड घेणारा संघर्ष व रसरशीत शरीरप्रणय यामुळे त्यांच्या कादंबर्या आकर्षक ठरल्या. त्यांच्या साहित्यातील सर्वच व्यक्तिरेखांना कृषिसंस्कृतीचा अस्सल स्पर्श आहे. डोंगरदर्या, पहाड, वनराई, शेती यांच्यात मनाने व शरीराने गुंतून असणारी गावरान माणसे त्यांच्या कादंबर्यांत जिवंत होतात. कोरडवाहू जमिनीतील शेती, खेड्यातील अस्पृश्यतेचा प्रश्न, कूळकायद्यानंतर जमीनदार व कुळे यांच्यातील बिघडलेले संबंध, हे विषय दिघ्यांनी मनःपूर्वक, समरसून हाताळले आहेत. दिघ्यांची जीवनदृष्टी काहीशी स्वप्नाळू, स्वच्छंदतावादी-रोमँटिक आहे. त्यामुळे वास्तव, यथातथ्य चित्रण करतानाही त्या वास्तवतेकडे ते काव्यपूर्ण दृष्टीने पाहतात, त्यामुळे त्यांचे लेखन एकाच वेळी वास्तववादी आणि स्वप्नरंजनात्मकही आहे.
एकांतात रमणे हा दिघ्यांचा स्वभावधर्म असल्यामुळे ते चाळीसहून अधिक वर्षे शेतीत व निसर्ग सहवासात रमले. साहित्यिक वर्तुळात, सभा-संमेलनांत ते फारसे रमत नसत. त्यांनी स्वतःला कोणत्याही साहित्यिक प्रवाहाशी जोडून घेतले नव्हते. ग्रामीण जीवनातील वास्तव, शेतीच्या सर्व अवस्थांचे तपशील यांवर त्यांची पक्की पकड होती. सुष्ट आणि दुष्ट यांच्यातील नाट्यपूर्ण संघर्ष, भुरळ घालणारे सौंदर्य यांचे त्यांना विलक्षण आकर्षण होते. डिकन्सच्या विश्वाप्रमाणे त्यांचे जग माणसांनी गजबजलेले असले, तरी निसर्गाच्या सान्निध्यात एकट्याने बेहोषीत भटकण्याचा आनंदही ते वाचकांना देत. वाचकाला भुरळ घालण्याचे, धुंद करून टाकण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखनात होते. त्यांच्या कथानक रचनेत प्रसंगवर्णनाला महत्त्वाचे स्थान होते. कथानक मनोरंजक व्हावे म्हणून सुंदर नायक-नायिका, चित्ताकर्षक समर प्रसंग, प्रणय प्रसंग यांची अचूक योजना त्यांच्या कादंबर्यांतून आढळते. लाडी, मृगनयना, सोनकी, गोजरा या त्यांच्या सार्या नायिका लावण्यसंपन्न आहेत. ग्रामीण जीवन ज्यांना अपरिचित आहे, अशा वाचकांसाठी आपले लेखन आहे, ही जाणीव त्यांच्या मनात सतत जागी होती. त्यामुळे कथानक या घटकास त्यांच्या कादंबरीत केंद्रवर्ती स्थान प्राप्त झालेले दिसते. तसेच सुष्टांना काव्यात्म न्याय दिलेला त्यांच्या बहुतेक कादंबर्यांतून दिसतो.
व्यक्तिगत जीवनात दिघे यांना गायन-वादन ऐकणे, पोहणे, शिकार करणे, पक्षी निरीक्षण, आकाश निरीक्षण, निसर्ग निरीक्षण करीत भटकंती करणे, हे त्यांचे छंद होते. अद्भुत किस्से व कथा सांगणे त्यांना आवडे. प्रसिद्धीपराङ्मुख असल्यामुळे ते प्रत्यक्ष लोकांसमोर फारसे येत नसत.
चाळीसहून अधिक वर्षे शेतीत रमल्यामुळे त्यांचा सर्व गौरव शेतीमुळेच झाला. सुधारित शेती करून ‘प्रगतिशील शेतकरी’ हा नावलौकिक त्यांनी मिळवला होता. ‘अधिक धान्य पिकवा’ मोहिमेस त्यांनी सक्रिय साहाय्य केले म्हणून १९५२, १९५३, १९५४, १९५५ अशी ओळीने चार वर्षे कुलाबा जिल्ह्यातर्फे त्यांचा गौरव झाला होता. खोपोली परिसरात अस्पृश्यता निवारण, साक्षरता प्रसार या सामाजिक कार्यांत त्यांचा महत्त्वाचा सहभाग असे.
त्यांनी एके ठिकाणी स्वतःविषयी लिहिले आहे, ‘मी स्वतः मोठा साहित्यिक नाही, पण जन्मभूचे ऋण थोड्याबहुत प्रमाणात फेडण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी ‘वेडेवाकुडे’ गायिलो पण माझ्या जिवलग महाराष्ट्रा मी स्वतंत्र मराठ्याचा बाणा दाखवीत तुझाच म्हणवीत आलो.’
ग्रामीण कादंबरीच्या इतिहासात दिघ्यांचे स्थान निर्विवादपणे महत्त्वाचे आहे. मराठी कथात्मक साहित्यात ग्रामीण व प्रादेशिक साहित्यनिर्मितीचा नवा आणि समृद्ध प्रवाह निर्माण करण्याचे श्रेय दिघ्यांच्या ग्रामीण कादंबर्यांकडेच निःसंशयपणे जाते. आज दिघे हयात नसले, तरी त्यांचे साहित्य अनेक पिढ्यांना भुरळ घालीत राहील हे निश्चित.
दिघे यांच्या कादंबर्यांवर मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये चित्रपट निर्माण झाले आहेत. ‘पाणकळा’ कादंबरीवर ‘मदहोश’ हा हिंदी, ‘धरतीची लेकरं’ हा मराठी व ‘कार्तिकी कादंबरीवर ‘कार्तिकी’ हा मराठी असे चित्रपट निघाले असून ‘कार्तिकी’ चित्रपटास भारत सरकारचे उत्कृष्ट निर्मितीचे पारितोषिक मिळाले आहे.