Skip to main content
x

डॉ. एम. एस. नागराज राव

       डॉ. एम. एस. नागराज राव यांनी त्यांचा पदव्युत्तर परीक्षेसाठीचा अभ्यास, ख्यातनाम इतिहासकार के. नीळकंठशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. उत्खननाचे आणि संशोधनाचे तंत्र या बाबतीत त्यांना पुरातत्त्ववेत्ते म. न. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. राव यांना त्यांच्या पीएच.डी.साठीचे संशोधन, डेक्कन महाविद्यालयाच्या डॉ. ह. धी. सांकलिया यांच्या हाताखाली करण्याची संधी मिळाली. हे संशोधन तुंगभद्रेच्या खोर्‍यामध्ये करत असताना त्यांना टेक्कलकोट्टा आणि हल्लूर येथील अवशेषांचा शोध लागला.

     डॉ. राव यांना केंब्रिज विद्यापीठाकडून कॉमनवेल्थ स्कॉलरशिप मिळाली व तिथे त्यांनी इतिहासपूर्वकालीन पुरातत्त्वाचा विशेष अभ्यास केला. त्यांना अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे वस्तुसंग्रहालयशास्त्राशी त्यांचा परिचय झाला.

     त्यांना ‘टेक्कलकोट्टा येथील (आदिवासी) गिरिनिवासी’ या त्यांच्या प्रबंधाबद्दल १९६६साली डॉक्टरेट पदवी मिळाली.

     धारवाड विद्यापीठाच्या वस्तुसंग्रहालयाचे चीफ क्युरेटर म्हणून त्यांनी काही वर्षे काम पाहिले (१९६४) आणि त्यांच्यावर कर्नाटक विद्यापीठाच्या वस्तुसंग्रहालयाची, व नंतर पुरातत्त्वविभागाच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली (१९७२). पुरातत्त्वसंबंधित अनेक विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास असल्यामुळे तीन वर्षांसाठी त्यांना आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे महानिदेशक म्हणून पाठवण्यात आले (१९८३).

     डॉ. एम. एस. नागराज राव यांच्या पुरातत्त्व संशोधनाचे विविध पैलू आहेत. त्यांच्या टेक्कलकोट्टा येथील उत्खननामुळे  दक्षिण भारतातील इतिहासपूर्व पुरातत्त्व संशोधनास अधिक चालना मिळाली, तर त्यांच्या संगनकल्लू येथील संशोधनामुळे भारतातील लोहयुगाचा काळ इ. स.पूर्व १००० पर्यंत मागे नेला गेला. मध्ययुगातील पुरातत्त्व संशोधनामध्ये त्यांनी नवीन पायंडा पाडला. त्यांच्या ‘किरातार्जुनीयम्’संबंधीच्या ग्रंथामध्ये त्यांनी शिल्पकार व चित्रकार यांना हे कथानक कसे स्फूर्तिदायक वाटते, ते दाखवले आहे.

     डॉ. राव यांचे अनेक शोधनिबंध आणि पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांपैकी महत्त्वाची प्रकाशने : एुलर्रींरींळििी रीं डरसिरज्ञिरश्रर्श्री (संगनकल्लू येथील उत्खनने), झीशहळीीिींळल र्उीर्श्रीीींश, षि र्ढीसिरलहरवीर तरश्रश्रशू (तुंगभद्रा खोर्‍यातील इतिहासपूर्व संस्कृती), झरििीरार षि घरीरिींरज्ञर (कर्नाटक दर्शन).

     हम्पी येथे मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्खननांच्या अहवालाचे संपादनही डॉ. राव यांनी केले होते. डॉ. राव हे डॉ. सांकलिया यांचे शिष्य होते आणि आपल्या गुरूंप्रमाणे त्यांनीही सर्वसामान्यांमध्ये विशेषत: शाळकरी मुलांमध्ये पुरातत्त्व वास्तूंचे संरक्षण याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.

     पुराणवास्तूंचे संरक्षण व जीर्णोद्धार हा डॉ. राव यांच्या आवडीचा विषय होय. ते जेव्हा ऑर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे प्रमुख होते, तेव्हा त्यांनी आग्र येथील ताजमहाल, दिल्ली येथील लाल किल्ला, कुतुबमिनार, हुमायुनची कबर, पुरी येथील जगन्नाथ मंदिर, ऐरावतेश्वर मंदिर- दारासुरम, तामिळनाडूमधील एक्कमपटू येथील रंगनाथ मंदिर, आंध्र प्रदेशातील आलमपूरजवळील पापनासी येथील २३ मंदिरांचे स्थलांतर, गुजरातमधील रानी की वाव अशा अनेक वास्तूंची सुव्यवस्थित देखभाल केली व जीर्णोद्धार केला.

     डॉ. नागराज राव हे ऑर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे प्रमुख असताना १९८६साली ‘सार्क’ देशांची आंतरराष्ट्रीय पुरातत्त्व परिषद भरवण्यात आली होती. त्यानंतर कंबोडियामधील स्मारकांचे/मंदिरांचे जीर्णोद्धाराचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आले.

    डॉ. राव या ‘जीर्णोद्धार’ मोहिमेचा (ज्यात वास्तूंचे संरक्षण, डागडुजी व परंपरांचे पालन हे विषय येतात) पाठपुरावा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

र.वि. नातू

डॉ. एम. एस. नागराज राव