Skip to main content
x

दोशी, सरयू विनोद

     सरयू विनोद दोशी या भारतीय शास्त्रीय व समकालीन कला विषयाच्या प्रख्यात पंडिता आहेत आणि १९९६ ते २००५ या काळात त्या भारत सरकारच्या राष्ट्रीय आधुनिक कला दालनाच्या मानद संचालिका होत्या. या अवधीत त्यांनी तेरा मोठी प्रदर्शने व कलात्मक वस्तूंचे ‘शो’ आयोजित केले. १९९९ ते २००६ या काळात त्या ललित कला अकादमीच्या प्रभारी अध्यक्षा होत्या आणि १९८१ ते १९८६ या अवधीत मार्ग प्रकाशन, मुंबई याच्या संपादक होत्या. अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, बर्कले येथे अभ्यागत व्याख्यात्या (व्हिजिटिंग प्रोफेसर) होत्या.

     त्यांचा जन्म लीलावती आणि नगिनदास दुल्लभजी दफ्तरी या दाम्पत्याच्या पोटी गुजरातमधील जेतपूर येथे झाला. तीन बहिणी व दोन भाऊ अशा पाच भावंडांत सरयू या सर्वांत ज्येष्ठ होत. त्या अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांचे ग्रँट रोडच्या सेन्ट कोलंबा हायस्कुलात शालेय शिक्षण झाले. त्यानंतर एलफिन्स्टन महाविद्यालयात शिक्षण झाल्यावर त्यांनी सर जे.जे. कला महाविद्यालयात २ वर्षे शिक्षण घेतले. एप्रिल १९५६मध्ये त्यांचा विवाह लालचंद हिराचंद यांचे सुपुत्र विनोद दोशी यांच्याशी झाला. नंतर त्या अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून कला-इतिहास हा विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) झाल्या.

     मुंबई विद्यापीठातून त्यांनी प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या विषयात डॉक्टरेटची पदवी संपादन केली.

     यानंतर १९७३मध्ये डॉक्टरेट पदव्युत्तर कामासाठी त्यांना जे.डी. रॉकफेलर III निधीतून अनुदान मिळाले. त्यांनी अमेरिकेत शिकागो विद्यापीठात मोगल पेंटिंग हा विषय घेऊन हे कार्य केले आणि शिवाय न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये चित्रपट तंत्रज्ञान व चित्रपट निर्मिती हा उन्हाळी पाठ्यक्रम केला.

     भारत सरकारने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या कला-इतिहासवेत्तीला १९९९मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. इतकेच नव्हे तर, भारतात इटालिअन संस्कृतीचा प्रसार करण्याच्या कामगिरीबद्दल २००६ साली इटालिअन सरकारने डॉक्टर सरयू दोशी यांना ‘ऑर्डर ऑफ दि स्टार ऑफ इटालिअन सॉलिडॅरिटी’ ही पदवी देऊन गौरविले. भारतीय कला समाज किंवा आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. सन २००१मध्ये ‘बॉम्बे वेस्ट लेडीज सर्कल १०’ या संस्थेने ‘महिला उल्लेखनीय कार्य’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले व अखिल भारतीय दिगंबर जैन समाजाने त्यांचे संशोधन कार्य व योगदान यांबद्दल जैन विदुषी पुरस्कार देऊन त्यांचा आदर केला.

     त्यांनी कला, इतिहास व संस्कृती यांवर एकट्याने व संयुक्तपणे अनेक पुस्तके लिहिली व तशाच विषयांवर पंधरापेक्षा अधिक पुस्तकांचे संपादन केले. भारतात व परदेशातील अमेरिका, कॅनडा, यु.के., जर्मनी, ग्रीस, पोलंड, चीन, दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, मॉरिशस, ईजिप्त आणि ओमान या देशांतील अनेक वस्तुसंग्रहालये व विश्वविद्यालये यांतून कला विषयावर अनेक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन व बी.बी.सी. या प्रसारमाध्यमांवर त्यांनी भाषणे केली आहेत. वर्तमानपत्रे व संपर्कमाध्यमे यांतून कलाविषयक पुरवण्या आणि अंक यांतून त्यांनी अनेकदा सदर चालवले आहे.

डॉ. गीता साळी

दोशी, सरयू विनोद