Skip to main content
x

धीर, सुदर्शन देवराज

            मानवाला मिळालेले बुद्धीचे वरदान, तो आपले वैयक्तिक आयुष्य सुखकर करण्यासाठी वापरत असतो. या अर्थाने प्रत्येक माणूस हा संकल्पनकार आहे. अशा अद्वैत भावनेचे सार आपल्या आयुष्यात जोपासणारा, बोधचिन्हे आणि कॉर्पोरेट आयडेंटिटीच्या क्षेत्रातील अस्सल भारतीय संकल्पनकार म्हणजेच सुदर्शन देवराज धीर. त्यांचा जन्म पंजाबातल्या खोर्शियारपूर येथे झाला. त्यांचे वडील सोनार होते. त्यांचे बालपण कानपूरमध्ये गेले. तिथेच त्यांना लाहोरच्या चित्रकारांचा सहवास लाभला आणि त्यांच्यात वडिलोपार्जित कलेचे बीज रुजले.

त्यांनी चित्रकलेचे मूळ धडे कानपूरमध्ये गिरवले. जलरंगात काम करताना पांढरा किंवा तैलचित्र करताना काळा रंग न वापरणे, यांसारख्या तपशिलातील गोष्टी ते काम करतानाच शिकले. अशा तर्‍हेने, चित्रपटांची भित्तिपत्रके (पोस्टर्स) रंगवण्याचे काम त्यांनी नववीत असल्यापासूनच केले. पुढे चुलतभावाच्या सांगण्यावरून  त्यांनी सर जे.जे स्कूल ऑफ आर्टमध्ये १९५४ साली प्रवेश घेतला. त्यांचे पोस्टर डिझाइनचे काम बघून त्यांना थेट दुसर्‍या वर्गात प्रवेश मिळाला. मग कामाचा झपाटा सुरू झाला. सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत महा-विद्यालयात हजर रहायचे आणि दिवसभर काम करायचे.

पहिल्या दिवसांत त्यांनी चित्रपटांची पोस्टर्स केली. पुढे त्यांना साहजिकच त्याचा कंटाळा आला, आणि ते शो कार्ड्स, डिस्प्ले कार्ड्स, उत्पादनांच्या जाहिरातींची पोस्टर्स अशा प्रकारच्या जाहिरात संस्थेच्या कामात गुंतले. जे.जे.मध्ये शिक्षण चालूच होते. जे.जे.मध्ये पेंटिंगनंतर त्यांनी केवळ वसतिगृहात राहणे स्वस्त म्हणून पोस्टर डिझाइनला प्रवेश घेतला; कारण मुंबई तर त्यांना सोडायची नव्हती. त्यांनी नऊ वर्षांचा जे.जे.चा सहवास मिळवला.

तिथून बाहेर पडल्यावर सुदर्शन धीर यांनी जाहिरात संस्थेचा रस्ता धरला. एम.सी.एम.सारख्या जाहिरात संस्थेमध्ये ते कलासंचालक (आर्ट डायरेक्टर) पदापर्यंत पोहोचले. पण पुढे जाहिरातबाजीचाही त्यांना कंटाळा आला. जाहिरात संस्थेच्या कामातून, तसेच वाचनातून भारताबाहेरच्या विश्वाची त्यांना ओळख होत होती. त्यातच न्यूयॉर्कहून प्रसिद्ध होणार्‍या प्रिंटया मासिकाची त्यांना गोडी लागली.

आयबीएम कॉम्प्यूटर्स, सीबीएस टीव्ही, ‘थ्री-एमसारखे बॅ्रण्ड्स नवीन दृश्य ओळख आणि दृश्यभाषा घडवत होते. साधेपणा आणि कमीतकमी रेषा हा धर्म मानणार्‍या पॉल रॅण्डसारख्या जागतिक कीर्तीच्या संकल्पनकाराचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला. आयबीएमच्या बोधचिन्हाने लोगो जगात कॉर्पोरेट आयडेंटिटीचे नवे पर्व सुरू झाले. तिथूनच हे वारे जगभर पसरले.

याच सुमारास एक्स्पो सत्तरसारखी घटना घडली. जपानमध्ये मोठे औद्योगिक प्रदर्शन भरले आणि औद्योगिक क्षेत्रातला जपानचा आणि आशियाचा वाढता प्रभाव जगाच्या नजरेत भरला. सुदर्शन धीरांनी १९७३ मध्ये जपानी ग्रफिक डिझाइनर्सची भेट घेतली. तिथे त्यांनी काझुमी मसारू आणि इक्को तनाका यांना त्यांचे काम दाखवले. या दोघांनीही टोकियो ऑलिम्पिक गेम्सचे डिझाइन केलेले होते. या काळात एकूणच जपानी संकल्पन-कारांनी बोधचिन्हांच्या माध्यमातून पौर्वात्य परंपरेशी नाते सांगणारी वेगळी ओळख निर्माण केली होती. सुदर्शन धीर यांनी त्या प्रभावातून भारतात औद्योगिक बोधचिन्हांच्या क्षेत्रात काही करावे या हेतूने ग्रफिक कम्युनिकेशन कॉन्सेप्ट्सही संस्था १९७४ साली सुरू केली.

कॉर्पोरेट कम्युनिकेशन अथवा कॉर्पोरेट आयडेंटिटी क्षेत्र त्या काळात नवीन होते. वाय.टी. चौधरींसारखे मोजके संकल्पनकार या क्षेत्रात होते. तिथे बोधचिन्हांचे प्रकल्प यशस्वीपणे राबवणे, हेच धीर यांचे योगदान होय. यामुळे भारतातील कंपन्यांना स्वतःचा एक चेहरा मिळाला. 

स्वातंत्र्योत्तर काळात एलआयसी, एसबीआय, एसआयएल असे मोजके बॅ्रण्ड होते. भारत अजून औद्योगिक देश म्हणून उदयाला येत होता. त्यातच परकीय तेल कंपन्या जाऊन एचपी’ (हिंदुस्तान पेट्रोलियम) ही भारतीय तेल कंपनी अस्तित्वात आली. निमित्त होते बॉम्बे हाययेथे शोध लागलेल्या तेलाच्या खाणीचे. तिच्या संकल्पनेची (लोगो डिझाइनिंग) स्पर्धा सुदर्शन धीरांनी जिंकली. तोच त्यांचा औद्योगिक संवादकलेचा पाया ठरला.

एका हाताच्या बोटावर मोजता येतील. एवढेच औद्योगिक बोधचिन्ह संकल्पनकार भारतात असताना, सुदर्शन धीरांची ही झेप भलतीच यशस्वी ठरली. त्यांच्याच सांगण्यानुसार त्यांनी यात नवीन काहीच केले नव्हते. पण वारंवार येणार्‍या दृश्यघटकांचा (व्हिज्युअल इर्गोनॉमिक्स) योग्य वापर, घटकांची अर्थवाही मांडणी करणारे सौंदर्यशास्त्राचे व्याकरण ह्या सगळ्यांचा मिलाफ त्यांच्या कामात होता.

सुदर्शन धीर यांनी कॉर्पोरेट लिटरेचर, पॅकेजिंग, साईनेज सिस्टिम अशा एकमेकांशी निगडित क्षेत्रांत भरपूर काम केले. टायटन घड्याळे, आयसीआयसीआय व आयडीबीआयसारख्या बँका, एस्सार उद्योगसमूह अशासारख्या भारतीय आणि न्यूयॉर्कची हाइडक्राफ्ट, बेल्जियमची इण्डोजेम इन्कॉर्पोरेटेड अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी धीर यांनी बोधचिन्हे केली आहेत. किसानउत्पादनांसाठी केलेले पॅकेज डिझाइन आणि ब्रेडवर जॅम लावताना होणार्‍या जिभेच्या आकाराचा बोधचिन्हात केलेला सूचक वापर वाखाणण्याजोगा आहे. मुंबईच्या वर्ल्ड टे्रड सेंटरसाठी त्यांनी साइनेज सिस्टिम केली आणि त्यांनी केलेला मुंबईचा ग्रफिकल मॅपही उल्लेखनीय आहे.

बोधचिन्हांचे दृश्य संकल्पन व डिझाइन ही एका विशिष्ट उद्योगाची, प्रतीकरूपात दृश्य ओळख निर्माण करणारी सर्जनशील प्रक्रिया आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या बहुसांस्कृतिक वातावरणात अक्षरचिन्हे आणि प्रतीकांच्या आधारे बोधचिन्हे निर्माण करणे हे एक आव्हान असते. सुदर्शन धीर यांनी आपल्या बोधचिन्हांमधून ते समर्थपणे पेलले आहे.

कॅग हॉल ऑफ फेम, ग्रॅण्ड मास्टर, आयकोग्रडा, बोधचिन्हांच्या टीएएमजीए आयोजित सहाव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रशिया येथे मिळालेली गोल्ड ट्रॉफी असे अनेक सन्मान सुदर्शन धीर यांना मिळाले आहेत. द वर्ल्ड ऑफ सिम्बल्स, लोगोज अ‍ॅण्ड टे्रडमार्क्स- इंडियाहे कॉर्पोरेट आयडेंटिटीशी संबंधित दोन खंड त्यांनी संपादित केले आहेत.

- योगेश जहागीरदार

संदर्भ :
संकेतस्थळ : www.designinindia.net

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].