Skip to main content
x

धोंड, मधुकर वासुदेव

    संशोधक समीक्षक म.वा. धोंड यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत राममोहन हायस्कूल आणि विल्सन महाविद्यालय येथे झाले.

प्रारंभी १९३७ ते १९४५ या  काळात मुंबईच्या चिकित्सक समूहाच्या शिरोळकर हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते. त्यानंतर शासकीय महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक-पद स्वीकारले. धारवाडचे कर्नाटक कॉलेज, मुंबईचे इस्माइल युसूफ महाविद्यालय आणि एल्फिन्स्टन महा-विद्यालय या शिक्षण संस्थांत मराठी विषयाचे ते प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते. १९७२मध्ये निवृत्त झाल्यावर ‘मराठी संशोधन मंडळ’ ह्या संस्थेत संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. संगीताइतकाच त्यांना रोखे बाजारातील उलाढालीत रस होता. या दोन्ही क्षेत्रांतील बारकाव्यांचे त्यांना अचूक ज्ञान होते.

१९४८ साली त्यांचे ‘काव्याची भूषणे’ हे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. अलंकार आणि अलंकारशास्त्र यांसंबंधी विस्तृत चर्चा करणार्‍या या पुस्तकाचे जाणकारांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांचे ‘मर्‍हाटी लावणी’ (१९५६) हे लावणी वाङ्मयाचा मागोवा घेणारे आणि त्यासंबंधी सखोल विवेचन करणारे संशोधनपर पुस्तक प्रकाशित झाले आणि भरपूर गाजले. लावणीचा उगम आणि विकास यांचा मूलगामी विचार करताना आणि त्यातील काव्य उलगडून दाखविताना त्या वेळची राजकीय, सामाजिक आणि धार्मिक स्थिती काय होती, याचा तपशीलवार आढावा प्रा.धोंड यांनी घेतलेला आहे. १९८८ साली निघालेल्या दुसर्‍या आवृत्तीत त्यांनी लावणीचे कुल आणि शील स्पष्ट करणारी महत्त्वाची माहिती समाविष्ट केली. निवडक एकसष्ट लावण्यांची पुरवणीही जोडली.  ‘लावणी’ या काव्यप्रकाराचे त्यांनी केलेले सांगोपांग विवेचन अभ्यासकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.

प्रा.म.वा.धोंड केवळ समीक्षक नव्हते, त्यांच्या समीक्षेला मूलगामी संशोधनाची जोड होती. एखाद्या विषयाचा परामर्श घेताना प्रा.धोंड त्याच्या मुळापाशी पोचत. एखाद्या साहित्यकृतीचे परिशीलन करताना त्यांच्या चौकस मनाला अनेक प्रश्न पडत. त्या प्रश्नांची उकल होईपर्यंत ते समग्र ज्ञात-अज्ञात संदर्भांचा धांडोळा घेत. ‘ज्ञानेश्वरी’मधील नाण्याचे उल्लेख तपासून पाहण्यासाठी जागतिक नाणेशास्त्राचा इतिहास त्यांनी वाचून काढला आणि ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टीचे विश्लेषण करण्यापूर्वी वनस्पतिशास्त्राचा बारकाईने अभ्यास केला. रणजीत देसाईंच्या ‘स्वामी’ कादंबरीतील भाषेच्या ढंगाचा विचार करताना प्रा.धोंड पेशवेकालीन पत्रव्यवहार, बखरी, होळकरांच्या कैफियती, लावण्या, पोवाडे यांच्या अथांग सागराच्या तळाशी पोचतात आणि कादंबरीतील संवाद कसे कृत्रिम व पाश्चात्त्य धर्तीचे आहेत, हे सोदाहरण दाखवतात. इतकेच नव्हे तर बखरीतील पेशवेकालीन पत्रव्यवहारातील भाषिक ढंगाचा निर्वाळा देऊन ‘स्वामी’तील संवाद कसे असायला हवे होते, याचेही विवेचन करतात.

बालकवींची ‘औदुंबर’ कविता, बी. कवींची ‘चाफा’ कविता, श्री.ज.जोशी यांच्या ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘रघुनाथची बखर’ या कादंबर्‍या यांवरील त्यांची संशोधनात्मक समीक्षा  विलक्षण गाजली; ती त्यांच्या विशिष्ट विश्लेषण शैलीमुळेच. ‘ज्ञानेश्वरी’  ग्रंथाचे नवे आकलन मांडणारे ‘ज्ञानेश्वरी: स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य’ (१९८०) हे त्यांचे पुस्तक संपन्न रसाळ भाषेमुळे वरची उंची गाठते. राम गणेश गडकरींच्या नाट्यलेखनावर नव्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकणारे त्यांचे ‘चंद्र चवथिचा’ (१९८७) हे पुस्तक ‘एकच प्याला’  नाटकाचा पूर्णतया वेगळ्या पद्धतीने परामर्श घेते. ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’ (१९९१) ह्या पुस्तकामध्ये त्यांच्या प्रगल्भ, चिंतनशील वृत्तीचा प्रत्यय येतो. तत्कालीन परिसराचे ज्ञानेश्वरीत येणारे अनेक उल्लेख प्रा.धोंडांचे कुतूहल जागृत करतात आणि त्यांचा शोध घेताना त्यांना लौकिक सृष्टीविषयी वाटणारे कुतूहल वाचकांना समृद्ध अनुभव देऊन जाते.

आयुष्याच्या उत्तरार्धात प्रा.धोंड यांना मर्ढेकरांच्या कवितेने झपाटलेले दिसते. अन्य समीक्षकांनी मर्ढेकरांच्या कवितेचा लावलेला अन्वयार्थ त्यांना मान्य नाही. इतकेच नव्हे तर ‘पिपात मेले ओल्या उंदिर’  या कवितेवर आधी केलेले भाष्य त्यांनी नंतरच्या काळात खोडून काढले आणि त्या कवितेचा अर्थ नव्याने विशद केला. ऑगस्ट १९६७च्या ‘सत्यकथे’च्या अंकात  त्यांनी ‘दंभहारक’ या  नियतकालिकाच्या १८७५च्या अंकातील उंदीर मारण्याची काहीशी गुंतागुंतीची युक्ती सांगणारा एक लेख उद्धृत देऊन त्या गुंतवळ्यातून मर्ढेकरांच्या त्या कवितेतील रूपक उलगडण्याची खटपट केली होती. या कवितेवरील नव्या भाष्यवजा लेखात प्रा.धोंड यांनी आपले पूर्वीचे भाष्य खोडून टाकले आणि रॉबर्ट बर्न्सची ‘टू अ माउस’ ही कविता, स्टाइनबेकची ‘ऑफ माइस अँड मेन’ ही कादंबरी, ‘ रॅट रेस’ ह शब्दप्रयोग आणि ‘बॅरल अ वेट’ या इंग्रजी शब्दांचे लाक्षणिक अर्थ यांच्या आधारे कवितेचा अर्थ नव्याने उलगडून दाखविला आहे. याच पद्धतीने त्यांनी ‘तरीही येतो बहर फुलांना’, ‘बन बांबूचे पिवळ्या गाते’ यांसारख्या कवितांवर भाष्य केले आहे. प्रा.धोंड यांनी बहुविध संदर्भांचा विशिष्ट कवितेशी जोडलेला संबंध काही टीकाकारांना बादरायणी वाटला, तरी स्वतः धोंड मात्र त्याबाबत ठाम राहिले.

समीक्षाक्षेत्रात एकमेवाद्वितीय असलेल्या या संशोधक समीक्षकाची प्रसन्न, प्रासादिक शैली, संपन्न रसाळ भाषा यांमुळे त्यांचे लेखन अतिशय वाचनीय होते. 

त्यांच्या ‘जाळीतील चंद्र’ ह्या पुस्तकास ‘साहित्य अकादमी’ने पुरस्कार देऊन गौरविले.

- डॉ. सुभाष भेण्डे

धोंड, मधुकर वासुदेव