Skip to main content
x

धर्माधिकारी, त्रिविक्रम नारायण

     त्रिविक्रम नारायण धर्माधिकारी यांचा जन्म वैशाख पौर्णिमा या दिवशी धुळे जिल्ह्यातील एरंडोल गावी लक्ष्मी व नारायण या दाम्पत्याच्या उदरी झाला. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच संस्कृत भाषेच्या अध्ययनाची सुरुवात वडिलांकडेच झाली. शालेय  शिक्षण पूर्ण झाल्यावर संस्कृतच्या पुढील अभ्यासासाठी ते पुण्यात आले. पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या बालमुकुंद संस्कृत महाविद्यालयातून १९५४ साली साहित्य विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर १९५७ साली ते पुणे विद्यापीठातूनच एम.ए. झाले. पुढे १९७१ साली कृष्ण यजुर्वेदाच्या मैत्रायणी संहितेची भाषा व कर्मकाण्ड या विषयावरील त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रदीर्घ प्रबंधाला पुणे विद्यापीठाने पीएच.डी. पदवी बहाल केली.

     डॉ. त्रिविक्रम नारायण धर्माधिकारी यांची संशोधक म्हणून कारकिर्द सुरू झाली ती पुण्यातील वैदिक संशोधन मंडळ या संस्थेतून. या संस्थेत सन १९५७ ते १९९३ अशी एकूण ३६ वर्षे संशोधक व संपादक म्हणून ते कार्यरत होते. तसेच डॉ. धर्माधिकारी यांनी १९६७ ते १९९१ या काळात वैदिक संशोधन मंडळाचे सचिवपद समर्थपणे सांभाळले.

     १९८३ साली भारत शासनाने वैदिक संशोधन मंडळाला ‘आदर्श संस्कृत शोध संस्था’ म्हणून मान्यता दिली. तेव्हापासून सन १९९३ पर्यंत या संस्थेचे संचालकपदही डॉ. धर्माधिकारी यांनी अतिशय समर्थपणे सांभाळले. अशा प्रकारे प्रशासकीय कार्यात व्यग्र असतानासुद्धा त्यांनी प्रचंड संशोधनात्मक कार्य केले. त्यांच्या संशोधनकार्यातील सर्वमूर्धन्य कार्य म्हणजे कृष्ण यजुर्वेदाच्या तैतिरीय संहितेचे संपादन होय. सप्तकांडात्मक अशा त्या संहितेच्या भट्टभास्कर व सायण भाष्यांसहित पदपाठ देऊन अतिशय शुद्ध आवृत्ती त्यांनी संपादित केली आहे.

     चार खंडातील आठ भागांतून वैदिक संशोधन मंडळाकडून प्रकाशित झालेली चार हजारांहून अधिक पृष्ठसंख्येची ही आवृत्ती पारंपरिक व आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या विद्वानांकडून प्रशंसनीय ठरली व तिला प्रमाणभूत आवृत्ती म्हणून जगभरात नावलौकिक मिळाला आहे.

    बौधायन श्रौतसूत्राच्या भवस्वामी भाष्याच्या संपादनाचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रासाठी समग्र बौधायन श्रौतसूत्राची भवस्वामी भाष्यासहित चिकीत्सक आवृत्ती त्यांनी संपादित केली आहे. तसेच वैदिक संशोधन मंडळाकडून प्रकाशित झालेल्या चार हजारांहून अधिक हस्तलिखित पोथ्यांचे डेस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग्स, हीरक महोत्सवी ग्रंथ, यज्ञायुधानि, मैत्रायणी संहिता, इट्स रिचुअल अ‍ॅण्ड लॅग्वेज इत्यादी प्रकाशनेदेखील त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य होय. याव्यतिरिक्त इतर अनेक संस्थांसाठी डॉ. धर्माधिकारी यांनी संशोधनात्मक कार्य केले आहे.

    डॉ. त्रिविक्रम नारायण धर्माधिकारी यांचे अध्यापन कौशल्यदेखील विलक्षणच आहे. वेद व उपनिषद यांसारखा गूढ तत्त्वज्ञानात्मक विषय असो, न्याय मीमांसादी क्लिष्ट शास्त्रीय परिभाषा असो, निरुक्तादी किचकट व्युत्पत्ती शास्त्र असो किंवा जटिल श्रौत कर्मकांडात्मक भाग असो; ते सर्व अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे समर्पक  दाखले देऊन डॉ.  धर्माधिकारी समोरच्या विद्यार्थ्यांच्या हृदयात पूर्णपणे बिंबवत असत. असे केल्याशिवाय त्यांचे कधीही समाधान होत नसे. यामुळे असे म्हणायला हवे की, ते खरोखरच शिष्यचित्तापहारक असे गुरू आहेत.

    ग्रंथसंपादन शास्त्राबाबत (टेक्स्चुअल क्रिटिसिझमबाबत) तर ‘यास्तेषां स्वैरकथा: ता एव भवन्ति शास्त्राणि’ या वचनानुसार त्यांची सहज विधानेदेखील शास्त्रवचनांप्रमाणेच प्रमाणभूत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात अनेक वर्षे नियमितपणे अभ्यागत प्राध्यापक म्हणून व संपूर्ण भारतभरात अनेक विद्यापीठांत व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रासंगिक अध्यापनाचे कार्य त्यांनी केले आहे. संपूर्ण भारतभरात व परदेशात अनेक ठिकाणी व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, बीज भाषणे इत्यादी रूपांनी त्यांनी केलेले लेखन अतिशय मौलिकच आहे. त्यांतील पंचाहत्तर लेखांचा संग्रह ग्रंथरूपाने प्रकाशित झाला असून पुढील पन्नास लेखांचा संग्रह पुढे प्रकाशित झाला.

    प्राच्यविद्या क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना भारत शासनाचा राष्ट्रपती पुरस्कार, दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठमचा  पुरस्कार, गुरु गङ्गेश्वरानन्द पुरस्कार, वेदरत्न पुरस्कार, श्रीमंत नानासाहेब पेशवे पुरस्कार, पुरुषोत्तम पुरस्कार इत्यादी पंधराहून अधिक नामवंत पुरस्कार प्राप्त झाले आहेत व लाल बहादूर शास्त्री केंद्रीय विद्यापीठ, दिल्ली या विद्यापीठाची सन्माननीय डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली आहे.  डॉ. धर्माधिकारी यांनी केवळ पुण्यातीलच नव्हे तर भारतातील अनेकविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळून त्या-त्या संस्थांच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान दिले .

डॉ. परशुराम परांजपे

धर्माधिकारी, त्रिविक्रम नारायण