Skip to main content
x

गाडगीळ, गंगाधर गोपाळ

     सौ. सत्यभामा व श्री. गोपाळ कृष्ण गाडगीळ यांचे ज्येष्ठ पुत्र गंगाधर गाडगीळ यांचा जन्म मुंबई येथे झाला. आर्यन एज्युकेशन सोसायटीची शाळा, गिरगाव मुंबई येथून १९३८ साली मॅट्रिक झाले. १९४४ साली मुंबई विद्यापीठाच्या विल्सन महाविद्यालयातून एम. ए.ची इतिहास, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. १९४८ साली वासंती खटखटे यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. १९४६ साली किकाभाई महाविद्यालय, सूरत; पोद्दार महाविद्यालय, व सिडनहॅम महाविद्यालय, मुंबई १९५९, रुपारेल महाविद्यालय, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. १९४६ पासून १९७१ पर्यंत त्यांनी नरसी मोनजी वाणिज्य महाविद्यालय, मुंबई ह्या महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषविले. आपटे उद्योग समूह, मुंबई व वालचंद उद्योग समूह ह्यांचे ते आर्थिक सल्लागार होते.

      १९४१ साली ‘प्रिया आणि मांजर’ ही पहिली कथा ‘वाङ्मयशोभा’ मासिकात प्रकाशित झाली. तेव्हापासून २००८ पर्यंत सातत्यपूर्ण अशी प्रदीर्घ साहित्यिक कारकिर्द. गाडगीळांना लेखक म्हणून आपल्या स्वत्वाची व सामर्थ्याची खूण प्रारंभकाळातच उमगली. १९४९मध्ये ‘कडू आणि गोड’ कथेला ‘अभिरुची’ मासिकाचे पारितोषिक, १९५४ साली ‘भिनलेले विष’ कथेला न्यूयॉर्क हेरल्ड ट्रायब्यून पारितोषिक तसेच ‘तलावातले चांदणे’ (१९५४), ‘ओले उन्ह’ (१९५७) या कथासंग्रहांना मुंबई राज्य पारितोषिके- अशी मान्यता यांच्या कथालेखनाला मिळाली. १९४५ ते १९६० हा कथाक्षेत्रावरील त्यांच्या अधिराज्याचा कालखंड ठरला.

     १९४० नंतरच्या दशकात बा.सी.मर्ढेकरांनी कवितेच्या क्षेत्रात आणि गाडगीळांनी कथाक्षेत्रात मन्वंतर घडवून आणले. प्रस्थापित साहित्यपरंपरेला नकार व धक्का देणार्‍या त्यांच्या साहित्यातून नवसंवेदनशीलता, नवी कलादृष्टी मूर्त झाली. पाश्चात्य साहित्य व समीक्षा यांतील नव्या प्रवाहांची प्रेरणा या प्रवर्तनामागे निश्चितच होती, परंतु तीच केवळ नव्हे. विसाव्या शतकातील झपाट्याने व अंतर्बाह्य बदलत गेलेले जीवनवास्तव, नवनवे ज्ञानव्यूह, नवे संशोधन, त्यातून उपजलेली नवी परिप्रेक्ष्ये आणि नवे जीवनदर्शन हे सारे साहित्यातील नवतेच्या प्रवर्तनाला प्रेरक ठरले. त्यातून नव्या कलासंकेतांचा व्यूह अपरिहार्यपणे आकाराला आला. गाडगीळांच्या नवकथेतूनही याची प्रचिती येते.

     आधुनिक नागर संवेदनशीलता हा त्यांच्या कथेतील अनुभवविश्व घडवणारा एक मूलभूत घटक आहे. महायुद्धोत्तर यंत्रयुगीन जीवनातील गर्दीच्या संस्कृतीचा, विघटनाच्या प्रक्रियेचा अर्थ शोधू पाहणारी ही कथा आहे. मुंबई नगरीचे संवेदन ती साक्षात करते. पांढरपेशा मध्यमवर्गीयांची जीवनप्रणाली, त्यांचे अनुभवविश्व, ते नियंत्रित करणारा मूल्यव्यूह यांचे चित्रण ती बहुधा करते; पण महत्त्वाची गोष्ट ही की त्यापलीकडे जाऊन मानवी मन व जीवन यांच्या व्यामिश्र स्वरूपाची, त्यांतले अंतर्विरोध व अतर्क्यता यांची प्रतीती ती घडवते. माणसाचे सनातन एकाकीपण, जीवनातील असंगतता यांचा वेध घेणार्‍या गाडगीळांच्या या कथेतील जीवनार्थाचा संदर्भ व्यापक आहे. त्याला अनेक पातळ्या व परिमाणे आहेत. अनुभव विश्वाच्या अशा अपारंपरिक, नव स्वरूपामुळे गाडगिळांना मुळात कथा या साहित्य प्रकाराची संकल्पना नव्याने घडवणे, ती अधिक खुली करणे अपरिहार्य ठरले. कथानक, पात्र, निवेदक इत्यादी कथाघटक आणि त्यांच्या संघटनेमागची तत्त्वे यांच्या स्वरूपात त्यांनी मूलगामी परिवर्तन घडवून आणले. त्यातूनच मराठी ‘नवकथा’ निर्माण झाली. पु.भा.भावे, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर प्रभृती कथाकार या काळात गाडगीळांचे सहप्रवासी होते.

     कलावंतांचे अनुभव घेण्यामधले स्वातंत्र्य हे मूल्य गाडगीळांच्या नवनिर्मितीमागची एक महत्त्वाची प्रेरणा होती. साहित्यक्षेत्रात त्या काळी प्रचलित असलेल्या निषेधगंडापासून मुक्तता; साहित्याची शुचिता व सुंदरता याविषयीच्या प्रगल्भ, आधुनिक कलाजाणिवा यांचे या स्वातंत्र्याच्या मूल्याशी नाते जुळते. गाडगीळांमधल्या कलावंतांची अशी साहसी, प्रयोगशील वृत्ती त्यांच्या इतर साहित्य प्रकारांतल्या लेखनातूनही व्यक्त होते. ‘लिलीचे फूल’ (लघुकादंबरी, १९५५), ‘साता समुद्रापलीकडे’ (प्रवासलेखन, १९५९- मुंबई राज्य पारितोषिक) तसेच ‘ज्योत्स्ना आणि ज्योती’ (नाटक, १९६४) ही त्याची ठळक उदाहरणे होत. गाडगीळांनी प्रवासलेखन (‘गोपुरांच्या प्रदेशात’ १९५२) त्या आधी आणि नंतरही केले (‘चीन : एक अपूर्व अनुभव’ १९९३; ‘नायगाराचं नादब्रह्म’ ११९४; ‘हिममय अलास्का’ २००० इत्यादी). ‘साता समुद्रापलीकडे’मधून मात्र त्यांनी प्रवासलेखनातील नवनिर्मितीच्या विविध शक्यता प्रत्यक्षात आणून एक नवा मानदंड निर्माण केला. ‘वेड्यांचा चौकोन’ (१९५२) ह्या नाटकामधून त्यांनी मराठी रंगभूमीला त्या काळात तशा अनोख्या असलेल्या आधुनिक फार्सचा नमुना सादर केला. याखेरीज १९४१ ते १९७० या पहिल्या पर्वात गाडगिळांनी गंभीर कथांच्या जोडीने विनोदी कथाही लिहिल्या तसेच श्रुतिका/एकांकिका, बालसाहित्य व समीक्षा या प्रकारचे लेखनही केले.

    ‘दुर्दम्य’ (१९७१) या लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरीपासून गाडगीळांच्या साहित्यिक कारकिर्दीचे उत्तरपर्व सुरू होते. त्यांच्या लेखनाने इथे एक वेगळे वळण घेतले. तोपर्यंतच्या आपल्या लेखनातून ते मुख्यतः थांग घेत राहिले तो आंतर वास्तवाचा, माणसाच्या अंतर्विश्वाच्या बाह्य वास्तवाचा संदर्भ तिथे अर्थपूर्ण होताच, पण परोक्षपणे मुख्यतः कथेसारखा स्फुट साहित्यप्रकार त्यांनी हाताळला आणि सर्वसामान्य माणसांच्या, त्यांच्या जीवनव्यवहाराच्या चित्रणातून म्हणजे सर्वसामान्यत्वातून जीवनार्थाची निर्मिती केली, वीरनायकाच्या प्रतिमेला तिथे स्थान नव्हते. लेखनाच्या दुसर्‍या पर्वात त्यांनी कादंबरीसारखा मोठा अवकाश असलेला साहित्यप्रकार निवडला. ‘दुर्दम्य’ आणि ‘प्रारंभ’ (२००२) या बृहद् कादंबर्‍यांतून त्यांनी अनुक्रमे लोकमान्य टिळक आणि जगन्नाथ शंकरशेट या लोकोत्तर पुरुषांच्या, त्यांच्या जीवनकार्याच्या चित्रणातून ऐतिहासिक वास्तवाची पुनर्निर्मिती केली. राष्ट्रातील सामाजिक-राजकीय उत्थानाची प्रक्रिया, जुलमी परकीय राजवटीशी दिलेला लढा (‘दुर्दम्य’) आणि मुंबईनगरीच्या उत्क्रमणाचा, जडणघडणीचा पट, आधुनिक संस्कृतीच्या प्रवाहात तो सामावत जाण्याचा घटनाक्रम (‘प्रारंभ’) असे व्यापक जीवनक्षेत्र त्यांतून चित्रित झाले. ‘गंधर्वयुग’ (२००५ बालगंधर्व), ‘भरारी’ (२००६ रा.ब.विश्वनाथ ना.मंडलीक) अशा कादंबर्‍यांचा आवाका वरील बृहद् कादंबर्‍यांशी तुलनीय नसला, तरी त्यांची जातकुळी तीच आहे.

     या सर्वच कादंबर्‍यांना बहुमुखी वाचक प्रतिसाद मिळाला. विशेष अभिज्ञ अशा वाचकांसह वाचकांची इतर वर्तुळेही गाडगीळांच्या वाचकवर्गात सामावून गेली.

     ही गोष्ट त्यांच्या या काळातल्या इतर ललित लेखनाबाबतही खरी आहे. उदाहरणार्थ ‘फिरक्या’ (१९७६) व अन्य संग्रह, ‘आर्थिक नवलकथा’ (१९८२ व १९८५), तसेच ‘मुंबई आणि मुंबईकर’ (१९७०) व ‘मुंबईच्या नवलकथा’ (१९९६) इत्यादी. प्रत्यक्षातील अनुभवांना कल्पिताची डूब देत विनोदी ललितलेखाचा एक नवा मुक्त बाज गाडगीळांनी ‘फिरक्या’च्या रूपाने घडवला. याखेरीज मुंबईच्या सामाजिक- सांस्कृतिक इतिहासातून निपजलेले, एकोणिसाव्या शतकातल्या मुंबईतील जीवनाचा खास स्वाद देणारे लेखन हीदेखील अस्सल ‘मुंबईकर’ लेखक असलेल्या गाडगीळांची आणखी एक वेधक निर्मिती आहे. ‘Crazy Bombay’ (१९९१) या इंग्रजी पुस्तकाचाही या अनुषंगाने आवर्जून उल्लेख केला पाहिजे, त्यातील बहुरंगी विनोदाचा उल्लेख होणेही अपरिहार्य आहे.

     गाडगीळांनी नव्या वाटांचा शोध घेतला तो विनोदाच्या क्षेत्रातही. त्यांचे विनोदी लेखन कथा, एकांकिका, फार्स, ललित लेख, प्रवासलेखन असे विविध साहित्य प्रकारांतील आहे. मराठीतील प्रस्थापित व लोकप्रिय अशा उपहासप्रधान, विडंबनपर विनोदपरंपरेचाच मागोवा घेत न राहता त्यांनी आपला रोख वळवला तो केवल/विशुद्ध विनोदाच्या विविध रूपांचा  शोध घेण्याकडे. सौम्य व सूक्ष्म प्रकृतीच्या विनोदाच्या अनेकविध रुची व तर्‍हा त्यांनी नव्यानेच मराठीत आणल्या. त्यांनी फँटसीचा मेळ विनोदाशी साधला. तसेच उन्मुक्त, अवखळ, प्रहसनात्मक विनोदाची नानाविध रूपे साकारली. चिं.वि.जोशी यांच्या चिमणरावाप्रमाणे गाडगीळांचा बंडू, त्याची पत्नी स्नेहलता आणि त्यांचे जग हे वाचकाच्या भावविश्वाचा एक अविभाज्य घटक होऊन राहिले. (‘खरं सांगायचं म्हणजे....’, १९५४, ‘बंडू’ १९५७) त्यांच्या विनोदी लेखनाने मराठी विनोदाभिरुचीला अधिक मुक्त, चौरस तसेच सूक्ष्मतरल होण्याचे आवाहन सातत्याने केलेले आहे. 

     ‘एका मुंगीचे महाभारत’ हे गाडगीळांचे आत्मचरित्र (१९९३ साली प्रसिद्ध), (१९९६ साली साहित्य अकादमी पुरस्कार) ही उत्तरार्धातील त्यांची आणखी एक महत्त्वाची अशी बृहद् संहिता आहे. निर्मिती प्रक्रियेचे रहस्य आणि आपला विशिष्ट प्रतिभाधर्म यांचा शोध घेऊ पाहणार्‍या लेखकाची ही गोष्ट आहे. कलावंत म्हणून घेतलेला आत्मशोध आणि अनुषंगाने स्वतःच्या साहित्याची केलेली पुनरालोचना हे या आत्मचरित्राचे खास वैशिष्ट्य आहे. एक माणूस आणि एक लेखक या आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन रूपांतल्या परस्पर अनुबंधांचा मागोवा घेण्याची प्रक्रियाही यातून दिसून येते. समकालीन वाङ्मयीन, सामाजिक-सांस्कृतिक कालखंडाची पुनर्निर्मिती हा या संहितेत सामावलेला एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या आत्मचरित्राला पूरक असा ‘आठवणींच्या गंधरेखा’ (१९९३) हा व्यक्तिचित्रांचा संग्रह गाडगीळांच्या आत्मकथनपर स्फुट लेखनाचा एक दर्जेदार नमुना आहे.

     एक लेखक म्हणून अनेक गोष्टी करून पाहण्याचा पिंडधर्म असलेले गाडगीळ बालसाहित्यातही रमले. सुरुवातीच्या काळापासून (‘लखूची रोजनिशी’- कथा १९५४; ‘शहाणी मुले’- एकांकिका, १९६१ इत्यादी) ते अगदी अखेरपर्यंत (‘अश्रूंचे झाले हिरे’, ‘गरुडाचा उतरला गर्व’- कथा, २००८ इत्यादी) त्यांनी मुलांसाठी लिहिले. मुलांच्या मुक्त, निरंकुश मनोव्यापारांविषयी त्यांना असलेली त्यांना असलेली ओढ आणि समज तसेच मुलांकडे रोमँटिक दृष्टिकोनातून न पाहता, तीदेखील लहान वयातली पण गुणदोषयुक्त अशी माणसेच, ही त्यांची जाण हे विशेषही त्यांच्या बालसाहित्याला धार्जिणे ठरले. ‘धाडसी चंदू’ (१९५१) हा मार्क ट्वेनच्या ‘टॉम सॉयर’चा त्यांनी केलेला संक्षिप्त, स्वैर अनुवाद देखील मुलांना आपलासा वाटला.

     नवसाहित्याचे समर्थक, प्रवक्ते म्हणून गाडगीळ प्रथम समीक्षेकडे वळले. पुढेही वेळोवेळी प्रसंगानिमित्ताने त्यांनी साहित्यिक वादांत झुंज दिली. गाडगीळांचे समीक्षालेखन तात्त्विक आणि प्रत्यक्ष(practical) असे दोन्ही प्रकारचे आहे. आधुनिक साहित्याची जी प्रत्यक्ष समीक्षा त्यांनी केली, तिला ‘आस्वादक समीक्षा’ असे म्हणत; तथापि ती भारावून जाऊन लिहिलेली संस्कारवादी समीक्षा नाही. तिला निश्चित अशी तात्त्विक बैठक आहे, वैचारिक शिस्त आहे. तसेच गाडगीळांची सूक्ष्मतरल सौंदर्यदृष्टी, अभिजात रसिकता यांचा प्रत्यय घडवणारी अशी ती आहे. त्यांची साहित्यविषयक भूमिका स्वायत्ततावादी म्हणता येईल, मात्र ती एकारलेली नाही; संतुलित, समग्रतेचे भान ठेवणारी अशी आहे. ‘खडक आणि पाणी’(१९६०), ‘साहित्याचे मानदंड’ (१९६२), ‘पाण्यावरची अक्षरे’ (१९८०, न.चिं.केळकर पारितोषिक, पुणे), ‘आजकालचे साहित्यिक’ (१९८०, रा.श्री.जोग पारितोषिक, पुणे), ‘प्रतिभेच्या सहवासात’ (१९८५) हे त्यांचे काही महत्त्वाचे समीक्षाग्रंथ होत. ‘Indian Literature: Issues and Exploration’ (१९९५) हा भारतीय साहित्याचा परामर्श घेणारा इंग्रजी ग्रंथही त्यांनी लिहिला आहे.

     समीक्षेखेरीज अन्य वैचारिक लेखनही गाडगीळांनी केलेले आहे. (‘आर्थिक प्रश्न आणि अर्थव्यवस्था’, १९८५; ‘आर्थिक प्रश्न : काल, आज आणि उद्या’, १९९७) अर्थशास्त्र चारचौघांच्या भाषेत मांडणे आवश्यक आहे, ते सर्वसामान्य नागरिकाला उमगले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे असे. ‘आर्थिक नवलकथां’तूनही त्यांना हेच साधायचे होते. समाजवादी विचारप्रणालीच्या अधिराज्याच्या काळात गाडगीळांनी त्यातील पोथीनिष्ठता, एकरलेले दृष्टीकोन व धोरणे यांच्या संभाव्य धोक्यांबाबत सावधगिरीचा इशारा दिला; मुक्त अर्थयंत्रणेचा पुरस्कार केला, बराचसा एकाकीपणे. संकल्पना, मग त्या कोणत्याही क्षेत्रातील असोत, साधनांसारख्या असतात, स्वयंभू नव्हेत. त्यांचा वापर केला तरी त्यांचे गुलाम होऊ नये आणि आवश्यकतेनुसार त्यांची चौकट लवचिक केली पाहिजे, अशी त्यांची धारणा होती.

     गाडगीळांच्या साहित्याचे इंग्रजीत आणि हिंदी, गुजराती अशा इतर भारतीय भाषांत अनुवाद झालेले आहेत. (‘बस का टिकट’, १९९१; ‘खिचाइयाँ’, २००१; केटलीक वर्ताओ, गुजराती;  ‘The Begining’, २००६ इत्यादी त्यांतील काही इंग्रजी अनुवाद त्यांनी स्वतः केलेले आहेत. (‘The Throttled street and other Stories; १९९४ इत्यादी) संस्थात्मक कार्य हेदेखील गाडगीळांच्या कर्तृत्वाचे अंग आहे. सचिव, ऑल इंडिया रायटर्स कॉन्फरन्स (१९६२), अध्यक्ष मुंबई, मराठी साहित्य संघ (१९८३-२००४) अध्यक्ष, मुंबई मराठी साहित्य महामंडळ काही काळ उपाध्यक्ष, साहित्य अकादमी (१९८८-९३) इत्यादी पदांवरून त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष (१९८४-२००७) म्हणून त्यांनी केलेले पायाभूत स्वरूपाचे कार्य त्यांच्या साहित्येतर संस्थात्मक कार्याचे एक उल्लेखनीय उदाहरण होय.

     मराठी साहित्यपरंपरेला नवसंजीवनी व समृद्धी देणारे लेखक म्हणून गाडगीळांची कामगिरी ऐतिहासिक महत्त्वाची आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (५६ वे अधिवेशन, रायपूर, मध्यप्रदेश, १९८१), ‘जनस्थान पुरस्कार’(कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक १९९७), ‘अनंत लाभसेटवार पुरस्कार’ (२००३) असे महत्त्वाचे सन्मान प्राप्त झाले. अखेरपर्यंत लिहिते राहिलेले गाडगीळ मराठी साहित्य विश्वात सदैव प्रस्तुत राहिले. 

- सुधा जोशी

गाडगीळ, गंगाधर गोपाळ