Skip to main content
x

गोखले, दत्तात्रेय नरसिंह

     दत्तात्रेय नरसिंह गोखले यांचा जन्म बिरवाडी (जि.रायगड) येथे झाला. कुरुंदवाड हायस्कूलमधून १९४०मध्ये मॅट्रिक व १९५२मध्ये ‘डॉ. केतकर: व्यक्ती व वाङ्मय’ हा प्रबंध सादर करून पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांना या विद्यापीठाचे न.चिं.केळकर पारितोषिक मिळाले. पुढच्याच वर्षी ते टिळक कॉलेज ऑफ एज्यूकेशनमधून बी.टी. परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. अनुदान संहिता सुधारण्यासाठी १९६०साली नेमलेल्या समितीचे सदस्य या नात्याने गोखल्यांनी महाराष्ट्र शासनास अनेक सुधारणा सुचविल्या. पुढच्याच वर्षी फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेत गेलेल्या या कुशाग्र बुद्धीच्या गृहस्थाने हार्वर्ड व अन्य विद्यापीठांत जाऊन माध्यमिक शाळांचा सखोल अभ्यास केला आणि ‘अमेरिकेतील माध्यमिक शाळा’ नावाचे पुस्तक लिहिले. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार लाभला व राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा गौरव केला गेला (१९६९). डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या पुणे व सातारा येथील हायस्कूलमध्ये त्यांनी १४ वर्षे मुख्याध्यापकपद भूषविले व नंतर पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामध्ये आणि मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले.

     कुरुंदवाड व सांगली येथे शिक्षण घेत असताना त्यांची जडण-घडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावात झाली. सांगली येथेच त्यांनी बाबाराव सावरकर यांची जीवनकथा त्यांच्याच तोंडून कित्येक महिने ऐकली, तिची टिपणे केली, बराच प्रवास केला, सुमारे १०० सहकार्‍यांच्या व परिचितांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी झालेल्या संभाषणांतून बाबारावांच्या जीवनाचे अनेक पैलू त्यांना समजले. या परिश्रमांतून १९४७मध्ये गोखले लिखित ‘क्रांतिवीर बाबाराव सावरकर’ हा ग्रंथ हा साकारला. राष्ट्रोद्धारार्थ जीवन अर्पण करणारे नेपोलिअन, गॅरिबाल्डी, मॅझिनी अशा थोर व्यक्तींची चरित्रे गोखले यांनी वाचली होती. अभ्यास, चिंतन, भाषा, मांडणी ह्या दृष्टीने दर्जेदार अशी अनेक चरित्रे गोखले यांनी मराठीस भेट दिली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर: एक रहस्य’ याविषयी गोखले म्हणतात, “सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे मला दिसलेले स्वरूप आजवरच्या सावरकर अभ्यासकांना दिसलेल्या स्वरूपापेक्षा काहीतरी वेगळे आहे, अशी माझी भावना होती. तेव्हा चरित्रापेक्षा व्यक्तिविमर्श लिहिणे मला सोयीचे वाटले. व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण आणि संश्लेषण म्हणजे सत्यशोधनच असते.” ‘चरित्र तीन अंगांनी बनते’, असे सांगून गोखले नमूद करतात की, व्यक्तित्व मुळात अमूर्त असते. जीवनक्रम नि परिस्थिती यांचा व्यक्तित्वाशी जो संबंध आहे, तो चरित्रकाराने नेमका हेरला पाहिजे. चरित्रात व्यक्तित्वाला जे महत्त्व आहे, ते साहित्यदृष्टीने आहे. ऐतिहासिकदृष्टीने ते व्यक्तित्व वास्तव असावे, हे ओघानेच येते.

     “डॉ. गोखले यांनी उभे केलेले केतकर-चरित्र अनेक दृष्टींनी संस्मरणीय आहे... या चरित्राचा एक मोठा गुण म्हणजे डॉ. गोखले यांनी कल्पनेतून काहीही निर्माण केले नाही.” हा डॉ.प्र.न.जोशी यांचा अभिप्राय बोलका आहे.

    “ललित निर्मिती म्हणजे शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध ह्यांनी गोचर होणारी आणि वाचकांना एकदम भिडणारी, समूर्त नि सजीव कलाकृती, हा अर्थ मला अभिप्रेत आहे.” असे डॉ. गोखले म्हणत.

     डॉ.द.न.गोखले यांच्या डॉ. केतकर (१९५९) चरित्राला, डॉ. पटवर्धन उर्फ माधव जूलियन (१९७८) चरित्राला, स्वातंत्र्यवीर सावरकर: एक रहस्य (१९८९) या व्यक्तिविमर्शाला; गांधीजी: मानव नि महामानव (१९९६) ह्या व्यक्तिविमर्शाला आणि शुद्धलेखन विवेक (१९९३) या शास्त्र विवरणाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पुरस्कार, न.चिं.केळकर पुरस्कार इत्यादी पुरस्कार लाभलेले आहेत.

     वरीलखेरीज त्यांच्या ग्रंथलेखनात ‘डॉ.केतकरांच्या कादंबर्‍या’, ‘परीक्षांची सुधारणा/Reform of Examinations’, ‘एका चरित्राचे चरित्र’, ‘सुलभ शुद्धलेखन’, ‘चरित्र चिंतन’ यांचा समावेश आहे. त्यांच्या संपादित ग्रंथांमध्ये ‘गाळीव रत्ने’ चिं.वि. जोशी, ‘दुधाच्या धारा’ य.गो.जोशी; ‘कमल फुले’ साने गुरुजी, प्रा.रा.श्री.जोग गौरवग्रंथ (सहकार्याने), ‘हिंदुत्व दर्शन’- वि.दा. सावरकर, वाङ्मय विमर्श- रा.श्री.जोग - या ग्रंथांचाही समावेश आहे.

     ‘चरित्रचिंतन’ या ग्रंथाची प्रस्तावना उल्लेखनीय आहे कारण डॉ.जयंत वष्ट, स.का. धानोरकर आणि श्री.ब.ल.वष्ट या त्यांच्या मित्रांनी चरित्रविषयक अनेक प्रश्न उपस्थित करून डॉ.द.न. गोखले यांच्याशी केलेली चर्चा प्रश्नोत्तर रूपाने प्रस्तुत केली आहे. यातून गोखले यांचे व्यापक व सखोल चिंतन आणि चरित्र-आत्मचरित्राच्या समीक्षेचे मापदंड उपलब्ध होऊ शकले आहेत, जे अभ्यासकांसाठी उपयोगी सिद्ध होतील.

- वि. ग. जोशी

गोखले, दत्तात्रेय नरसिंह