Skip to main content
x

गर्गे, मदन गजानन

नाशिक येथील सुप्रसिद्ध शिल्पकार मदन गजानन गर्गे यांनी निर्माण केलेली भव्य आकाराची स्मारकशिल्पे या उच्च दर्जाच्या कलाकृती आहेत.

त्यांचे वडील गजानन नारायण गर्गे हे फोटोग्रफी, टॅक्सीडर्मी, शिकार, गणपतीच्या मूर्ती व सजावट अशी विविध प्रकारची कामे करीत. त्यामुळे सर्व लोक त्यां ना ‘आर्टिस्ट’ म्हणून संबोधत. गजानन गर्गे यांना शिल्पकलेचा नाद नानासाहेब करमरकरांमुळे लागला. नाशिकमध्ये ते फोटोग्रफीसाठी प्रसिद्ध होते. त्याचबरोबर दादासाहेब फाळके यांच्याकडे ते नेपथ्याचे कामही करीत. भद्रकाली येथील घरात सावरकरांच्या सहभोजनाच्या कार्यक्रमातही ते भाग घेत.

मदन गर्गे आठ वर्षांचे असताना, २३ डिसेंबर १९५४ रोजी गजानन गर्गे यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर मदन यांच्या आई विनोदिनी गर्गे यांनी घर सांभाळले. याच काळात मदन गर्गे यांना त्यांच्या मावशीने सांभाळ करण्यासाठी मुंबईला शीव (सायन) येथे नेले. मुंबईत लहानगा मदन घरकामात मदत करी व सकाळी पेपर टाकत असे. त्याचे शीव येथील डी. एस. हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण झाले. धारावी झोपडपट्टी आणि सिद्धी जैन उच्चभ्रू वस्ती यांची सीमारेषा म्हणजे ही शाळा. त्यामुळे त्यांना लहानपणीच विविध प्रकारच्या मिश्र संस्कृती अनुभवायला मिळाल्या.

बालपणापासून त्यांना मातीकामाची अतिशय आवड होती. प्रसिद्ध शिल्पकार करमरकरांकडे शिल्पकला शिकण्याची त्यांची खूप इच्छा होती. त्यांनी थोडे दिवस करमरकरांच्या स्टूडिओमध्ये कामही केले. करमरकरांनीच त्यांना जे.जेमध्ये शिक्षण घेण्यास सांगितले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना शिल्पकार नारायण सोनावडेकर हे गुरू म्हणून लाभले.

‘‘सोनावडेकर सरांकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्याकडे ‘कॉम्पोझिशन’ची उत्तम जाण होती,’’ असे ते कृतज्ञतेने बोलत. याचा त्यांना पुढील काळात समूह स्मारकशिल्पे साकारताना उपयोग झाला. १९६८ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेची जी.डी. आर्ट पदवी प्रथम क्रमांकाने प्राप्त करून मदन गर्गे यांनी सुवर्णपदक मिळविले. 

जे.जे.तील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मदन गर्गे यांनी चार-सहा महिने पुण्यात गार्डन डिझाइन, फाउण्टन डिझाइनची काही कामे केली. नंतर त्यांनी नाशिकला शिल्पकलेचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक प्रकारची शिल्पकलेची कामे करावी लागली. या काळात नाशिकमध्ये गणेशोत्सवासाठी गणेशाच्या छोट्या मूर्तींबरोबर ते मखराची कामे करीत व उत्सवांसाठी सामाजिक आशयाचे मोठमोठे देखावे ते कमी खर्चात तयार करून देत. त्यासाठी बांबू किंवा लाकडाच्या पातळ पट्ट्या वापरून वजनाने हलके, पण भव्य देखावे तयार करीत. यात त्यांचा ‘अ‍ॅनॉटॉमी’चा आणि प्रमाणबद्धतेचा आपोआपच अभ्यास झाला. या सर्व गोष्टींचा त्यांना पुढील काळात भव्य शिल्पांकरिता उपयोग झाला.

याच काळात त्यांच्या स्टूडिओत अरुणा वासुदेव चितळे  ही चित्रकलेचे शिक्षण घेत असलेली तरुणी काम करण्यासाठी येत असे, १९७४ मध्ये तिने चित्रकलेची पदविका प्राप्त केली व त्याच वर्षी मदन गर्गेंशी तिचा विवाह झाला. तेव्हापासून त्यांनीही गर्गेंबरोबर शिल्पकामाला सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात त्यांनी गणेशोत्सवातील गणपतीची, सामाजिक देखाव्याची, सजावटीची व्यावसायिक कामे केली. ‘ड्रॉइंग’ची उत्तम जाण असलेल्या अरुणा, पतीच्या मार्गदर्शनाखाली एक निष्णात शिल्पकार बनल्या आणि गर्गे यांना खर्‍या अर्थाने प्रत्यक्ष कामात मोलाची साथ लाभली.

भव्य स्मारकशिल्पाचे प्रारंभिक स्वरूपाचे मातीकाम करणेदेखील अवघड गोष्ट असते; कारण त्यासाठी शारीरिक श्रमाची तयारी असावी लागते. मातीतील मोठ्या आकारातील ड्रॉइंग, प्रमाणबद्धता, अचूकपणा, पोशाखाच्या चुण्या, चेहर्‍यावरील भाव या सर्व महत्त्वाच्या गोष्टी कलात्मक मूल्यांसह मातीत सहजपणे व्यक्त करणे हे अरुणा यांचे खास वैशिष्ट्य. भव्य स्मारकशिल्प साकारण्याच्या बाबतीत स्त्री-कलावंताचा, प्रत्यक्ष माती लावण्यापासून पूर्णत्वापर्यंत मोलाचा सहभाग असणार्‍या अरुणा गर्गे, हे अपवादात्मक उदाहरण म्हणावे लागेल.

एकदा धातुशिल्पाच्या कामासाठी अनेक शिल्पकारांना आमंत्रित करण्यात आले होते. तेथे गर्गेसुद्धा उपस्थित होते, परंतु प्रारंभीच स्पष्ट करण्यात आले की, ज्यांच्याकडे स्वतःची ‘फाउण्ड्री’ नाही त्यांनी परत जावे. त्या वेळी गर्गे यांच्याकडे स्वतःची ‘फाउण्ड्री’ नसल्याने त्यांना तेथून निमूटपणे निघून जावे लागले. याचे त्यांना खूपच वाईट वाटले. त्या वेळी आपली स्वतःची फाउण्ड्री असायला हवी, हा विचार त्यांच्या मनात आला व ती उभारण्याचा त्यांनी ध्यास घेतला आणि १९९५ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील ‘बेलगाव ढगा’ येथे निसर्गरम्य वनराईत १५,००० चौरस फूट जागेत भव्य असा ‘गर्गे आर्ट स्टुडीओ ’ सुरू झाला.

शिल्पकलेतील परिपूर्णतेचे गर्गेंना आकर्षण होते व कलाकृतीच्या दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड नसावी असे त्यांचे मत होते. घोंगडी असो की रेशमी कापड, त्याच्या पोताचा फरकदेखील कामातून जाणवला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. यासाठी त्यांनी भारतातील पारंपरिक पद्धतीने काम करणाऱ्या कारागीर, कलावंतांकडे जाऊन त्यांच्याकडून कलात्मक व तांत्रिक अंगे आत्मसात केली. सोनावडेकर सरांच्या वडिलांकडून पाषाणशिल्प आणि काष्ठशिल्पाच्या कोरीव कामाचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले होते. जयपूरला जाऊन त्यांनी तेथील निष्णात कारागिरांकडून ‘मार्बल’च्या कोरीव कामाच्या खुबी आत्मसात केल्या आणि ब्राँझ, फायबर, काँक्रीट, दगड, लाकूड इत्यादी शिल्पकलेच्या सर्व माध्यमांवर प्रभुत्व प्राप्त केले.

मदन गर्गे यांचे नानाविध विषयांचे वाचन, चिंतन, मनन, तसेच सर्व कलांचा डोळस आस्वाद या सार्‍यांतून त्यांच्यातला कलावंत बहरला. उच्च दर्जाचे अंगभूत कलागुण, आत्मसात केलेले तंत्रकौशल्य, प्रगल्भ वैचारिक बैठक आणि संवेदनशील मन अशा संगमातून एका यशस्वी  शिल्पकाराची कारकीर्द उदयाला आली. वास्तववादी शैलीत हुबेहूबपणा साकारून व्यक्तिशिल्प तयार करणे एवढेच मर्यादित उद्दिष्ट न ठेवता गर्गेंनी त्या व्यक्तींच्या विचारांचा, जीवनप्रणालींचा, व्यापक कार्याचा वापर शिल्परचनेत करून समग्र जीवनदर्शन घडविणारी स्मारकशिल्पे घडविली. शिल्पातील घटकांची व आकारांची कलात्मक गुंफण, संयत सर्जन स्वातंत्र्याचा वापर, समर्पक भावनिर्मिती करणारी शिल्परचना यांतून गर्गे यांच्या प्रगल्भ प्रज्ञेचे व प्रतिभेचे दर्शन घडते.

भारतीय अलंकारिक शैली आणि पाश्चात्य वास्तववादी शैली यांच्या मिलाफातून गर्गे यांची स्वतःची अशी वेगळी सौंदर्यप्रधान शैली निर्माण झाली. त्यात कोणत्याही कलेचे अंधानुकरण दिसत नाही, तर त्या शैलीचे मर्म जाणून त्याची सुसंगत जोड गर्गे यांनी त्यांच्या शिल्पनिर्मितीला दिलेली दिसते. त्यांची अनेक शिल्पे देश-विदेशांत पोहोचली. गर्गे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी बनविलेले ‘भक्ती-शक्ती’ हे संत तुकाराम आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीचे २२ फूट उंच आणि ६० फूट लांब भव्य समूहशिल्प ब्राँझमध्ये केलेले आहे.

या शिल्पात एका बाजूस तुकाराम महाराज आणि दिंड्या-पताका घेऊन, टाळ-मृदंग, वीणावादन करीत, विठूच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी दिसतात. सात स्वरांचे प्रतीक म्हणून या शिल्पात सात व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्या सर्वांची एकतानता, तल्लीनता व भक्ती या शिल्पात स्पष्टपणे दिसते. भक्ती ही आध्यात्मिक शक्ती असल्याने त्या सर्वांची रचना अंतर्वक्राकार केलेली आहे. दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत जोशात निघालेले पाच मावळे आहेत. हाताची पाच बोटे आणि ती एकत्र केल्यानंतर होणारी मूठ ही शक्तीचे प्रतीक म्हणून वापरली आहे. ही बाह्यशक्ती म्हणून त्यांची रचना बाह्यवक्राकार केलेली आहे. या सगळ्या व्यक्तिरेखांमध्ये विविधता, जोरकसपणा, गती, प्रमाणबद्धता, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भावछटा या सर्वांमध्ये जाणवणारी लयबद्ध एकसूत्रता आणि कलात्मक सौंदर्यमूल्ये अप्रतिमरीत्या साकारली आहेत.

गर्गे यांनी केलेले ‘टॉवर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज’ या शिल्पात जगाला मार्गदर्शक ठरणारे गांधीजींचे व्यक्तिमत्त्व व जीवनकार्य सशक्तपणे मांडले आहे. हे शिल्प लॉस एन्जेलिस जवळील रिव्हरसाइड या शहरात विराजमान आहे. त्यात मिठाचा सत्याग्रह, घोड्यावरून लाठीमार करणारा सैनिक, सत्याचे प्रतीक व प्रकाश असलेली मेणबत्ती हातात घेतलेली मुलगी दिसते. अहिंसेचे प्रतीक ऋषिमुनी असून सत्य, अहिंसा, स्वावलंबन या प्रतीकांमधून गांधीजींची ही उत्तुंग प्रतिमा कलात्मकरीत्या साकारते. ब्राँझमधील हे शिल्प ११×६ फूट आकाराचे आहे. वारणानगर येथील सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचे ब्राँझमधील भव्य शिल्पही (११ फूट उंच) त्यांच्या कलाकारीचा उत्कृष्ट नमुना आहे.

या शिल्पाच्या चहूबाजूंनी अनेक व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत. दुष्काळामुळे पायावर पाय ठेवून बसलेला असहाय शेतकरी, त्यातून मार्ग काढून स्वतःचा विकास साधणारा व ताठ मानेने खांद्यावर नांगर घेऊन निघालेला दुसरा शेतकरी, दुधाची बरणी घेऊन निघालेली स्त्री, वाचनात मग्न असलेली मुलगी, अशा अनेक प्रतिमा आहेत. त्यातून शेती, दुग्धविकास, पाणलोटक्षेत्र, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत सहकार चळवळीद्वारे तात्यासाहेबांनी केलेले मोलाचे कार्य व्यक्त होते. या शिल्पातील प्रत्येक व्यक्तिरेखा हे एक स्वतंत्र शिल्प होऊ शकेल; परंतु त्यांच्या एकत्रित आविष्कारातून या समूह-शिल्पाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो.

गर्गे यांनी शिवाजी महाराजांची अनेक शिल्पे घडविली. त्यांनी घडविलेले मोठ्या आकारातील शिवाजी महाराजांचे प्रत्येक शिल्प हे वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक आहे. लॉस एन्जेलिसच्या गांधीजींच्या स्मारकशिल्पामुळे मदन गर्गे हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले. या कामाची माहिती त्यांना इंटरनेटद्वारे मिळाली. यासाठी जगभरातून ५००० शिल्पकारांनी प्रतिसाद दिला होता. त्यांतून पन्नास शिल्पकार निवडले गेले आणि या शिल्पकारांनी स्केचेस पाठवली; त्यांपैकी दहा जणांची स्केचेस निवडली गेली आणि दहा जणांना गांधीजींचे थ्रीडी मॉडेल करावयास दिले. या दहांमधून तीन आणि त्यांतून एक मॉडेल निवडले गेले ते मदन गर्गे यांचे होते.

गर्गे यांच्या सगळ्याच शिल्पांमध्ये वास्तवता, जोरकसपणा, सहजता, गती, लावण्य, सौंदर्य आणि कलात्मकता या सर्वांचा सुंदर मिलाफ झालेला दिसतो. त्यांना रशियन व कोरियन शिल्पातील भव्यतेचे आकर्षण होते आणि त्यांच्या शिल्परचनेत त्यांच्या खुणा जाणवतात. अशी शिल्पे अधिक अर्थवाही होण्यासाठी त्यांतील बारीकसारीक तपशील शिल्पात न साकारता ते काही भाग सोडून देत व प्रेक्षकांच्या कल्पना-शक्तीवर सोपवीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पात हे वैशिष्ट्य प्रामुख्याने जाणवते.

मदन गर्गे यांना त्यांच्या शिल्पकलेच्या क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीबद्दल १९९८ मध्ये नाशिक रोटरी क्लबतर्फे ‘नाशिक भूषण’ म्हणून गौरविण्यात आले, तर २००३ मध्ये ‘नाशिक गौरव’ पुरस्काराने त्यांचा बहुमान करण्यात आला. त्यांच्या शिल्पकलेतील योगदानाबद्दल रवी परांजपे फाउण्डेशनतर्फे २००६ मध्ये प्रतिष्ठेचा आणि मानाचा कै. कृ.रा. परांजपे ‘गुणिजन कला पुरस्कार’ त्यांना देण्यात आला.

काही घरगुती कार्यक्रमानिमित्त परिवारासह गर्गे पुण्यास गेले होते. कार्यक्रम आटोपून अरुणा, पुतण्या मंदार व मदन गर्गे पुण्याहून नाशिककडे येत असताना १२ एप्रिल २००९ रोजी संगमनेरजवळ त्यांच्या गाडीस भीषण अपघात झाला. त्यात मदन गर्गे जागीच मरण पावले; तर अरुणा गंभीर जखमी झाल्या. या दुःखद घटनेतून सावरून त्यांनी मात्र  शिल्पकलेची साधना सुरू केली. त्यांचा मुलगा श्रेयस, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचे शिक्षण घेऊन आई अरुणा, कास्टिंगचे काम बघणारा चुलत भाऊ मंदार गर्गे यांच्यासोबत सध्या ‘गर्गे स्टुडीओ’त कार्यरत आहे.

- दत्तात्रेय पाडेकर

गर्गे, मदन गजानन