ग्रँट डफ, जेम्स कनिंगहॅम
मराठी राज्याचा शेवट ज्याने पाहिला व तो घडवून आणण्यात भाग घेतला आणि नंतर मराठ्यांच्या राजधानीत, साताऱ्यात ज्याने पहिला पोलिटिकल एजंट बनण्याचा बहुमान मिळविला, तेच ग्रँट डफ मराठेशाहीचा आद्य इतिहासकार होय. मराठी राज्याच्या उगमापासून पेशवाईच्या अंतापर्यंत त्यांनी सलग कालक्रमानुसार समग्र एकटाकी इतिहास लिहिण्याचे काम केले. मराठ्यांचा पहिला संगतवार सुसूत्र इतिहास म्हणून ग्रँट डफ यांच्या लेखनाचे महत्त्व आहे. मराठ्यांच्या राजकारणातील इंग्रजांची बाजू समजावून घ्यावयाला तो ग्रंथ उपयुक्त ठरतो.
कॅप्टन जेम्स कनिंगहेम ग्रँट डफ यांचा जन्म स्कॉटलंडमधील बॉन्फ या गावी ग्रँट कुटुंबात झाला. त्यांची आई मार्गारिट मिल्न ही ईडनच्या डफ घराण्यात होती. तिच्या भावाच्या मृत्यूनंतर डफ कुटुंबाची मालमत्ता मार्गारिटला मिळाल्यामुळे जेम्स ग्रँटला मातुलगृहाचे ‘डफ’ हे उपनाम कायमचे चिकटले. वयाच्या सोळाव्या वर्षीच शिक्षणाला रामराम ठोकून ते इ.स. १८०५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात दाखल झाले. मुंबईत लष्करात प्राथमिक प्रशिक्षण घेतल्यानंतर तत्काळ त्यांना कमिशन मिळून २३ एप्रिल १८०७ रोजी ते अधिकारी बनले. सुरुवातीच्या लष्करी मोहिमांनंतर ते १८१० मध्ये पुण्यातील इंग्रजांच्या रेसिडेन्सीत एल्फिन्स्टनचा मदतनीस म्हणून रुजू झाले. लष्करामध्ये असतानाच त्यांनी फार्सी भाषा शिकून घेतली होती. १८१७ मध्ये खडकीच्या लढाईत जेम्स ग्रँटने जो पराक्रम केला, त्या योगे इंग्रजांना त्या लढाईत मराठ्यांविरुद्ध जय मिळाला. त्यानंतर लवकरच मराठी राज्याची इतिश्री झाली. सातारचे स्वतंत्र राज्य ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेऊन त्याची व्यवस्था पाहण्यासाठी एल्फिन्स्टनने जेम्स ग्रँट डफ यांची निवड केली.
इ.स. १८१८ ते १८२२ असे चार वर्षे डफ साताऱ्यात राहिले. पेशवाईच्या अखेरच्या काळात निर्माण झालेली दुरावस्था नष्ट करून संस्थानाची घडी त्यांनी नीट बसवली. छ. प्रतापसिंह यांना शिक्षण देऊन सुशिक्षित व सुसंस्कृत केले. ग्रँट डफ यांनी राजावरील आपल्या अधिकाराचा वापर करून छत्रपतींच्या दप्तरखान्यातील कागदपत्रांचा अभ्यास केला. कैफियती, बखरी, करीने, कुळकटे व महजरे गोळा करून इतिहासाचा आराखडा बनविला. मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचा आपला मनोदय एल्फिन्स्टनला सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या या कल्पनेचे स्वागत केले. त्यासाठी त्यांनी ग्रँटला काही मौलिक सूचना व मार्गदर्शनही केले. सन १८२२ मध्ये सातारा सोडताना त्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाचा कच्चा आराखडा तयार झाला होता. इंग्लंडमध्ये परत गेल्यावर सन १८२३ ते १८२६ अशी तीन वर्षे त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावर अखेरचा हात फिरविला व अंतिम मुद्रण प्रत तयार केली. सन १८२६ मध्ये लाँगमन अॅण्ड कंपनीने त्यांचे तीनही खंड प्रसिद्ध केले. इतिहास समीक्षकांनी आपल्या ह्या इतिहास लेखनावर टीका करू नये याची खबरदारी व काळजी त्यांनी घेतलेली होती.
ग्रंथ प्रसिद्धीनंतर दीर्घ काळापर्यंत या ग्रंथाची दखल घेतली गेली नाही. सुमारे ४२ वर्षांनी पुण्यातील डेक्कन महाविद्यालयामधील एक विद्यार्थी, नीलकंठ जनार्दन कीर्तने याने या इतिहासावर सर्वप्रथम टीका केली. कीर्तन्यांचा मुख्य मुद्दा असा होता, की तत्कालीन ब्रिटिश प्रशासनातील त्याच्या पदामुळे त्याला जी साधन-सामग्री मिळाली होती, त्याचा त्याला पुरेपूर आणि योग्य उपयोग करून घेता आला नाही. त्यामुळे ग्रँटचा इतिहास म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाचे निरस निवेदन असेच म्हणावे लागेल.
इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी आपल्या लेखातून ग्रँट यांच्या इतिहासातील अनेक उणिवा आणि चुका दाखवून दिल्या आहेत. ग्रँट डफ यांनी आपला इतिहास मुख्यत्वे मराठी बखरी, मुसलमानी तवारिका, सरदारांनी दिलेल्या कैफियती व अशाच स्वरूपाची इतर टिपणे ह्यांची संगती जुळवून तयार केला आहे. ह्या बहुतेक बखरी, तवारिका व कैफियती कमी-जास्त प्रमाणाने अविश्वसनीय आहेत व त्यांच्या आधारावर रचलेला मराठ्यांचा इतिहास अपूर्ण व अविश्वसनीय होण्याची बहुतेक खात्री आहे. पुणे व सातारा येथील दप्तरे व इतर कागदपत्रे ग्रँट डफ यांना मिळूनही त्याचा उपयोग त्यांना करता आला नाही. योग्य शिक्षणाच्या अभावामुळे कोणताच इतिहास लिहिण्याची व विशेषत: मराठ्यांचा इतिहास लिहिण्याची ग्रँट डफ यांची योग्यता नव्हती. विदेशीय लोकांना मराठ्यांच्या हालचालींचे सामान्य ठोकळ ज्ञान झाले म्हणजे आपले काम झाले, अशी ग्रँट डफ यांची समजूत होती.
राजवाडे व इतर इतिहास अभ्यासकांनी ग्रँटच्या इतिहासावर केलेली टीका जरी ग्रह्य मानली, तरी त्या इतिहासाचे मूल्यमापन करताना त्या वेळची परिस्थिती, साधनांची कमतरता व या कामासाठीचा निवांतपणाही लक्षात घ्यावा लागतो. वरील सर्व लोकांनी ग्रँटचा इतिहास प्रसिद्ध झाल्यानंतर ५० ते ७० वर्षांनी त्याची समीक्षा केली आहे. त्या काळात मराठा संशोधकांच्या प्रयत्नांमुळे मराठा इतिहासाची अनेक साधने उपलब्ध झाली होती. थोडक्यात असे म्हणता येईल, की ग्रँट डफ यांच्या मराठ्यांच्या इतिहासात काही उणिवा असल्या तरी मराठ्यांच्या संपूर्ण इतिहास लेखनाच्या प्रक्रियेतील तो एक पहिला टप्पा आहे. म्हणून इतिहासकारांना व संशोधकांना त्यांच्या कार्याचा विचार करावा लागेल. ते ईडन (स्कॉटलंड) येथे मरण पावले.