Skip to main content
x

गुणे, पांडुरंग दामोदर

        पायाभरणी करून शून्यातून विश्व उभे केलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे ते संस्थापक आणि पहिले मानद सचिव होते. पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म नगर जिल्ह्यात राहुरीस झाला. त्यांच्या पत्नी इंदिराबाई (माहेरचे नाव चंपा) श्रीधर वामन कीर्तने यांच्या कन्या होत्या. यांची कन्या मधुमालती गुणे (वाडिया कॉलेजचे प्राचार्य एन.जी. सुरू यांच्या पत्नी) स्वत:च्या हिमतीवर बी.जे. मेडिकल महाविद्यालयामधून डॉक्टर झाल्या आणि पुढे डब्लिनचा रोटंडाडिप्लोमा मिळवला. १९३४च्या सुमारास डेक्कम जिमखाना, पुणे येथे इंदिरा प्रसूतिगृहकाढून व्यवसायात उत्तम यश मिळवले. दुसरी कन्या कुमुदिनी अकालीच (वयाच्या सोळाव्या वर्षीच) वारली.

पांडुरंगपंतांना तात्यासाहेब गुणे या नावाने संबोधले जात असे. दामूकाकांचे ते शेवटचे पुत्र असल्याने फारच लाडके होते. प्राथमिक शिक्षणानंतर तात्यांनी नगर एज्युकेशन सोसायटीत पुढील शिक्षण घेतले. मुंबई विश्वविद्यालयातून ते १९००मध्ये मॅट्रिक झाले. संस्कृतच्या आवडीमुळे त्यांना दुसरी जगन्नाथ शंकरशेठशिष्यवृत्ती मिळाली. पुढे मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामधून पहिल्या वर्गातून बी.. उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी संस्कृतची अनेक पारितोषिके मिळवली. एम.. करताना त्यांना दक्षिणा फेलोशिप मिळाली. १९०६मध्ये ते एम.. उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी सर भांडारकर परीक्षक होते. त्यांनी या विद्यार्थ्याचा खूप गौरव केला.

पौर्वात्य ज्ञानाच्या संशोधनाचा जगभर प्रसार व्हावा म्हणून त्यांनी डी.. सोसायटीत प्रवेश केला. अनेक सरकारी नोकऱ्या सोडून फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते शिकवू लागले. सन १९०८ पासून ते केवळ महाविद्यालयाचे काम पाहू लागले. याच साली ते संस्थेचे आजीव सदस्य बनले. विनोदी मोकळा स्वभाव,आकर्षक पद्धतीने शिकवणे यामुळे ते विद्यार्थिप्रिय बनले.

भारती विद्या आणि प्राच्यविद्यांच्या प्रसाराची इच्छा प्रबळ असल्याने १९१० साली त्यांना हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आणि जर्मन भाषा शिकून त्यांनी जर्मनीच्या लिपझिग येथे प्रा. बुगमान यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षे केवळ भाषाशास्त्राचा अभ्यास केला. त्यासाठी ते लॅटिन आणि ग्रीक भाषाही शिकले. दुर्दैवाने १९१२ च्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना क्षयाची (टी.बी.ची) बाधा झाली. तीन महिने अभ्यास सोडून वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. तिसर्या वर्षाच्या शेवटी भाषाशास्त्रावरचा प्रबंध पूर्ण करून त्यांनी तो विद्यापीठाला सादर केला व त्यांना डॉक्टरेटमिळाली. जर्मनीस जाण्यापूर्वी ते काही दिवस लंडनला गेले होते. त्यामुळे अनेक ब्रिटिश आणि जर्मन संशोधकांची मैत्री त्यांनी संपादन केली. ती त्यांना भांडारकर संस्थेच्या उभारणीत उपयोगी पडली आणि त्याचे मुख्य कारण त्याचे आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि संभाषण पद्धती होय.

१९१४ मध्ये हिंदुस्थानास परत आले. इकडे आल्यावर त्यांनी माझा युरोपचा प्रवास’ (१९१५) जर्मनीतील लोकशिक्षण’ (१९१६) ही दोन पुस्तके लिहिली. जर्मनीत असताना त्यांनी तेथे भाषाशास्त्रया आपल्या आवडत्या विषयाचे संशोधनपूर्वक अध्ययन केले. भाषाशास्त्रावर त्यांनी लिहिलेले ‘An Introduction to Comparative Phylology’  हे इंग्रजी पुस्तक व त्या विषयावरील त्यांचे अनेक इंग्रजी-मराठी निबंध यांचा त्या विषयावरील अधिकार दाखवण्यास पुरेसे आहेत. प्राकृत भाषांचा त्यांचा व्यासंगही वाखाणण्यासारखा होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे या संस्थेच्या संस्थापकांपैकी ते एक प्रमुख होते (१९१६). मुंबई विद्यापीठात विल्सन फॉयलॉजिकल लेक्चर्स देण्याचा मानही यांना मिळाला होता.

पांडुरंग गुणे यांनी मराठी कवितेच्या पूर्वीच्या व हल्लीच्या स्थितीविषयी तुलनात्मक प्रासंगिक विचार (महाराष्ट्र साहित्य पत्रिका), भाषाशास्त्र व निरुक्ती (विविध ज्ञानविस्तार), मराठी भाषेचा कालनिर्णय  (भा..सं.मं. षष्ठ इतिवृत्त), अपभ्रंश भाषेतील वाङ्मय (भा..सं.मं. सप्तमवृत्त) व अनेक ग्रंथांची परीक्षणे लिहिली आहेत.

१९१३ ते १९२० हा त्यांच्या कर्तबगारीचा मुख्य काल. १९१६ साली त्यांनी पुढाकार घेऊन आनंदाश्रम येथे पुण्याच्या संस्कृत विद्वानांची बैठक बोलावली. त्यांना डॉ. श्री.कृ. बेलवलकर यांचे साहाय्य लाभले. ६ जुलै १९१७ रोजी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन झाली. सुरुवातीपासूनच तात्यासाहेब संस्थेचे महासचिव बनले. १९१७ मध्येच अ.भा. प्राच्यविद्येचे पहिले अधिवेशन पुण्यात संस्थेच्या समोरच भरले होते. सर भांडारकर पहिले अध्यक्ष आणि डॉ. गुणे पहिले सचिव होते. या परिषदेच्या निमित्ताने अनेक विद्वान त्यांना भेटले. त्यांनी संस्था उभारणीसाठी साहाय्य देऊ केले. तात्यांनी उभी केलेली प्राच्यविद्या परिषद एक वर्षाआड भारताच्या विविध विद्यापीठामार्फत भरत असते. संस्थेचे सचिव असताना त्यांनी विविध संशोधन प्रकल्प सुरू केले. त्यामध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्तीचे मोठे काम संस्थेकडे आले. अनेक पुस्तक प्रकाशने, संशोधन प्रकल्प, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिकवणे या सर्व गोष्टी ते मनापासून करीत. विशेषत: वेद शिकवताना ते तल्लीन होऊन जात. तात्यांना गरीब विद्यार्थ्यांचा मनापासून कळवळा. त्यामुळे ते सदैव गरीब विद्यार्थ्यांना मदत करीत.

१९२० साली क्षयाने पुन्हा डोके वर काढले. बराच काळ ते अंथरुणावर पडून होते. शस्त्रक्रियाही करावी लागली. नंतर हवा बदलासाठी, कोरड्या स्वच्छ हवेसाठी ते पंढरपूरला चुलत बंधू डॉ. त्र्यंबकराव (अण्णा) यांच्याकडे वास्तव्याला आले. तेथे ते खूपच बरे झाले. मार्च १९२१ मध्ये ते पुण्यास परतले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामधून सांगलीला विलिंग्डन कॉलेजमध्ये त्यांची बदली झाली. सांगलीची हवा त्यांना मानवली नाही. २५ नोव्हेंबर १९२२ रोजी ते निवर्तले. मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते लेखन करीत होते. प्राकृत भाषेवर एक पुस्तक छपाईच्या अवस्थेत होते. अवघ्या ३८ वर्षांच्या जीवनात फार मोठा जीवनठसात्यांनी लोकांसमोर ठेवला. विद्वान असून गर्व नाही, मोठेपणाचे वलय नाही. सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव. त्यामुळे सर्वांना खूपच हळहळ वाटली. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या डिसेंबर १९२२च्या अंकात संपादकीय लेखात त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या अकाली जाण्याने प्राच्यविद्या क्षेत्राला मोठाच धक्का बसला.

पांडुरंग गुणे यांचे महत्त्वाचे ग्रंथ भांडारकर संस्थेच्या संग्रहात सांभाळले गेले आहेत. काहींच्या नव्या आवृत्त्याही काढल्या आहेत. काही नावे अशी - तुलनात्मक भाषाविज्ञान’ (१९७४), ‘महाभारताच्या नवीन चिकित्सक आवृत्तीचा उपयोग’, ‘पहिल्या अ.भा. प्राच्यविद्या परिषदेचे प्रोसीडिंग (१९२२), तुलनात्मक भाषा शास्त्र (१९१८), गीतेवरील लेखसंग्रह (१९५२).

एका महान पंडिताला, कार्यशील विद्वानाला अपुर्या आयुष्यामुळे अर्धवट कार्य निवृत्ती घ्यावी लागली, याचा खेद भांडारकरांच्या संशोधकांना सतत जाणवत राहील.

- वा.. मंजूळ

गुणे, पांडुरंग दामोदर