Skip to main content
x

गुप्ते, नारायण मुरलीधर

बी

     नारायण गुप्ते यांचा जन्म वऱ्हाडात  मलकापूर या गावी झाला. ‘बी’ कवींचे घराणे मूळचे कुलाबा (रायगड) येथील वाशीकर गुप्ते. या घराण्याकडे पूर्वी पेण, वाशी इत्यादी गावांचे कुळकर्णीपद होते. पुढे आर्थिक आपत्ती ओढवल्यामुळे ‘बीं’चे वडील मुरलीधर गुप्ते हे कुलाबा सोडून वर्‍हाड प्रांतात येऊन स्थायिक झाले. बुलढाणा येथे डेप्युटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये त्यांना नोकरी मिळाली. पुढे ते वकीलही झाले.

     निवृत्तीनंतर वकिलीसाठी त्यांनी आधी यवतमाळ व नंतर वणी येथे वास्तव्य केले. ‘बी’ कवींच्या आईचे नाव लक्ष्मीबाई .‘बी’ हे सर्वांत मोठे चिरंजीव, त्यामुळे आईवडिलांच्या माघारी संसाराची जबाबदारी येऊन पडल्याने ‘बीं’चे शिक्षण मॅट्रिकपर्यंतही होऊ शकले नाही. त्यांचा पहिला विवाह मार्तंडराव प्रधान यांच्या मुलीशी झाला. ती लवकरच वारल्यामुळे दुसरा विवाह गोविंद रावजी मुळे यांची कन्या सुंदरा हिच्याशी झाला. तेव्हा त्यांचे वय १६-१७ होते. त्यांची नोकरी कारकुनाची होती. नोकरीच्या निमित्ताने वाशीम, मूर्तिजापूर इत्यादी ठिकाणी बदल्या होत शेवटी अकोला येथे त्यांची नायब तहसीलदार म्हणून नेमणूक झाली; पण पुन्हा कारकून म्हणून नेमणूक होऊन, पुढे जून १९२९मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे सर्वांत धाकटे भाऊ गजाननराव हे पुढे अध्यात्माकडे वळले. ते ‘गजानन महाराज’ या नावाने प्रसिद्ध असून नाशिक येथे त्यांचे वास्तव्य होते. ‘बी’ कवींची वृत्तीही आध्यात्मिक होती. त्यांच्याबद्दल ‘ही ईज ए वेलनोन पोएट बट अननोन सेन्ट’, असे म्हटले जाते.

     सन १९०८पर्यंत त्यांनी गद्यलेखनही केले व त्याची त्यांना आवडही होती. त्यांची पहिली कविता ‘प्रणयपत्रिका’ ही १८९१ साली ‘करमणूक’मधून प्रसिद्ध झाली. पण, पुढे काव्यलेखनात बराच खंड पडून नंतर १९११ साली त्यांची ‘वेडगाणे’ ही कविता ‘मनोरंजन’मध्ये प्रसिद्ध झाली व रसिकांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले. त्यामुळे ‘वेडगाणे’ हीच त्यांची पहिली कविता समजली जाते. येथून पुढे त्यांच्या कविता ‘मनोरंजन’, ‘विविध ज्ञान विस्तार’, ‘महाराष्ट्र साहित्य’ या नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत गेल्या. पुढे ‘फुलांची ओंजळ’ या नावाने त्यांच्या कवितांचा संग्रह ‘गोविंदाग्रज मंडळा’तर्फे सन १९३४मध्ये श्री.प्र.के.अत्रे यांच्या विवेचन प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. त्या संग्रहात ‘बी’ कवींच्या एकूण ३८ कविता समाविष्ट आहेत. या संग्रहाची दुसरी आवृत्ती सन १९४७ मध्ये प्रसिद्ध झाली व त्यात एकूण ११ नवीन कवितांची भर पडली.

     ‘पिकले पान’ या शीर्षकाखाली या ११ कविता स्वतंत्र विभागात संग्रहित करण्यात आलेल्या आहेत व त्याला वा.ना.देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. म्हणजेच, संख्येने या कविता अवघ्या ४९ आहेत. रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचे सामर्थ्य यांतील बहुसंख्य कवितांमध्ये आहे. प्र.के. अत्रे यांनी “नावाने ‘बी’ असले, तरी कविता अ१ आहेत,” असे त्यांच्याबद्दल म्हटले आहे. ‘बी’ या टोपणनावासंबंधी कवी म्हणतात, “बी ह्या नावाची आवड वा निवड माझी नाही. माझ्या ‘वेडगाणे’ या कवितेवर शंकर विठ्ठल दीक्षित या मित्राने ‘इशश’ हे नाव घातले, आणि कोणत्याही नावाशी माझे वाकडे नसल्यामुळे, मी ते तसेच पुढे चालू ठेवले.” (वा.ना. देशपांडे  यांना ७/८/१९२८ रोजी पाठविलेले पत्र.)

     ‘बी’ कवी हे केशवसुत, विनायक, रेव्हरण्ड टिळक यांच्या पिढीतील होते; पण त्यांच्या काव्यलेखनाचा काळ बघता ते गोविंदाग्रज, रेंदाळकर, बालकवी, नागेश यांच्या कालखंडातील ठरतात. आध्यात्मिक दृष्टी, तत्त्वचिंतन, विचारशीलता हे सारे त्यांच्या काव्यलेखनाच्या मुळाशी आहे. इंग्रजी, मराठी व संस्कृत या तीनही भाषांमधील ग्रंथ त्यांच्या वाचनात होते. वर्ड्स्वर्थ, कीट्स, शेले, कोलरीज, ब्राउनिंग, स्कॉट, शेक्सपिअर यांचे काव्य; मराठीतील ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्तेश्वर, मोरोपंत इत्यादी कवी; आणि रामजोशी, होनाजीबाळा यांच्या लावण्या, तसेच संस्कृतमधील भवभूती इत्यादी कवी त्यांच्या वाचनात होते. त्यांचे संस्कार ‘बीं’च्या काव्यावर झालेले दिसतात.

     काव्यलेखनाच्या संदर्भात, त्यांच्याआधी काव्यलेखनास प्रारंभ केलेल्या केशवसुतादी कवींची कविता त्यांच्यासमोर होती, तरी त्या कवितेचे अनुकरण ‘बी’ कवींनी केले नाही. तसेच, त्यांच्या बरोबरीने कविता लिहिणार्‍या गोविंदाग्रज, बालकवी आदी कवींच्या काव्यलेखनाशीही ह्यांच्या कवितेचा धागा जुळलेला नाही. पुढील काळात त्यांच्या कवितेचे अनुकरण करणारेही कोणी दिसत नाही. त्या दृष्टीने ‘बी’ कवी हे एकांडे कवीच होते. अंतःप्रेरणा, स्वयंस्फूर्ती यांतून लिहिली गेलेली ही कविता फक्त त्यांच्याशीच जुळलेली राहिली. एकमार्गी आयुष्यक्रम, एकलकोंडा स्वभाव व प्रसिद्धि पराङ्मुख वृत्ती यांमुळे ते एकाकी कवी राहिले. कदाचित म्हणूनच ‘त्यांची उपेक्षा झाली’, असे म्हटले गेले असावे. याच्या जोडीलाच, त्यांच्या कवितेतील संस्कृत शब्दप्राचुर्य, सामासिक शब्दांचे आधिक्य, यांमुळे अर्थामध्ये येणारी क्लिष्टता, दुर्बोधता, विषय आणि रचना या बाबतींत जाणवणारी कठीणता अशा वैशिष्ट्यांमुळेही त्यांची कविता रसिकांपासून लांब राहिली.

     ‘बी’,च्या कवितेमधील हा उणेपणा लक्षात घेऊनही त्यांची कविता रसिकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. कारण, या कवितेने मराठी कवितेला एक वेगळा पैलू प्राप्त करून दिला. त्यांच्या ‘वेडगाणे’ या पहिल्याच कवितेने रसिकांचे त्यांच्या कवितेकडे लक्ष वेधले गेले, आणि त्यानंतर एकाहून एक अशा सरस कविता रसिकांसमोर येत राहिल्या. विशुद्ध प्रेमाचे गाणे गाणारी ‘चाफा’ कविता, पित्याचे प्रेमळ मन व्यक्त करणारी ‘माझी कन्या’, बंडाचे निशाण उभारून क्रांती करू पाहणार्‍यांचा ‘डंका’, थोरातांच्या कमळेवरील वेधक कथाकाव्य ‘कमला’ त्याच जातीचा, महाराष्ट्राच्या प्रभातकाळात गायला गेलेला ‘प्रभात-पोवाडा’, संतांच्या परंपरेत बसणारी, अध्यात्माचा रंग घेऊन येणारी ‘पिंगा’ ही कविता, अशा सुंदर कवितांमुळे ‘बी’ कवींचे नाव रसिकांच्या मनावर कोरले गेले.

     ‘चाफा’ कवितेचा वेगवेगळा अन्वयार्थ लावण्यात समीक्षक आजही गुंतलेले दिसतात. संख्येने मोजकी; पण बहुगुणी, बहुमोल अशी ‘बीं’ची कविता मराठी कवितेच्या प्रांतात गौरवाने उल्लेखिली जाते.

     ‘आधुनिक कवींतील भीष्माचार्य’, असा गौरव श्री.कृ.कोल्हटकरांनी केलेल्या कवीचे निधन छिंदवाडा येथे वयाच्या शाहत्तराव्या वर्षी झाले.

- डॉ. नंदा आपटे

गुप्ते, नारायण मुरलीधर