Skip to main content
x

हेगडे, लीलाधर दामोदर

     हाडाचे शाहीर असलेले लीलाधर हेगडे बालसाहित्यकार, कथाकार, कादंबरीकार, ललित गद्यलेखक म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म ठाण्याचा व बालपणही तिथेच गेले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. १९४२ सालच्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. १९४५ साली राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरात ते वसंत बापट यांच्या सहवासात आले आणि कायमचे शाहीर झाले. राष्ट्रसेवा दलाचे ठाणे जिल्हा संघटक म्हणून त्यांनी काम केले. १९४६ ते २००६, अशी साठ वर्षे त्यांनी शाहिरीतून समाजाचे प्रबोधन केले. महाराष्ट्र कला पथकामधून पु.ल. देशपांडे, वसंत बापट, शंकर पाटील यांच्या राष्ट्रीय तमाशांचे, तसेच व्यंकटेश माडगूळकरांच्या लोकनाट्यांचे त्यांनी असंख्य प्रयोग केले. ‘द्विभाषिकाचा फार्स’, ‘भारत दर्शन’, ‘आजादी की जंग’, ‘स्वतंत्र संग्रामदर्शन’ आदी कार्यक्रमांचे शेकडो प्रयोग त्यांनी महाराष्ट्रात व देशभरात केले आणि त्यांतून जनजागृतीचे काम केले.

     १९८१ साली राष्ट्रसेवादलातून मुक्त होऊन त्यांनी सांताक्रूझ (पश्चिम) च्या साने गुरुजी आरोग्यमंदिराची जबाबदारी घेतली. ही बहुउद्देशीय शिक्षण संस्था तयार करून इथे शिक्षणाबरोबर कला, क्रीडा, व्यवसाय, आरोग्यसेवा हे सर्व एका छताखाली आणले. तसेच, आंतरभारती कला केंद्राची सुरुवात करून त्यांनी इथे ओडिसी या नृत्यशैलीचे शिक्षण सुरू केले.

     त्यांनी नवसाक्षरांसाठी, मुलांसाठी व प्रौढांसाठी तिसाच्यावर पुस्तके लिहिली आहेत. ‘गुंतागुंत’ (१९६७), ‘फेडाफेडी’ (१९७१), ‘पुन्हा प्रपंच’ (१९७८) यांमध्ये ललित स्वरूपाचे गद्यलेखन आहे. ‘तरीही हात शिवशिवतच राहिले’ (१९६५) ही कादंबरी भारत-चीन युद्धावर आधारित आहे. ‘एका जवान नावाच्या माणसाची कहाणी’ (१९८६) या कादंबरिकेत बांगला देश युद्धातील एका जवानाला आलेल्या अनुभवाची नोंद आहे. ‘बैलांचा गोंधळ’ (१९८५) मध्ये विनोदी कथा आहेत. त्यांनी ‘पाचूचे बेट’, ‘मनी हरवली मनी सापडली’, ‘हणम् वेरूळचे वैभव’, ‘सशाची फजिती’ अशी अनेक बालसाहित्याची पुस्तके आणि ‘जादूची पेटी’, ‘हिरवी क्रांती’, ‘दूधगंगा’, ‘रामू मास्तर’ अशी नवसाक्षरांसाठी सोप्या भाषेत पुस्तके लिहिली.

     हेगडे यांची लेखनशैली मनमोकळेपणाची आहे; पण फाजील सलगी करणारी नाही. आवश्यक तेथे ती दैनंदिन गप्पाटप्पांसाठी सहजता धारण करते, तर कधी समर्थपणे एखादे चित्र रंगवताना ती प्रौढ, गंभीर होते. त्यांच्या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे आणि तेवढेच पुरस्कार मध्यवर्ती शासनाकडून मिळाले. त्यांच्या शाहिरी कलेचा सन्मान राज्य शासनाच्या सांस्कृतिक खात्याने ‘शाहिरी लोककला पुरस्कार’ (१९९५) आणि महाराष्ट्र फाउण्डेशनने ‘विशेष गौरव पुरस्कार’ (२००५) देऊन केला .

     - अशोक बेंडखळे

संदर्भ
१. ‘मंथन २००५’; महाराष्ट्र फाउण्डेशन समाजकार्य गौरव पुरस्कार समिती.

२. शाहीर हेगडे, लीलाधर; ‘मी साहित्यिक’; साने गुरुजी आरोग्यमंदिर प्रकाशन, २००६.
हेगडे, लीलाधर दामोदर