Skip to main content
x

हळदणकर, सुरेश विनायक

हाराष्ट्रातील रसिकांना ‘महाराष्ट्र गंधर्व’ म्हणून परिचित असणाऱ्या सुरेश विनायक हळदणकरांचा जन्म पणजी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव शांताबाई होते. त्यांचे शालेय शिक्षण गोव्याला पोर्तुगीज भाषेतून झाले. गोमंतकाच्या अस्सल भजनी परंपरेत लहानपणापासून त्यांची सांगीतिक जडणघडण झाली.

सुरेश हळदणकर यांचे खरे नाव अमृत हळदणकर होते. बाळासाहेब खाजगीवाल्यांनी त्यांचे नामकरण ‘सुरेश’ असे केले. बाळासाहेब खाजगीवाले आपल्या महेश संगीत नाटक मंडळीला गंधर्व कंपनीचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून मधुर आवाजाची मुले शोधत होते. गोव्यात त्यांना अमृत हळदणकर हा सुरेल, धारदार आवाजाचा मुलगा भेटला. तेव्हा हळदणकरांचे वय अवघे सतरा होते. त्यानंतर हळदणकर खाजगीवाल्यांच्या कंपनीतून संगीत नाटकांत काम करू लागले. या कंपनीत भास्करबुवा बखले यांचे शिष्य बापूराव केतकर आणि प्रख्यात हार्मोनिअमवादक पं. गोविंदराव टेंबे यांनी सुरेश हळदणकरांचा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का करून घेतला. टेंब्यांनी भाऊराव कोल्हटकर यांचा ढंग हळदणकरांच्या गाण्यात उतरवला. ही तालीम १९५५ पर्यंत चालू होती.

खाजगीवाल्यांची कंपनी बंद झाल्यावर मुंबईत मा.मनहर बर्वे यांच्याकडे त्यांची तालीम सुरू झाली. पं.राम मराठे हे त्यांचे सहाध्यायी होते. गिरगावात ब्राह्मण सभेत त्यांची पहिली जाहीर मैफल जी.एन. जोश्यांनी घडवून आणली. सुरेश हळदणकरांचे मुंबईत सर्वत्र नाव झाले. गिरगावच्या गणेशोत्सवातही त्यांचे कार्यक्रम होऊ लागले. श्रोते रस्त्यावर उभे राहूनही त्यांचे गाणे ऐकू लागल्यामुळे रात्री ट्राम बंद करणे भाग होत असे, असे म्हटले जाते. पुढे जगन्नाथबुवा पुरोहित व गणपतराव देवासकर यांची त्यांनी तालीम घेतली. याशिवाय मोहनराव पालेकर (जयपूर), अन्वर हुसेन खाँ (आग्र) यांचीही तालीम त्यांना मिळाली.

सुरेश हळदणकरांनी मोजक्याच संगीत नाटकांतून भूमिका केल्या. त्यांनी १९४७-४८ मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी गंधर्व कंपनीच्या ‘सौभद्र’ या नाटकात नारदाची भूमिका केली. ‘राधाधर मधुमिलिंद’, ‘पावना वामना’ ही गाणी ऐकून रसिक श्रोते खूश झाले. सुरेश हळदणकरांचा खरा भाग्योदय झाला तो १९५४ साली आलेल्या चिंतामणी यशवंत मराठे यांच्या ‘होनाजी बाळा’ या नाटकातून. या नाटकाचे संगीत हेमंत केदार यांचे होते. यातील होनाजीची भूमिका पाहूनच आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘महाराष्ट्र गंधर्व’ ही पदवी दिली. मराठी रंगभूमीवर गायक-नट म्हणून त्यांचा ठसा उमटला.

सुरेश हळदणकर यांनी ‘होनाजी बाळा’ या नाटकाबरोबरच ‘संशयकल्लोळ’, ‘सौभद्र’, ‘विद्याहरण’, ‘जग काय म्हणेल’ इत्यादी संगीत नाटकांतून भूमिका केल्या. उंच पट्टीचा आवाज, माधुर्य व गाण्याचा आकर्षक ढंग व  आवाहकता यांमुळे रंगभूमीवरील त्यांचे गाणे प्रभावी होई. ‘श्रीरंगा कमलाकांता’, ‘विमल अधर’, ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘पद्मनाभा नारायणा’, ‘मानिली आपुली’, ‘सुरसुखखनी  तू विमला’, ‘सुकांत चंद्रानना’ इत्यादी नाट्यपदांच्या ध्वनिमुद्रिकांतून त्यांच्या गायनाचा प्रत्यय आपल्याला येतो. त्यांच्या रागदारी शास्त्रीय संगीताच्या काही ध्वनिमुद्रिका निघाल्या होत्या. नाटकांमधून निवृत्त झाल्यावर त्यांनी गायन विद्यालय काढले व उर्वरित काळ संगीताचे शिक्षण देण्यात व्यतीत केला. कुमार गंधर्वांचे व त्यांचे दृढ स्नेहबंध होते. कुमार गंधर्व यांचे आजारपणातून उठल्यावर मुंबईतील जे पहिले जाहीर गाणे झाले, ते सुरेश हळदणकरांच्या विद्यालयातच. सुरेश हळदणकरांच्या प्रमुख शिष्यांत प्रभाकर कारेकर, नीलाक्षी जुवेकर यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांना मिळालेले काही पुरस्कार असे आहेत :

अ.भा.नाट्यपरिषदेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार (१९८०), महाराष्ट्र राज्य शासनातर्फे ‘बालगंधर्व’ पुरस्कार (१९९४), गोमंतक कला अकादमीतर्फे ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (१९९५), तसेच नेहरूंच्या हस्ते त्यांना ‘सुवर्णपदक’ (१९५६) देऊन गौरविण्यात आले. गोवा स्वतंत्र झाल्यावर (१९६१) पहिले राष्ट्रगीत म्हणण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांचे वयाच्या चौर्‍याहत्तराव्या वर्षी मुंबईत निधन झाले.

मधुवंती पेठे

हळदणकर, सुरेश विनायक