Skip to main content
x

इनामदार, नागनाथ संतराम

     नामदार यांचा जन्म गोमेवाडी (जि. सांगली) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव संतराम विष्णू इनामदार-गोसावी, आईचे नाव आनंदीबाई होते. वतनाचे गाव सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातल्या येरळा नदीकाठचे येरकाळवाडी हे होते.

      त्यांचा बालपणाचा बराचसा काळ ‘गोमेवाडी’ या जन्मगावाच्या सान्निध्यात गेला. शालेय जीवनातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित होऊन ते त्याचे कार्यकर्ते झाले. मॅट्रिक उत्तीर्ण होण्यापूर्वी संघाच्या ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्पचे (संघ शिक्षा वर्गाचे) तीन वर्गांचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. संघप्रचारक बाबूराव मोरे यांचा त्यांच्या वागणुकीवर उल्लेखनीय प्रभाव पडला. ‘माझ्या जडण-घडणीमध्ये संघाचा भाग महत्त्वाचा आहे, हे मला मान्य करायला हवं’ असे ते सांगत.

     इनामदारांचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या नवीन मराठी प्राथमिक शाळेत झाले, नंतर अहमदनगरच्या सोसायटी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. तेथे त्यांनी वाचनाची हौस मनमुराद भागवली. ‘दुष्काळातून उठलेल्या अधाशी माणसाप्रमाणे मी त्या वेळी किती पुस्तके वाचली असतील, ह्याची गणती ठेवलेली नाही.’ असे ते म्हणत असत. इंग्रजी पुस्तके, रहस्यकथा, चित्रकला, वास्तुकला, संगीत, कृषी, वैद्यक, अर्थशास्त्र, विज्ञान, इत्यादी विविध विषयांची पुस्तके नगर व औंध येथील ग्रंथालयांतून मिळवून त्यांनी अफाट वाचन केले.

     याच काळात त्यांच्यावर पंडित सातवळेकर, गो.नी.दांडेकर यांचाही प्रभाव पडला. बनारस हिंदू विश्वविद्यालय व अलिगढ विद्यापीठ ह्यांच्या परीक्षा देऊन ते पदवीधर झाले. त्यासाठी औंधच्या यमाई हायस्कूलमध्ये त्यांनी  शिक्षकाची नोकरीही केली.

     अर्थशास्त्राची एम.ए.पदवी घेतलेले इनामदार ‘सकाळ’, ‘केसरी’ या वृत्तपत्रांत लेखन करू लागले. “माझ्या व्यक्तिमत्त्वाला हा (साहित्य निर्मितीचा) सुडौल आकार पुण्याने दिला .” असे त्यांनी म्हटले होते. नोकरीत बढतीसाठी दिलेल्या परीक्षेविषयी ते लिहितात, “त्या वेळच्या मुंबई राज्यातून आलेल्या सर्व उमेदवारांत मी सरकारी परीक्षेत पहिल्या क्रमांकानं पास झालो होतो.”

     ‘चांदराती रंगल्या’ या आत्मकथा : दोनमध्ये ‘हे सारस्वताचे झाड’ या अगदी छोट्या प्रस्तावनेत ते लिहितात, “जीवनाच्या वाटेवर सारस्वताचं हे झाड दिसलं. त्याच्या शेजारी मी प्रथम विसावलो तो औंधात. त्यानंतर अर्ध शतकापर्यंत मी या सारस्वताच्या वनामध्ये विहार करतो आहे. ....या प्रवासातल्या कष्ट-साहसाच्या समयीच्या सोबत्यांना, मार्गदर्शकांना, सहप्रवाशांना मी आठवतो आहे.”

     ‘स्वराज्य’चे मो.स. साठे (संपादक) यांची आणि त्यांची भेट हा त्यांच्या साहित्यिक आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल. ‘झेप’ (१९६३), ‘झुंज’ (१९६६), ‘मंत्रावेगळा’ (१९६९), ‘राऊ’ (१९७२), ‘शहेनशहा’ (१९७६), ‘शिकस्त’ (१९८३) आणि ‘राजेश्री’ या एकूण सात ऐतिहासिक कादंबर्‍यांमध्ये मराठी राज्याच्या सुरुवातीच्या काळापासून ते अस्ताच्या काळापर्यंत विस्तृत कालखंड येऊन गेला. पहिल्या तीन कादंबर्‍यांत पेशवाईच्या पडत्या काळातल्या त्रिंबकजी डेंगळे, यशवंतराव होळकर, दुसरे बाजीराव पेशवे या महत्त्वाच्या व्यक्तींचा जीवनपट त्यांनी उलगडून दाखवला आहे. ‘राऊ’मध्ये बाजीराव-मस्तानीचे नाजूक प्रेम प्रकरण आहे. ‘शहेनशहा’त औरंगजेबाचे व्यक्तिदर्शन, ‘शिकस्त’ मध्ये पानिपतचे सेनापती सदाशिवरावभाऊंची दुर्दैवी पत्नी पार्वतीबाई नायिका आहे, तर ‘राजेश्री’ मध्ये शिवाजी महाराजांच्या मनःस्थितीचे वर्णन आहे.

     इनामदारांनी आत्मकथेत नमूद केले आहे, “माझ्या आयुष्याची झळाळती बाजू इतिहासाकडे वळलेली आहे. मी जातो तिथं एक ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळखला जातो. सुमारे तीन तपं इतिहासाच्या विविध अंगांत मी रमलेलो आहे... मी लेखक असल्यामुळे पात्रांचे स्वभाव सहानुभूतीनं समजून घ्यावेत, ही माझी मूळचीच प्रतिज्ञा आहे.”

     त्यांच्या वडिलांनी सर्व्हे किंवा लॅन्ड रेकॉर्ड्स या सरकारी खात्यात पूर्ण ३५ वर्षे इमानाने सेवा केली. त्याच खात्यात मोठ्या शासकीय सेवेचे उपलब्ध असलेले सर्वोच्च स्थान भूषवून ना. सं. इनामदार ३३ वर्षांनी (३० नोव्हेंबर १९८१) सेवानिवृत्त झाले. सर्व्हे खात्यातल्या या सनदी अधिकार्‍याला त्या वेळच्या मुंबई प्रांतात कच्छ, सौराष्ट्रपासून दक्षिणेत कर्नाटकापर्यंत पसरलेल्या कधी वैराण तर कधी सुपीक तर कधी दुर्गम भागांत कामाच्या निमित्ताने वैविध्याचे अनुभव गाठी बांधता आले.

     पंधरा वर्षे त्यांचा पट्टेवाला (शिपाई) म्हणून काम करणारा किसन हा इनामदारांच्या स्वभावाविषयी कर्मचार्‍यांपुढे मनोगत व्यक्त करतो, “इनामदार साहेबांच्या बरोबर माझ्यासारख्या फाटक्या माणसानं परधानासारखी सेवा बजावली. जिथं जाईन तिथं त्यांच्या खालोखाल लोकांनी मला मान दिला. ते राज्य त्यांच्याबरोबरच गेलं. त्यांनी मला भावासारखं वागवून घेतलं. आता काही खरं नाही......”

     सेवकांच्या या उत्स्फूर्त उद्गारांत इनामदारांच्यातल्या संवेदनशील, सुसंस्कृत, सुशिक्षित, सभ्य व्यक्तित्वाचे दर्शन होते. ‘झेप’नंतरच्या सहा कादंबर्‍यांचे लेखन त्यांच्या स्वतःच्या वनश्रीने नटलेल्या ‘झेप’ बंगलीत झाले. तेथेच त्यांचे इष्टमित्र, चाहते, प्रकाशक व अन्य लोक भेटायला यायचे. ‘मंत्रावेगळा’ या कादंबरीची प्रस्तावना मोठी आहे, तर ‘राजेश्री’ची प्रस्तावना ग्रंथाच्या शेवटी आहे.

     राज्यशासन पारितोषिक ‘झेप’ला (१९६४) आणि ‘झुंज’ला (१९६८) मिळाले. ‘झुंज’ला मराठी साहित्य परिषदेचा ‘हरिभाऊ आपटे कादंबरी पुरस्कार’ही मिळाला. त्यांच्या कादंबर्‍यांना वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

     १९९७ मध्ये अहमदनगर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद इनामदारांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

     इनामदारांनी लिहिलेल्या आत्मकथा तीन भागांत वेगवेगळ्या शीर्षकाअंतर्गत २६ जानेवारी १९९२ रोजी प्रकाशित झाल्या. 

- वि. ग. जोशी

 

इनामदार, नागनाथ संतराम