Skip to main content
x

आलमेलकर,अब्दुल रहमान अप्पाभाई

       भारतीय चित्रशैलीचा नावीन्य-पूर्ण उपयोग करून आदिवासी आणि ग्रमीण लोकजीवनाचे चित्रण करणारे एक महत्त्वाचे चित्रकार. अलंकरणासोबतच रचनेतील वैविध्य व आधुनिकता आणि विविध वस्तूंच्या वापरातून निर्माण होणारा पोत यांतून त्यांचे चित्र निर्माण होई. लयबद्ध अलंकरणात्मक रेषेतून त्यांची चित्रे पूर्णत्वास जात.

       अब्दुल रहमान अप्पाभाई आलमेलकर यांचा जन्म अहमदाबाद येथे झाला. अहमदाबाद येथे त्यांचे वडील कापड गिरणीत स्पिनिंग मास्टर म्हणून काम करीत असत. कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील अलमेल हे त्यांचे मूळ गाव होते. जन्माने मुस्लीम असलेल्या आलमेलकरांचे शिक्षण मराठी माध्यमातून सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेत झाले. बालपणापासूनच त्यांचा चित्रकलेकडे  ओढा होता. त्यामुळे मुंबईतील ऑपेरा हाउसजवळच्या नूतन कला मंदिरात  १९३५ ते १९४० या काळात त्यांचे कलाशिक्षण झाले. दंडवतीमठ हे मूळचे कर्नाटकातील कलावंत या संस्थेचे संस्थापक होते व कर्नाटकातून येणारे विद्यार्थी त्यांच्याकडे कलाशिक्षणासाठी येत असत. आलमेलकरही त्यांच्याकडे शिकले.

       १९४१ पासून त्यांनी अर्थार्जनासाठी मुंबईच्या एक्स्प्रेस ब्लॉक अँड एन्ग्रेव्हिंग स्टूडिओमध्ये काम करण्यास सुरुवात केली. परंतु अहमदाबादला असलेल्या वडिलांचा आग्रह अहमदाबादच्या खत्री गुरुजींकडे शिकावे असा होता. म्हणून आलमेलकर अहमदाबादला पोहोचले. पण विनंती करूनही गुरुजींनी शिकवले नाही. कारण खत्री गुरुजींचा गुरुकुल पद्धतीवर आणि स्वावलंबनावर विश्‍वास होता. आलमेलकर दोन वर्षे जाऊन बसत, साफसफाई करत. शेवटी एक दिवस त्यांनी गुरुजींचे पाय पकडले व  ‘‘गुरुजी, आपने कुछ सिखाया नहीं,’’ असे म्हणून ते रडू लागले. यावर खत्री गुरुजी त्यांना उठवत म्हणाले, ‘‘तू पागल है. दो साल हर क्षण मैं तुझे पढ़ा रहा था. ‘मैं बड़े बाप का बेटा, मुझे क्या? मैं पैसे से हर चीज खरीद सकता हूं.’ तेरी यह घमंड हटाने के लिए दो साल लगे!’’ यानंतर आलमेलकर मुंबईस परतले व १९४८ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी पेंटिंगमधील पदविका प्राप्त केली.

       याच काळात त्यांना, त्यांची स्वत:ची शैली सापडू लागली. त्यापूर्वी ते आवेगपूर्ण ब्रशच्या फटकऱ्यांचा वापर करून निसर्गचित्रे रंगवीत असत. त्यावर लँगहॅमर व बेंद्रे यांच्या निसर्गचित्रणशैलीचा प्रभाव होता. १९४८ मध्ये  ‘फुल मून’ या चित्रासाठी त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीच्या हीरक महोत्सवी प्रदर्शनात गव्हर्नर्स प्राइझ मिळाले व १९५४ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. १९५५ मध्ये आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या व १९५६ व १९६० मध्ये ललित कला अकादमीच्या दिल्ली येथील प्रदर्शनांत त्यांची कलाकृती पारितोषिकप्राप्त ठरली. ‘टेम्परा’ पद्धतीचे रंगकाम असलेली आणि अलंकारिकतेच्या अंगाने जाणारी त्यांची चित्रशैली इतरांपेक्षा वेगळी होती.

       १९५२ मध्ये आलमेलकरांचा फोर्ट भागातील स्टूडिओ आगीमुळे जळाला व त्यात त्यांची स्केचेस, चित्रे, पदके व इतर सर्व सामान जळून खाक झाले. आलमेलकरांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘सगळं जळालं तरी मन जळू देऊ नकोस,’ या गुरुजींच्या वाक्याने त्यांना धीर दिला व सहा महिन्यांत त्यांनी नवे चित्रप्रदर्शन केले. त्याचे शीर्षक होते, ‘अ‍ॅशेस टू लाइफ’.

       आलमेलकरांना भारतभरच्या प्रदर्शनांत २० सुवर्णपदके व २४ रौप्यपदके व अन्य रोख रकमेचे पुरस्कार मिळाले. नूतन कला मंदिर या संस्थेचे प्रिन्सिपल म्हणून ते अनेक वर्षे कार्यरत होते. त्यांची चित्रे व लेख ‘धर्मयुग’ (हिंदी), ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’, ‘मौज’, तसेच ‘प्रजावाणी’ (कन्नड), ‘हिंदुस्थान’, ‘जनशक्ती’, ‘संदेश’ (गुजराती) अशा अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. त्यांची एकूण ४० एकल प्रदर्शने भारतातील विविध शहरांत व सिलोन, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया अशा विविध देशांत झाली.

       आलमेलकरांचा उमेदीचा काळ म्हणजे १९४८ ते १९८२ हा होता. या काळात भारताच्या कलाविश्‍वात अनेक स्थित्यंतरे होत होती. या सर्व धामधुमीत आलमेलकर आपला मार्ग स्थिरचित्ताने आक्रमत राहिले. त्यांच्या मनात पारंपरिक कलामूल्यांचा अट्टहास नव्हता किंवा नव्या प्रयोगांबद्दल तुच्छताही नव्हती. ते म्हणत, ‘‘नव्या-जुन्यातील चांगले-वाईट मी जाणतो. ते पुरेसे आहे. सर्व मी पाहतो, करताना माझ्याच मनाचे करतो.’’

       त्यांनी आयुष्यभर  मुख्यत: ग्रमीण व आदिवासी जीवनातील स्त्री-पुरुषांची चित्रे काढली. त्यासाठी ते महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांत अभ्यास करण्यासाठी फिरत. त्यांच्यातलेच होऊन राहत. आदिवासी स्त्री-पुरुषांची डौलदार व काटक शरीरे, नानाविध रंगीबेरंगी साधनांनी व दागिन्यांनी शृंगारलेले त्यांचे देह, परिसर, वापरातल्या वस्तू व त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेले प्रसंग आलमेलकरांच्या चित्रांत वारंवार येत.

       त्यांनी तैलरंगात  चित्रे रंगवली असली तरी अपारदर्शक जलरंग हे त्यांचे चित्रनिर्मितीचे आवडते माध्यम होते. प्रयोगशीलता हा त्यांचा स्थायीभाव होता. म्हणूनच महागडा ड्रॉइंग पेपर असो वा खडबडीत पुठ्ठा, त्यावर विविध वस्तूंचा, उदा. काथ्या, दोरा, जाळी, तरट, बोटांचे ठसे इत्यादींचा ते वापर करीत. काही वेळा चित्रावर कवडी घासून रंग एकमेकांत मिसळून टाकत व शेवटी काळ्या, लयदार रेषेतून सर्व आकृतींचे आकार स्पष्ट करीत. मनुष्याकृती व त्यांचे नाक, डोळे इत्यादी काढण्याची त्यांची खास लकब होती. अशा चित्रांच्या पूर्वतयारीसाठी ते अनेक दिवस गायब होत व आदिवासी पाड्यांवर स्केचेस करीत भटकत राहत.

       आलमेलकरांचे कुटुंब मोठे होते, त्यामुळे आर्थिक ओढगस्त कायम असे. अशाच एका अडचणीच्या प्रसंगी त्यांनी पुरस्कारापोटी मिळालेली सुवर्ण व रौप्यपदके विकून पैसे उभे केले. ते आयुष्यभर  भटकत राहिले व त्यापासून स्फूर्ती घेऊन चित्रनिर्मिती करीत राहिले.

       दि. १२ डिसेंबर १९८२ रोजी पुण्यातील ‘मोबोज’ आर्ट गॅलरीच्या उद्घाटनासाठी गेले असताना तेथेच आलमेलकरांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले.

- श्रीराम खाडिलकर

आलमेलकर,अब्दुल रहमान अप्पाभाई