आपटे, वामन शिवराम
कल्याण येथे वास्तव्य केलेल्या वामनरावांनी एम.ए., बी.टी.पर्यंत शिक्षण घेऊन उल्हासनगर (जि. ठाणे) येथील तलरेजा महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन केले. किशोर व युवक ह्यांच्यासाठी प्रा.आपटे यांनी कथा व लघुनिबंधवजा अनेक संस्कारक्षम पुस्तके प्रकाशित केली. ‘मित्र कसे जोडावेत’ (१९७४) हे सांगून त्यांनी ‘सदैव जायचे पुढे’ अशी प्रेरणा देताना ‘ध्येय कसे गाठाल?’(१९७६) याचे उत्तम मार्गदर्शन केले. जे-जे चांगले मनात येते, ते-ते सर्वांना सांगणे; हे आपटे यांचे ‘ध्येय’ होते. हिंदीतील व इंग्रजीतील काही लोकप्रिय पुस्तकांचे अनुवादही त्यांनी केले. सहा ते साठ वर्षांच्या सर्व व्यक्तींना त्यांचे जीवित कार्य अधिक क्षमतेने पार पाडता यायला मदत होईल अशा विश्वासाने त्यांनी ‘स्मरणशक्ती कशी वाढवावी’ याचा व्यावहारिक मंत्र दिला. आपटे यांनी ‘चिंता का करता?’ असा प्रश्न विचारून चिंतेचे मानसशास्त्र व शास्त्रज्ञांनी तत्संबंधी केलेले विश्लेषण सांगून चिंतानिवारणाचे उपाय सुचविले. आपटे यांची ही पुस्तके वाचकांना आवडली.
अकरा वर्षांच्या अखंड मेहनतीने शेक्सपिअरच्या ३७ पैकी ३४ नाटकांचे सुरस, सुबोध व नेटके भाषांतर करून वामनरावांनी मराठी भाषेची मोठी सेवा केली. ‘शेक्सपिअर जसा आहे तसा’ सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. विविध पात्रांची भाषा ही नेहमीची व्यवहारात असलेली भाषा असून आपटे यांनी नाटकातल्या पद्याचा अनुवाद गद्यच ठेवला आहे. या ग्रंथाची अभ्यासपूर्ण प्रदीर्घ प्रस्तावनादेखील त्यांच्या कार्याचे उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे.