Skip to main content
x

बुद्रुक्कर, नरसिंग दत्तोपंत

          चिंच या पिकावरील संशोधनामुळे संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलले नरसिंग दत्तोपंत बुद्रुक्कर यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील शिर्शी बुद्रुक येथे मध्यमवर्गीय शेेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील महसूल विभागात अधिकारी होते. त्यांच्या आईचे नाव यमुनाबाई होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावीच झाले व माध्यमिक शिक्षण गंगाखेड येथेे झाले. औरंगाबाद येथील ज्ञानविज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेेतल्यावर त्यांनी परभणी येथील कृषी महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेतला आणि परीक्षेत प्रावीण्यासह प्रथम वर्ग मिळवून ते विद्यापीठात बी.एस्सी. (कृषी) पदवी परीक्षेत द्वितीय आले. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयात उद्यानविद्या विषयासाठी प्रवेश घेतला व ते विद्यापीठात प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. शिक्षण संपल्याबरोबरच ना.ग. फडणीस या त्यांच्या मार्गदर्शकाने नोकरीसाठी त्यांना पुण्याला बोलावून घेतले. त्यांना कृषि-पर्यवेक्षक म्हणून गणेशखिंड येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात नोकरी मिळाली. वर्षभरातच त्यांची पपई-पैदास योजना गणेशखिंड फळ प्रायोगिक केंद्र येथे कृषि-अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. या काळात त्यांनी पपईमध्ये एम्ब्रिओकल्चरचे (टेस्टट्यूब पद्धतीने संवर्धन) तंत्र विकसित केले. तसेच पेपर क्रोमॅटोग्राफीद्वारे फळामधील संजीवकाचे प्रमाण ठरवण्यासाठी यशस्वी प्रयोग केले. गणेशखिंड येथील चार एकरांत द्राक्षाचे भरपूर उत्पन्न काढले. त्यांच्या या लक्षणीय कामाचे कृषी विभागात कौतुक झाले.

          मराठवाडा आणि विदर्भासाठी वेगळे कृषी विद्यापीठ करण्याचे ठरल्यामुळे औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्रात त्यांची बदली करण्यात आली. या काळात त्यांनी द्राक्षे, मोसंबी आणि भाजीपाल्याच्या संशोधनाचे काम केले. वर्षभरातच त्यांची परभणी येथील उद्यानविद्या कृषी महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक या पदावर पदोन्नती झाली. त्या वेळी औरंगाबादमधील फळ संशोधन केंद्र हे ३५ एकर क्षेत्रावर कोतवालपुरा, (सध्याचे सिद्धार्थ गार्डन) येथे कार्यरत होते. मराठवाडा कृषी विद्यापीठाला विभागीय संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती; म्हणून सध्याचे फळ संशोधन केंद्र आणि एक लाख रुपये देऊन नगरपालिकेकडे असलेल्या हिमायतबागेत स्थलांतर करण्याचे ठरले. ती शंभर एकराची बाग हैदराबादच्या निझामाची होती. त्यांनी अत्यंत कुशलतेने स्थलांतराचे काम करून हिमायतबागेत फळ संशोधनाची सुरुवात केली. केंद्र सरकारकडून १९७५ मध्ये अखिल भारतीय समन्वयित भाजीपाला योजना मराठवाडा कृषी विद्यापीठाला मंजूर  झाली व त्याचे केंद्र अंबाजोगाई येथे करण्याचे ठरले. केंद्राचे प्रमुख आणि कनिष्ठ भाजीपाला-पैदासकार म्हणून बुद्रुक्कर यांची निवड झाली. त्यांनी या संधीचा लाभ घेऊन भाजीपाल्याची योजना कार्यान्वित केली. वर्षभरात त्यांना नवी दिल्ली येथील भा.कृ.अ. सं.त पीएच.डी. करण्यासाठी पाठवण्यात आले. तेथे त्यांनी टोमॅटो संकरणासंबंधी काम केले आणि मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये १९८४ मध्ये प्रबंध सादर केला. त्यानंतर त्यांची उद्यानवेत्ता संशोधन अधिकारी म्हणून परभणीला नेमणूक झाली.

          डॉ. बुद्रुक्कर यांनी अंजिराच्या दिनकर या जातीच्या निर्मितीत सहयोग दिला, तसेच भाजीपाल्यामध्ये टोमॅटोचा लाल कंधारी आणि वांग्याचा अनुराधा हे वाण प्रसारित केले. याबरोबरच त्यांनी चिंचेच्या मृदकाष्ठ कलमाद्वारे संवर्धन करण्याची पद्धती विकसित केली. तसेच त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतावरील आंबा, सीताफळ व अंजिरांच्या बागेचे सर्वेक्षण केले. संशोधनाबरोबरच कृषी मेळावे, कृषी चर्चासत्र आयोजित करून मराठवाडा विभागात उद्यानविद्या संशोधनाचा विकास यासंबंधी राज्यस्तरीय परिसंवाद घेतला. जालन्याचे प्रसिद्ध विधिज्ञ भाऊसाहेब देशपांडे यांची कन्या रजनी हिच्याशी १९७१मध्ये बुद्रुक्करांचा विवाह झाला. डॉ. बुद्रुक्कर ऑगस्ट २००० मध्ये निवृत्त झाले.

          - श्रेयस बडवे

बुद्रुक्कर, नरसिंग दत्तोपंत