Skip to main content
x

भोसरेकर, मधुकर रामराव

      कृत्रिम रेतन तंत्रज्ञानामुळेच भारतात गेल्या पस्तीस-चाळीस वर्षांत दूध उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होऊन धवलक्रांती साध्य झाली. या तंत्रज्ञानामध्ये चांगल्या जातीच्या वळूचे वीर्य दीर्घकाळ साठवणे ही महत्त्वाची तांत्रिक बाब असून त्यावर अनेक वर्षे संशोधन करून ते तंत्र अधिक परिणामकारक आणि अद्ययावत करण्यात लक्षणीय योगदान देणारे तज्ज्ञ संशोधक म्हणून डॉ. मधुकर रामराव भोसरेकर यांचे नाव जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे.

      मधुकर भोसरेकर यांचा जन्म उस्मानाबाद येथे झाला. ते शालेय शिक्षण घेऊन १९५१मध्ये मॅट्रिक झाले व १९५३मध्ये औरंगाबाद येथून इंटर सायन्स उत्तीर्ण झाले. त्यांनी १९५७मध्ये हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाची बी.व्ही.एस्सी. ही पशु-वैद्यकीयशास्त्रातील पदवी प्राप्त केली. त्याच वर्षी त्यांनी राजस्थान सरकारच्या पशु-संवर्धन खात्यामध्ये अजमेर जिल्ह्यातील पिसानगर या गावी पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरीची सुरुवात केली. त्यांनी १९६०मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी उत्तर प्रदेशातील इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, इज्जतनगर या नामांकित संस्थेत प्रवेश घेतला आणि १९६२मध्ये एम.व्ही.एस्सी. पदवी संपादन केली. त्याच वर्षी त्यांना हरियाणा राज्यातील नॅशनल डेरी रिसर्च इन्स्टिट्यूट, करनाल या दुग्धव्यवसायातील अग्रणी संस्थेमध्ये नोकरी मिळाली. तेथे त्यांनी १९६२ ते १९७४पर्यंत विविध पदांवर काम करत असतानाच डॉ. एन.जी. गांगुली या जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली ‘अतिशीतकरण पद्धतीने रेड्याचे वीर्य साठवणे’ या विषयावर संशोधन करून १९७४मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली. करनाल येथे त्यांनी गोठित वीर्य (फ्रोझन सिमेन) पद्धतीवर अतिशय महत्त्वाचे संशोधन कार्य केले. त्यामुळे संकरित पशु-पैदाशीसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली.

      डॉ. भोसरेकर नोव्हेंबर १९७४मध्ये उरळीकांचन येथील भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान (बायफ) या संस्थेमध्ये संशोधन अधिकारी म्हणून हजर झाले. त्यांनी १९७५मध्ये बायफमध्ये महाराष्ट्रातील खाजगी क्षेत्रातील पहिली अतिशीत (गोठित) वीर्य प्रयोगशाळा स्थापन केली. यामुळे बायफला संकरीकरणाचा कार्यक्रम जोमाने आणि मोठ्या प्रमाणात घेता आला. अतिशीत वीर्य प्रयोगामुळेच आज अहमदनगर, पुणे, बारामती, अकलूज परिसरात संकरित गायी मोठ्या संस्थेने दिसतात. बायफ संस्थेमध्ये कॅनेडियन सरकारची आर्थिक मदतीवरच्या एका संशोधन प्रकल्पामध्ये डॉ. भोसरेकर यांनी रेड्याच्या वीर्याचा जैव-रासायनिक अभ्यास केला. वीर्यातील शुक्रजंतू जास्त काळ टिकण्यासाठी अतिशीतकरण पद्धतीत आवश्यक सुधारणा केल्या आणि रेड्याच्या गोठित वीर्यकांड्या तयार करण्यात यश मिळवले. रेड्याच्या गोठित वीर्यकांड्या उपलब्ध झाल्याने बायफच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि इतरत्र म्हशींमधील कृत्रिम रेतनाची आकडेवारी वाढली. म्हशीचा माज ओळखणे आणि त्यानुसार कृत्रिम रेतन करणे कठीण असते. ही समस्या सोडवण्यासाठी डॉ. भोसरेकर यांनी म्हशींमध्ये ऋतुनियमनासंबंधी (नियमित माजावर येण्याची क्रिया) संशोधन प्रकल्प हाती घेतला. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन म्हशीला ठरावीक संप्रेरकाचे (हार्मोन) इंजेक्शन देऊन त्यांना विशिष्ट वेळेवर आणि ठरलेल्या दिवशी माजावर आणून कृत्रिम रेतन केले. त्यामुळे म्हशीच्या माजाची लक्षणे शेतकऱ्यांना दाखवता आली. विदेशी वळूचे वीर्य सतत वापरले, तर विदेशी जातीच्या रक्ताचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे संकरित गायी रोगास बळी पडतात व उष्णतेने त्रस्त होतात. त्यासाठी प्रत्येक पिढीत शुद्ध १०० टक्के विदेशी वळू न वापरता संकरित वळू वापरला तर विदेशी रक्तगुण मर्यादित ठेवता येतात. त्या वेळी संकरित वळूचे वीर्य गोठवण्यामध्ये काही समस्या होत्या. त्यावर डॉ. भोसरेकर यांनी संशोधन करून संकरित वळूच्या अतिशीत वीर्यकांड्या तयार करण्यात यश मिळवले आणि त्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवता आल्या. बायफ या संस्थेत २१ वर्षे काम केल्यानंतर १९९५मध्ये  वयाच्या ६१ व्या वर्षी निवृत्ती घेऊन ते मे. बी.जी.चितळे या प्रसिद्ध दुग्धव्यावसायिकांकडे मुख्य तंत्रज्ञान सल्लागार म्हणून हजर झाले. चितळे यांच्या सांगली जवळील भिलवडी येथील डेरी फार्मवर १९९९मध्ये त्यांनी रेड्याचे वीर्य अतिशीत पद्धतीने साठवण्याची प्रयोगशाळा स्थापन केली. तसेच त्यांनी म्हशीमधील वंध्यत्व निवारणासाठी सांगली जिल्ह्यात जागोजागी शिबिरे घेऊन दूध उत्पादकांना मदत केली. त्यांनी भारतात प्रथमच चितळे डेरी फार्मवर गायी-म्हशींमध्ये अल्ट्रासोनोग्राफीचा प्रयोग केला. यामुळे गर्भधारणेचे निदान करणे सोपे झाले आणि त्याचा परिणाम दोन वितातील अंतर कमी करण्यात झाला. डॉ. भोसरेकर यांनी चितळे डेरी फार्ममध्ये सप्टेंबर २००१पर्यंत काम केले.

      डॉ. भोसरेकर यांच्या पशु-पैदास आणि दुग्ध़ व्यवसायातील कार्याची आणि प्रदीर्घ अनुभवाची दखल घेऊन राष्ट्रीय डेरी विकास मंडळाने त्यांना ऑक्टोबर २००१मध्ये खास सल्लागार म्हणून नेमले. ते २००७पर्यंत कार्यरत होते. या काळात त्यांनी महाराष्ट्रातील विविध दूध सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या अनेक पशुवैद्यकांना गायी-म्हशीतील वंध्यत्वनिवारणाचे आणि यशस्वी गर्भधारणेचे प्रमाण वाढवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांनी २००८-०९मध्ये तमिळनाडू पशुविकास मंडळासाठीही तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहिले. आपल्या ५१ वर्षांच्या पशुसेवेच्या कारकिर्दीत त्यांनी ज्ञानप्रसाराचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ११५ संशोधन लेख प्रसिद्ध आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना उपयोगी पडतील असे २०च्यावर लेख मराठी मासिकांतूनही प्रसिद्ध केले आहेत. पशुप्रजनन, कृत्रिम रेतन, म्हैसपालन या विषयांवर त्यांची तीन इंग्रजी आणि पाच मराठी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

      डॉ. भोसरेकर यांनी ब्राझील, स्वीडन, मॉरिशस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला. डॉ. मधुकर भोसरेकर यांनी एन्.डी.आर.आय. करनाल येथील पशु-संवर्धन विषयासाठी एम.एस्सी.च्या दोन विद्यार्थ्यांना तसेच उपसाला (स्वीडन) येथील पीएच.डी.च्या एका विद्यार्थ्यास मार्गदर्शन केले.

      डॉ. भोसरेकर यांनी पशु-प्रजनन क्षेत्रात केलेल्या मौल्यवान कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले. म्हशीमधील गोठित वीर्य तंत्रज्ञानासंबंधीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल १९७२-७४ या द्वैवार्षिक कालावधीसाठीचा डॉ. रफी अहमद किडवाई पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. त्यांना १९९३मध्ये न्यूयॉर्क अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सचे सभासदत्व मिळाले. त्याच वर्षी त्यांना इंडियन सोसायटी फॉर स्टडिज ऑन अ‍ॅनिमल रिप्रॉडक्शन फेलोशिपचा सन्मान मिळाला. त्यांना १९९४मध्ये उत्कृष्ट संशोधनात्मक लेखाबद्दल इंडियन सोसायटी फॉर स्टडिज ऑन अ‍ॅनिमल रिप्रॉडक्शन या संस्थेचाच प्रा. नील्स लॅगरहॉफ पुरस्कार मिळाला. ‘अधिक दूध देणाऱ्या म्हशीचे व्यवस्थापन’ या त्यांच्या पुस्तकाला १९९८मध्ये बळीराजा मासिकातर्फे डॉ. राहुडकर पुरस्कार प्राप्त झाला. डॉ.भोसरेकर यांना पशु-प्रजनन क्षेत्रातील उच्च दर्जाच्या योगदानाबद्दल २००१मध्ये इंडियन सोसायटी फॉर स्टडिज ऑन अ‍ॅनिमल रिप्रॉडक्शनचा आजीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर २००७ या वर्षी ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान, महाराष्ट्रतर्फे डॉ. भोसरेकर यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

- डॉ. विजय अनंत तोरो

भोसरेकर, मधुकर रामराव