Skip to main content
x

चितांबर, गणेश जयदेव

अप्पासाहेब चितांबर

    ज्ञानदानासारखी पवित्र गोष्ट जगात कुठलीही नाही. हे ज्ञान महिलांना मिळावे यासाठी स्त्रीशिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले, महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचा आदर्श समोर ठेवून गणेश जयदेव उर्फ अप्पासाहेब चितांबर यांनी समविचारी सहकारी शिक्षकांच्या मदतीने १९४३ मध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘नवविद्या प्रसारक मंडळाची’ स्थापना केली. १४ जून १९४३ रोजी अहमदनगर येथे तीन मुलींना घेऊन ‘कन्या विद्या मंदिराचा’ शुभारंभ झाला. संस्थापक सदस्य म्हणून श्री. स.चि. वाळिंबे, द.त्रि. कानगो, नानासाहेब देव, श्रीमती मालतीबाई वाळिंबे, वि. मा. थिगळे, रा.स. अष्टेकर, सौ. निर्मलाताई अष्टेकर, श्रीमती कमलाताई वाळिंबे, शंकरराव सभारंजक आणि अप्पासाहेबांच्या धर्मपत्नी पद्माताई चितांबर यांचे सहकार्य लाभले. सर्व सहकाऱ्यांनी तन, मन, धन अर्पण करून, नि:स्वार्थ बुद्धीने स्वत:ला झोकून दिले.

     भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी १९४६ मध्ये संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन अप्पासाहेबांच्या कार्यास आशीर्वाद दिले. केडगांव देवीच्या रस्त्याचे व डोंगरगण नाल्याच्या पाण्याच्या चराचे, अप्पासाहेबांच्या विद्यार्थिनींनी श्रमदानाद्वारे केलेले काम पाहून तत्कालीन जिल्हाधिकारी म.बा. देसाई यांनी सन १९५६ मध्ये संस्थेसाठी मालकीहक्काची जागा व बांधकामाचे साहित्य उपलब्ध करून दिले.

     ३१ वर्षे मुख्याध्यापक आणि नंतरची २० वर्षे संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत असणाऱ्या अप्पासाहेबांनी कन्या विद्या मंदिरापाठोपाठ सुरू केलेल्या शारदा विद्या मंदिर, सरस्वती रात्रशाळा, बालक मंदिर, ज्ञान संस्कार मंदिर या सारख्या विविध शाखांमधून शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थिनींमध्ये ज्ञान, बल, शील, सेवा या चतु:सूत्रीचा सातत्याने प्रसार केला. या सूत्रांना प्रत्यक्षात आणण्यासाठी भगिनी भेट, गणवेश योजना, सहकार्य पथक, अभ्यास गट, शिस्तीचे गुण, स्वयंशासन मंडळ, सरस्वती पूजन, नाट्याभिनय, वनिता मंडळ, शिवणकला वर्ग, गीत मंच, क्रीडामंडळ, सांस्कृतिक मंडळ यांसारखे उपक्रम राबविले. प्रार्थनेनंतर बातम्या सांगणे व त्यांची अभ्यासाच्या विषयांशी सांगड घालणे, रोजनिशी लेखनाची सवय लावणे अशा योजनांमुळे मुलींच्या सर्वांगीण विकासाला वाव मिळाला.

     शाळा चालविणे म्हणजे केवळ मुलींना साक्षर करणे व शालान्त परीक्षा प्रमाणपत्र मिळवून देणे हा अप्पासाहेबांचा उद्देश नव्हता तर शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीवर चांगले संस्कार झाले पाहिजेत, तिचा व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे, तिच्या सुप्त गुणांना वाव मिळावयास हवा, ती उत्तम नागरिक बनावी, सुजाण गृहिणी बनावी, तिला आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होऊन योग्य निर्णय घेता यावेत, तिने भरपूर वाचन करून अद्ययावत ज्ञान संपादन करावे, स्वच्छता, शिस्त, काटेकोरपणा, कामाचे नियोजन करण्याची क्षमता इ. गुणांचा तिने अंगिकार करावा व आयुष्यात कोणत्याही संकटांना न डगमगता सामोरे जाऊन यशस्वी जीवन जगावे यासाठी विविध उपक्रम केवळ राबविले नाहीत तर अपार कष्ट व अथक परिश्रम करून त्यात उत्तुंग यशही मिळविले.

      पांढराशुभ्र कोट, पांढरी पँट, तेजोमय चेहरा, डोळ्यावर आकर्षक चष्मा, कपाळावर सदैव रूळणारे केस आणि चेहऱ्यावर स्मित हास्य असे त्यांचे रुप होते. स्वच्छता आणि शिस्तप्रियतेबरोबरच त्यांच्या खाण्यापिण्याच्या साध्या आवडी- निवडी होत्या. साईबाबांबद्दल त्यांच्या मनात अपार निष्ठा होती. आजन्म सेवाभावाचा वसा. दुसऱ्यासाठी जगावे हाच त्यांचा आदर्श.

     माध्यमिक शिक्षक संघाच्या कार्यात हिरिरीने भाग घेऊन संघाचे चिटणीस आणि अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. संघातर्फे एस.टी.सी. चे वर्ग चालवून शहरातील प्रशिक्षित शिक्षकांची गरज भागविण्यासाठी प्रयत्न केला. जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाची स्थापना करून प्रारंभीची आठ वर्षे चिटणीस म्हणून कामकाज पाहिले. महाराष्ट्र माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य व सरचिटणीस पदही भूषविले. माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापकांची कृतिसत्रे, चर्चासत्रे व परिसंवादाचे नियोजन करून सक्रीय सहभाग दिला. विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके व मासिकांमधून लेखन करून शिक्षकांना मार्गदर्शन केले.

     शिक्षक आणि विद्यार्थिनींमध्ये संस्थेविषयी जिव्हाळा आणि प्रेम निर्माण करण्याची अप्पासाहेबांची हातोटी प्रशंसनीय होती. त्यांचे कर्तृत्व पाहून महाराष्ट्र सरकारने त्यांना १९६९ मध्ये राज्य पुरस्कार देऊन गौरविले. नवविद्या प्रसारक मंडळाच्या व सर्व हितचिंतकांच्या वतीने २० डिसेंबर १९७४ रोजी षष्ट्यब्दिपूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले. जून १९७५ मध्ये अप्पासाहेब दीर्घ सेवेतून निवृत्त झाले.

     संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये१९९५साली शिक्षकदिनी संस्थेमार्फत मानपत्र देऊन त्यांचा ऋणनिर्देश करण्यात आला.

      आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगणाऱ्या व इतरांना तसा संदेश देणाऱ्या अप्पासाहेबांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदान केले. संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षामध्ये १९ जानेवारी २००३ रोजी संस्थेच्या कन्या विद्यामंदिराचे “शिक्षणमहर्षी ग.ज. चितांबर विद्यामंदिर” असे नामकरण करण्यात आले.

-  विश्वास काळे

चितांबर, गणेश जयदेव