Skip to main content
x

चितळे, परशुराम भास्कर

              दुग्ध व्यवसायातील दीपस्तंभ मानल्या जाणार्‍या परशुराम भास्कर चितळे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव जानकीबाई होते. चितळे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईला झाले. त्यांनी दुग्ध व्यवसायाचे शिक्षण बंगळुरू येथील राष्ट्रीय दुग्ध विज्ञान संशोधन संस्थेतून प्राप्त केले. ‘चितळे उद्योग’ या व्यवसायाची मुहूर्तमेढ परशुराम यांचे वडील भास्करराव तथा बाबासाहेब चितळे यांनी रोवली. साधारणपणे १९४५-१९४६च्या सुमारास केवळ चार म्हशी घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायासाठी त्यांना मुंबई येथील तांबे हॉटेलच्या संस्थापकांनी उत्तेजन दिले. बाबासाहेबांना आजूबाजूच्या शेतकर्‍यांकडून दूध जमवून त्याचे लोणी बनवून आठवड्यातून दोनदा मुंबईला आणण्यास तांबे यांनी सांगितले व चांगली किंमत देणारी खात्रीची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले.

            आपल्या व्यवसायासाठी कर्मभूमी म्हणून बाबासाहेबांनी सांगलीमधील कृष्णाकाठच्या जमिनीची निवड केली. ती काळी कसदार बागायती जमीन होती आणि बाराही महिने पाणी असल्यामुळे जनावरांसाठी पोषक वातावरण होते. पुढे १९६०च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्रनिर्मितीच्या अस्थिर राजकीय वातावरणाच्या काळात परशुराम चितळे यांनी वडिलांचा सल्ला ऐकून आपले महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडले आणि घरच्या व्यवसायात पूर्ण लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्याकडे १५ म्हशी होत्या आणि सुमारे २००० लीटर इतके दूध संकलन होत असे,  पण या काळात अपुरा विद्युतपुरवठा, बर्फाचा आणि दळणवळणाच्या साधनांचा अभाव, दुष्काळसदृश परिस्थिती अशी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर उभी ठाकली, पण त्यावरही त्यांनी मात केली. त्या वेळी पुरेसा बर्फ उपलब्ध होत नसे व इंधनाची समस्या डोके वर काढत असे, त्यामुळे या गोष्टींचा विचार करून अग्नी, पाणी व बर्फ यांचा सारखा व सलग वापर करण्याची वेगळी पाश्‍चरायझेशन प्रणाली त्यांनी विकसित केली व ती सिद्धही करून दाखवली. या तंत्राचे परदेशी अभ्यासकांनीही कौतुक केले. व्यवसायवृद्धी साधताना त्यांनी समाजातील उपेक्षित वर्गाच्या विकासाकडेही लक्ष पुरवले. अशा कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभावे म्हणून त्यांना एकेक म्हैस देऊन दैनंदिन खर्चाची तोंडमिळवणी करता येते, हे दाखवून दिले. त्यांनी १९६६च्या सुमारास ४० म्हशी उपेक्षित कुटुंबांना दिल्या. हा प्रयोग यशस्वी झाला व नंतरच्या दोन वर्षांत त्यांना नव्याने १२० म्हशी या योजनेतून लोकांना पुरवाव्या लागल्या. पुढच्या काळात यातील बर्‍याच कुटुंबांत १० ते १२ म्हशी आहेत.

            व्यवसायाचा विस्तार करताना त्यांनी व्यावसायिक अनुशासन व निष्ठा यांचे कटाक्षाने पालन केले. त्यांनी दूध संकलनाच्या वेळा, दुधाची गुणवत्ता, व्यावसायिक स्वच्छता यांचे काटेकोर पालन केले. व्यवसायाचे दैनंदिन कामांचे व वार्षिक कामांचे योग्य नियोजन केले. जनावरांची खरेदी, दुग्धोत्पादन, दुग्ध संकलन, प्रक्रिया, दुग्ध वाहतूक, दुग्ध वितरण व आर्थिक संकलन व वाटप या सर्व टप्प्यांमध्ये कुटुंबातील प्रत्येक सभासदाची योग्य जबाबदारी यामुळेच चितळे उद्योगाने यशाचा हा टप्पा गाठला आहे. दैनंदिन २००० लीटर संकलनापासून ३ लाख लीटर संकलनाचा पल्ला त्यांनी गाठला.

            आपल्या व्यवसायातील प्रत्येक जनावर हे आपल्या दुग्ध व्यवसायाचा आत्मा आहे, असे चितळे यांचे मत असल्यामुळे त्यांनी एकेक जनावर खरेदी करताना योग्य ती काळजी सदैव घेतली. नव्या जनावराची वंशावळ तपासणे, योग्य ती तपासणी करून घेणे आणि विकत घेताना त्या जातीचे मूळ उत्पत्तिस्थान पाहून तेथे जाऊन खरेदी करायची यामध्ये त्यांनी कधीच तडजोड केली नाही. वंश शुद्धीकरण व सिद्ध वंशाची निर्मिती यासाठी चितळे समूहाने गेली १० वर्षे सातत्याने प्रयत्न केले आहेत. ‘चितळे-समूहामधील जो दुग्ध व्यावसायिक सभासद त्याच्या घरची तयार केलेली रेडी (पारडी) ३० ते ३६ महिन्यांच्या काळात निश्‍चित गाभण राहिली आहे, हे सिद्ध करून दाखवील त्याला सन्मानपूर्वक रु. ३०००चे बक्षीस दिले जाते’, या धोरणामुळे दरवर्षी सभासदांमध्ये  ईर्षा निर्माण होऊन उत्तम वंशावळीच्या घरच्या रेड्या (पारड्या) तयार करण्याची जिद्द जोपासली गेली आहे. त्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे म्हशींच्या रेडकांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाले व स्थानिक पातळीवर उत्तम वंश सहजरीत्या उपलब्ध होऊ लागला. चांगल्या वंशनिर्मितीसाठी १९७८मध्ये चितळे उद्योगाने कृत्रिम रेतन केंद्र विकसित केले. या केंद्रामध्ये तीन पिढ्यांची नोंद असलेले सिद्ध वळू तयार केले व प्रथम द्रवरूप वीर्य वापरण्यास सुरुवात केली. त्या पद्धतीचे उपयोगितेचे निकाल ९८ टक्क्यांपर्यंत मिळाले. याच सफलतेमधून  १९८३मध्ये उच्च स्निग्धांश असलेल्या जर्सी व होल्स्टीन फ्रीझियन अशा २० गायी व ४ उत्तम वळू डेन्मार्क येथून चितळे यांनी स्वतः जाऊन आणले व अतिशीतवीर्यमात्रा ही नवीन प्रणाली खासगी व्यावसायिकांत पहिल्यांदा चालू केली. या नवीन पद्धतीचे गर्भधारणेमधील निकाल ९७ टक्क्यांपर्यंत सिद्ध झाले आहेत. आज चितळे समूहाकडे म्हशींमध्ये ३२ सिद्ध वळू , तर गायींमध्ये ४८ सिद्ध वळू आहेत.

            व्यवसायातील काळानुरूप बदल, नव्याने विकसित होणारी यंत्रणा, तंत्रज्ञान या गोष्टी चितळे समूहाने प्रत्येक वेळी अभ्यासून आत्मसात केल्या. त्यामुळे आज २४ तास गोठा स्वच्छ ठेवणारी यंत्रणा असून, प्रत्येक म्हशीची व गायीची (दुग्धोत्पादन, आहार, पाणी याची) दैनंदिन नोंद संगणक प्रणालीद्वारे होते. प्रत्येक जनावराला त्या त्या अवस्थेनुसार संगणक प्रणालीमार्फत आहार दिला जातो. गोठ्यातील जनावरांचे वार्षिक लसीकऱण, जंतुनाशक औषधी मात्रा यांचा तक्ता केला आहे व त्यानुसार काम चालते. चितळे समूहाने त्यांच्या सभासदांसाठी पशुुवैद्यकीय सेवेसाठी कॉल सेंटर चालू केले आहे. या कॉल सेंटरमुळे प्रत्येक सभासद जनावरांच्या काळजीबद्दल २४ तास निश्‍चिंत झाला आहे. दूध संकलन ते दूध वाहतुकीचा ट्रक भरणे हा संपूर्ण प्रवास यांत्रिकीकरणाद्वारे निश्‍चित केला आहे.

            प्रत्येक सभासद हा ज्ञानाने परिपूर्ण असावा, या हेतूने चितळे समूहाचे दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्र १९९०पासून कार्यरत आहे; नव्याने व्यवसाय सुरू करणारे १० सभासद व पूर्वीचे २० सभासद अशा तीस सभासदांचा वर्ग घेतला जातो. येथे ३ दिवसांचा अभ्यासवर्ग व ५ दिवसांचा अभ्यासवर्ग असे दोन प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारचे १० अभ्यासवर्ग असा वार्षिक कार्यक्रम असतो. या अभ्यासक्रमामध्ये जनावर खरेदी, आदर्श गोठा व्यवस्थापन, जनावरांचा आहार, जनावरांची जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक स्थितीमध्ये घ्यायची काळजी, स्वच्छ दूधनिर्मिती व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती या विषयांचा समावेश असतो.

            आज चितळे समूहाचा विस्तार भिलवडी केंद्रस्थान आधारभूत धरल्यास सभोवताली ३५ कि.मी.पर्यंत झाला आहे. ‘जो गायी/म्हशी चांगल्या पद्धतीने सांभाळतो तो आमच्या चळवळीचा कार्यकर्ता’ ही खूणगाठ असल्याने आज समाजातील प्रत्येक घटक उदा., रामोशी, वैदू, गोपाळ, गोसावी, गारुडी, कैकाडी आणि जोशी हेसुद्धा सभासद आहेत व अशा सर्व बांधवांचे एकत्रीकरण करून अशी सक्षम मोट बांधण्यात या समूहाला यश आले आहे. सामाजिक बांधिलकी ही आपल्या समूहाची नैतिक जबाबदारी आहे, या भावनेपोटी समूहाने भिलवडी रेल्वे स्थानकामध्ये महिलांसाठी शौचालय बांधले. भिलवडी गावामध्ये महिलांसाठी शौचालये १९६८मध्ये प्रथमच बांधण्यात आली व १९७२मध्ये भिलवडी गावामध्ये अंतर्गत डांबरी रस्ते तयार केले गेले. पूरग्रस्त परिस्थिती ओढवल्यास त्या वेळी अनेक खेडेगावांना प्रथम सर्वार्थाने मदतीचा हात चितळे समूहातर्फे पुढे केला जातो.

            - मिलिंद कृष्णाजी देवल

चितळे, परशुराम भास्कर