Skip to main content
x

चोरघडे, वामन कृष्ण

     वामनराव यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड गावी झाला. नागपूरच्या पटवर्धन विद्यालयातून  १९३२ मध्ये वामनराव मॅट्रिक झाले. मॉरिस कॉलेज, नागपूरला १९३६ मध्ये त्यांनी कला शाखेत बी. ए. केले. अर्थशास्त्र या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे काही काळ त्यांनी शिक्षा मंडळ, वर्धा येथील गोविंदराम सेक्सारिया वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. पुढे नागपूरच्या गोविंदराम सेक्सारिया अर्थवाणिज्य महाविद्यालयात वामनराव उपप्राचार्य होते. १९३०पासून त्यांनी महात्मा गांधीच्या असहकार आंदोलनात सहभाग घेतला. १९४२च्या चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

     ह्या दरम्यान त्यांचा महात्मा गांधी, काका कालेलकर, दादा धर्माधिकारी, विनोबा भावे ह्या गांधीवादी महात्म्यांशी जवळून संबंध आला. वामनरावांच्या मनावर गांधी-विनोबांच्या तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव होता. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांनी आपल्या अभिजात संस्कारशील कथालेखनाला सुरुवात केली. सामाजिक आणि राजकीय चळवळीत काम करताना वामनराव समाजाच्या उच्च स्तरांपासून निम्न स्तरांपर्यंत सर्वत्र वावरले, जीवनानुभव घेतले आणि त्यातूनच त्यांच्या कथानिर्मितीची वाट दिवसेंदिवस फुलत गेली. वामनरावांची कथा समाजाचे वास्तव मांडताना जीवनाभिमुख आणि समाजाभिमुख राहिली. वामनरावांच्या कथांवर लोकभाषा आणि लोकसंस्कृतीचा मोठा प्रभाव होता.

     समाजाला अंतर्मुख करून भावनेचा ओलावा देणार्‍या आणि मानवी जीवनातील मांगल्य, सद्भाव आणि मानवतावादी मूल्यांचे संस्कार करणार्‍या कथा वामनरावांनी लिहिल्या. त्यांचा पहिला कथासंग्रह ‘सुषमा’ (१९३६), ‘हवन’ (१९३८), ‘यौवन’ (१९४१), ‘प्रस्थान’ (१९४५), ‘पाथेय’ (१९४६), ‘संस्कार’ (१९५०), ‘नागवेल’ (१९५७), ‘मजल’ (१९६३), ‘बेला’ (१९६४), ‘ख्याल’ (१९७३), ‘ओला  दिवस’ असे जीवनातील वास्तवाचे आणि मांगल्याचे जीवन दर्शन घडविणारे कथासंग्रह त्यांच्या खाती जमा आहेत. सुगम, सौम्य, मृदू आणि लयदार भाषिक अभिव्यक्तीमुळे त्यांच्या कथा वाचनीय आणि चिंतनीय ठरल्या. प्रवाही निवेदनशैली आणि कथनवस्तूच्या दमदारपणामुळे वामनरावांनी मराठी कथाविश्वाला मौलिक योगदान दिले. जवळपास चाळीस वर्ष वामनरावांनी कथालेखन केले. नवकथापूर्व काळातील लोकप्रिय कथाकार म्हणून वामनरावांची उंची अनन्यसाधारण आहे.

     सात्त्विक मूल्यांचे उपासक-

     वामनराव प्रतिभावंत कथाकार होते. कथालेखनाशिवाय त्यांनी इतर कथन प्रकार असलेले कादंबरी-नाटकादी वाङ्मय प्रकारांत लेखन केलेले नाही. ‘साने गुरुजींचे ओझरते जीवन दर्शन’ (१९४६), ‘अहिंसेची साधना’ (१९४५), ‘अहिंसा विवेचन’ (१९४९), ‘भारताचा आधुनिक आर्थिक इतिहास’ (१९५३) ह्या कथेतर लेखनातून-ग्रंथांतून वामनरावांनी आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकणार्‍या व्यक्तींचे आणि तत्त्वज्ञानाचे मार्मिक विवेचन केलेले आहे. वामनराव पुढे गांधीवादी लेखक म्हणूनही ओळखले जायचे. १९७९मध्ये विदर्भातील चंद्रपुरात संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वामनरावांनी भूषविले. आचार्य कालेलकरांच्या गुजरातीतील प्रवासवर्णनांची भाषांतरे त्यांनी मराठी भाषेत केली.

       मराठी कथा-वाङ्मयात मध्यमवर्गीय जीवन-जाणिवांच्या चित्रणाला महत्त्व दिले गेले. कथेच्या रूपबंधात बदल करीत, प्रयोग करीत मराठी कथा नवी-नवी वळणे घेऊ लागली. परंतु कथेतले कथन मात्र पुढे-पुढे हरवत गेले. आशयाची मध्यमवर्गीय वळणे गिरवणारी कथा मध्यमवर्गीय कथाकारांनी गिरवली. वामनरावांनी आपले आयुष्य ग्रामीण भागातल्या गोंड, गवारी, मजूर, विविध जातीजमातीचे लोक यांच्या सहवासात घालविले. अनुभवांना वास्तवाची किनार दिली. गांधी-विनोबा-साने गुरुजी यांच्या संस्कार-विचार  यांत त्यांची जडणघडण झाली. माणसांना त्यांच्या मुळांसह समजून घेत, त्यांच्या कथांनी समाजात मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना केली. संस्कृतीच्या कळवळ्यातून मानवी जीवनातील सात्त्विक मूल्यांची उपासना त्यांच्या कथांनी केली. मराठीत आजही वामनरावांची कथा वाचली जाते. मूल्यनिर्मितीचे कार्य करणारे वामनराव मराठी कथेचे वैभव होते, असे म्हणता येईल.

     - डॉ. किशोर सानप

चोरघडे, वामन कृष्ण