देऊळगावकर, विठ्ठल लक्ष्मण
विठ्ठल लक्ष्मण देऊळगावकरांचा जन्म चंद्रपुर येथे झाला. त्यांचे वडिल बदली होऊन उस्मानाबादला आल्याने विठ्ठलरावांचे सहावी इयत्तेपर्यंतचे शिक्षण उस्मानाबाद येथे झाले. फारसी, मराठी, उर्दू व गणित हे अभ्यासाचे विषय होते. पुढे वडिलांची बदली कर्नाटकातील गुलबर्गा येथे झाली. त्यामुळे पुढील शिक्षण त्यांनी गुलबर्ग्यात पूर्ण केले. ते एलएल. बी. झाले व त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांचा उत्तम जमही बसला. त्यांचा विवाह औरंगाबाद येथील साळूबाई खजिनदार यांच्याशी झाला.
पुणे हे त्या काळात सुधारणांचे केंद्र होते. तेथे चालू असलेले उपक्रम गुलबर्ग्यातही सुरू करावेत अशा विचाराचे त्यांचे अनेक मित्र एकत्र येत असत. १९०५ मध्ये गुलबर्ग्यात प्लेगने धुमाकूळ घातला. लोक रानावनात राहावयास गेले. विठ्ठलराव व त्यांच्या मित्रांनी सरकारी मदतीची अपेक्षा न करता लष्करी कॅम्पसारखा कॅम्प तयार केला. लोकांना संकटात धीर दिला.
विठ्ठलराव व त्यांच्या मित्रांनी गुलबर्ग्यात गणेशोत्सव, शिवजयंती हे उत्सव १९०७ मध्ये सुरू केले. या सर्वांच्या मनात औरंगाबाद, हैद्राबादप्रमाणे मातृभाषेतून आधुनिक पद्धतीचे शिक्षण देणारी राष्ट्रीय शिक्षणसंस्था काढावी असा विचार होता. त्यांनी लोकमान्य टिळकांशी या संबंधी चर्चा केली. १७ जून १९०७ रोजी ‘नूतन विद्यालया’ची स्थापना झाली. घटना तयार केली. निधी गोळा केला. विठ्ठलरावांनी शाळेची सूत्रे हाती घेतली. विद्यालयाची जाहिरात वाचून सरकारी नोकरी सोडून अनेक समविचारी शिक्षक म्हणून शाळेत दाखल झाले. शाळेत नवीन प्रयोग करण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापक गोगटे ह्यांनी शिक्षकांसह पुणे, मुंबई येथील अनेक शाळांना, महाविद्यालयांना भेटी दिल्या. ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचे मार्गदर्शन घेतले. अभ्यासक्रम तयार केला. शाळेत शिकण्यासाठी बीड, उस्मानाबाद, उमरगा, उदगीर, लातूर येथून विद्यार्थी येऊ लागले.
विठ्ठलरावांनी वाचनालय सुरू केले. देशात घडणाऱ्या घडामोडींची लोकांना त्यामुळे ओळख होऊ लागली. विविध विषयांवर चर्चा होत. स्पर्धा घेतल्या जात. वकिलीत विठ्ठलरावांना उत्तम पैसा मिळत होता. पण तो सर्व पैसा ऐषारामासाठी खर्च न करता त्यांनी वाचनालयासाठी, शाळेसाठी, सार्वजनिक कामांसाठी खर्च केला. नूतन विद्यालयात शिक्षणासोबतच बहिष्कार, स्वावलंबन, समाजसुधारणा व स्वदेशी ही लोकमान्य टिळकांची चतुःसूत्री रुजवण्याचे ऐतिहासिक कार्य केले. निजामशाही उलथून टाकण्यासाठी अनेक विद्यार्थी, शिक्षक, सर्वसामान्य जनता, वकील, डॉक्टर या स्वातंत्र्यलढ्यात नूतन विद्यालयामुळे सहभागी झाले होते. राष्ट्रप्रेम, देशभक्ती, स्वतः चरखा चालवून काढलेल्या सुताचे - खादीचे कपडे वापरणारे ध्येयवादी विद्यार्थी या विद्यालयांतील शिक्षकांनी घडविले. या विद्यालयाने अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती घडविल्या. २९ फेब्रुवारी १९२७ ला महात्मा गांधींनी या शाळेस भेट दिली. तेथे महिलांची सभा झाली.
आज विद्यालयाने शंभरी ओलांडली आहे. प्राथमिक विद्यालयाचे महाविद्यालयात रूपांतर झाले आहे. डी.एड, बी.एड, फाइन आर्टस, बी.बी.एम., बी.सी.ए, व्होकेशनल पॉलिटेक्निक, संगीताचे पदव्युत्तर शिक्षण इत्यादी ज्ञानशाखांतून शिक्षण घेऊन कर्तृत्वसंपन्न नागरिक घडत आहेत. ‘नूतन विद्यालया’चे संस्थापक विठ्ठलराव देऊळगावकर ह्यांच्या तपश्चर्येचेच हे फलित आहे.